Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ठेवीदार बचाव समितीतर्फे मुंबई मोर्चाच्या तयारीसाठी आजपासून अभियान
नाशिक, २३ जून / प्रतिनिधी

 

मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक- ठेवीदार बचाव समितीतर्फे मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी एक जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची तयारी करण्यासाठी २४ ते २७ जून या कालावधीत नाशिकरोड, हुतात्मा स्मारक, सातपूर आणि सिडको येथे सभांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे.
२४ जून रोजी नाशिकरोड येथील एम.एस.ई.बी. कॉलनी, २५ रोजी जिल्हा न्यायालयासमोरील हुतात्मा स्मारक, २६ रोजी सातपूरमध्ये चंद्रकांत बढेसर पतसंस्थेच्या कार्यालयासमोर सभा होणार आहे. या सर्व सभा सायंकाळी पाचला होणार आहेत. २७ रोजी सकाळी अकरा वाजता सिडकोतील महाजननगर येथे सभा होईल. या सर्व सभांना समितीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सर्व ठेवीदारांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी सभेला उपस्थित राहून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित महाराष्ट्रातील आर्थिक अडचणीतील संस्थेचे ठेवीदार संबधित जिल्हा समितीच्या नियोजनाप्रमाणे मुंबई येथील श्री छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवर सकाळी अकरा वाजेपर्यंत जमा होतील. तेथूनच मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यासाठी मोर्चा निघणार आहे.
समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने एक हजार कोटीचे सॉफ्ट लोन मंजूर करावे, तापी, चंद्रकांत बढे, विठ्ठल-रखुमाई, पूर्णवाद, समर्थ या राज्यस्तरीय पतसंस्थाचे संचालक मंडळ त्वरीत बडतर्फ करावे, या संस्थांच्या प्रशासक मंडळावर ठेवीदारांच्या प्रतिनिधींची नेमणूक करावी, नाशिक जिल्हा उपनिबंधकांविरूध्द असलेल्या तक्रारींची दखल घेत त्यांची त्वरीत बदली करावी, कित्येक पतसंस्थांनी सातत्याने मागणी करूनही अद्याप शासकीय लेखापरीक्षण झालेले नाही. यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करून त्या मुदतीच्या आत संबधित संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण करण्यात यावे, लेखापरीक्षण झालेल्या व त्यात दोषी आढळलेल्या पतसंस्थांचे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, कपालेश्वर पतसंस्थेतील ठेव अपहार प्रकरण पडद्याआड करण्यास सहाय्यभूत ठरणारा पतसंस्थेच्या अवसायनाचा आदेश रद्द करण्यात येऊन संस्था पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चात सर्वानी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निवेदन समितीचे पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड, अॅड. तानाजी जायभावे, प्रा. व्ही. एस. चव्हाण, बी. डी. घन, अॅड. श्रीधर देशपांडे, राजू देसले, आर. डी. पाटील आदींनी केले आहे.