Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल - जयंत पाटील
बीड, २३ जून/वार्ताहर

 

पोलीस पाटलांच्या मानधनासह सर्व मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अलीकडेच त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने श्री. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सह्य़ाद्री अतिथीगृहात श्री. पाटील यांची भेट घेतली. पोलीस पाटलांच्या मागण्या सोडविण्यासाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आयोग नेमला होता. या आयोगाच्या शिफारशी विचारात घेऊन सरकारने मानधनासह सर्व मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी श्री. क्षीरसागर यांनी केली.
मानधनवाढीसह तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आलेले पोलीस पाटील सेवेत कायम करावेत, पोलीस पाटलांचा एक लाख रुपये अपघाती विमा उतरवावा, जिल्ह्य़ाच्या ठिकाणी पोलीस पाटील कार्यालय करावे, पोलीस पाटलांना वर्षांत एकदा प्रशिक्षण दिले जावे, पोलीस पाटलांना राज्यपाल पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्यांबाबत पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. या सर्व मागण्यांशी आपण सहमत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या शिष्टमंडळात पोलीस पाटील संघटनेचे राज्याचे अध्यक्ष भिकाजी पाटील (गोंदिया), उपाध्यक्ष देवीदास भगत पाटील (भूम), सचिव श्रीकृष्ण साळुंके (बीड), अनंता पाटील (रायगड), महादेव पौळ आदींचा समावेश होता.