Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांनी कालिदास दिन साजरा
नाशिक, २३ जून / प्रतिनिधी

 

महाकवी कालिदास यांची जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. महाकवी कालिदास दिनानिमित्त नाशिक कवी, संस्कृत सभा, अखिल भारतीय नाटय़ परिषद शाखा, महानगरपालिका, दीपक नाटय़ मंडळ यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
संस्कृत भाषा सभेतर्फे सारडा कन्या विद्यालयात आयोजित ‘शाकुंतल परिचय’ कार्यक्रमाची गोडी सरिता देशमुख व डॉ. निरूपमा कुलकर्णी यांच्यामुळे वाढली. यावेळी कालिदासांच्या शाकुंतल नाटकातील श्लोकोंसह त्याचे रसभरित विवेचन करण्यात आले. यावेळी बारावीच्या परीक्षेत संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दीपक नाटय़मंडळातर्फे परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात ‘विक्रमोर्वशिय’ च्या काही भागाचे नाटय़वाचन झाले. गिरीश जुन्नरे यांचे दिग्दर्शन असून अमित कुलकर्णी यांनी संगीत दिले. नाटय़ वाचनात शौनक गायधनी, यशश्री रत्नपारखी, अबोली पंचाक्षरी, नेहा विसपुते, विनित पैठणे, कुंतक गायधनी, पावक गायधनी, नुपूर विसपुते, प्रियंका दळवी यांनी उपस्थितांची दाद मिळवली.
महानगरपालिका व अखिल भारतीय नाटय़ परिषद शाखेच्या वतीने कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ नटराज पूजनाने झाला. ओवी दीक्षितने संस्कृतमधील नांदी सादर केली. यानंतर जिजाई थिएटर्सनिर्मित सिध्दार्थ दिग्दर्शित ‘श्यामची आई’ व मयुरी थिएटर्स निर्मित प्रवीण कांबळे दिग्दर्शित ‘ट्रेलर’ ही एकांकिका सादर करण्यात आली.
नाशिक कवी संस्थेतर्फे गांवकरी भवनात कालिदास महोत्सवाचा शुभारंभ चौधरी यात्रा कंपनीचे ब्रिजमोहन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांवकरीचे वृत्तसंपादक शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून नाशिक कवीचे डॉ. सुरेश मेणे उपस्थित होते. महोत्सवाचा शुभारंभ नवोदित कवींच्या काव्यवाचनाने झाला. रचना विद्यालयात कालिदास दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन न करता दैनंदिन परिपाठात कालिदास यांचे जीवन चरित्र, त्यांची साहित्य निर्मिती याबाबत संस्कृत शिक्षिका के. आय. अटवणे, एस. एस. पांडे, आश्विनी चंदात्रे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आठवीतील विद्यार्थी अपूर्व पांडे यांनी कालिदासाच्या जीवनावरील स्वरचित कथा यावेळी विद्यार्थ्यांना ऐकवली. मानसी मुजूमदारने काव्यवाचन केले. याशिवाय प्रार्थना व प्रतिज्ञा संस्कृत भाषेत घेण्यात आली. जु.स.रूंग्टा विद्यालयात कालिदास दिनानिमित्त तुषार धर्माधिकारी व पावक गायधनी यांनी कालिदासांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडलाा. संस्कृत शिक्षिका मनिषा जोशी यांनी कालिदासांच्या नाटकांबद्दल माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक अरूण गायकवाड उपस्थित होते. संगीता मालपाठक यांनी सूत्रसंचालन केले.