Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य


नाशिक महापालिकेने खरेदी केलेल्या नवीन घंटागाडय़ांचा वापर आता सुरू होणार असला तरी त्यांच्या
दर्जाबाबत शंका उपस्थित व्हावी, असे हे ‘दे धक्का’ दृश्य. वापर सुरू होण्याआधीच या गाडय़ांना धक्का देण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. माजी महापौर दशरथ पाटील यांनी मंगळवारी या घंटागाडय़ांची पाहणी
केली.

राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वाचेच लक्ष
प्रदूषणकारी मायनिंग व औष्णिक वीज प्रकल्पांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता कमालीची तणावग्रस्त!

अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी, २३ जून

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रदूषणकारी मायनिंग व औष्णिक वीज प्रकल्पाच्या छायेखाली असणाऱ्या गावातील लोकांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभारण्यास प्रारंभ केला आहे. शासकीय महसूल व पोलीस यंत्रणेच्या धाकदपटशाहीमुळे लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे कळणे खाण प्रकरणावरून उघड झाले आहे. सिंधुदुर्गात धाकोरे व मुणगे येथे औष्णिक वीज प्रकल्प तसेच कळणे, तिरोडा व केसरी-फणसवडेसह सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील बरीच गावे तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मायनिंग असल्याने वातावरण कमालीचे तणावग्रस्त बनले आहे.

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या समस्येवर निर्णय अपेक्षित
अलिबाग, २३ जून/प्रतिनिधी

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होऊ घातलेले दगडी कोळशावरील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प ही कोकणवासीयांची वर्तमानातील गंभीर आणि कळीची समस्या आहे. ओरोस येथे उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणवासीयांना त्यावर ठोस निर्णय अपेक्षित आहे. कोकणवासीयांची ही समस्या राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनाही मान्य आह़े

कुलगुरु निवडीवरून मुक्त विद्यापीठात रंगतोय् डावपेचांचा आखाडा !
नाशिक, २३ जून / खास प्रतिनिधी
‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहचविण्याचा वसा घेतलेल्या यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सध्या कुलगुरु निवडीच्या कारणावरून अक्षरश: डावपेचांचा आखाडा रंगू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीगत इच्छुकांकरवी गावगुंडीचे प्रदर्शन होणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पत्ता कट करण्यासाठी समर्थकांचे शिष्टमंडळ वरिष्ठांच्या पुढय़ात दाखल केले जाणे, समोरच्याला वश करण्याकरिता आमिषाचा वापर होणे आदी क्लृप्त्या विद्यापीठस्तरावरही अंमलात येत असल्याची चर्चा विद्यापीठाच्या वर्तुळात सुरु आहे.

नाशिक महापालिका आयुक्तांकडून सुरक्षाररक्षकाचा गौरव
नाशिक, २३ जून / वार्ताहर

समयसूचकता दाखवित मनुष्यहानी रोखणारे महापालिकेतील सुरक्षारक्षक विजय बाबुराव दौडे यांना आयुक्त विलास टाकूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर एक जून रोजी एक नागरिक अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याच्या तयारीत होता. हा प्रकार दौडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रसंगावधान राखून त्या नागरिकाच्या हातातील रॉकेलचा डबा हिसकावून घेतला. त्यानंतर लायटरच्या सहाय्याने तो स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला दौडेने अटकाव केला. त्याच्या या कामगिरीबद्दल आयुक्त ठाकूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. यावेळी उपायुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, सतीश खडके, अधीक्षक अभियंता सुनील खुने आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी संजय मुंदडा
धुळे, २३ जून / वार्ताहर

येथील राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी संजय मुंदडा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या ८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. र. नि. भट हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेची अमेरिकेतील विश्व मराठी साहित्य संमेलनातील उपलब्धी तसेच ‘मराठय़ांच्या इतिहासाची साधने खंड ६ ते ११’ साठी पुणे येथील प्रा. वसंत मूलकर आणि डॉ. एम. बी. शहा यांच्या प्रयत्नाने प्राप्त झालेले अर्थसहाय्य, हिंदी साहित्य समितीव्दारे प्राप्त झालेल्या अर्थसहाय्यासह डॉ. सुमीत शहा यांच्या प्रयत्नांबद्दलची माहिती यावेळी देण्यात आली. संशोधन विभागात डॉ. प्रभाकर गद्रे व क्युरेटर म्हणून इतिहासाचे अभ्यासक श्रीपाद नांदेडकर यांची नियुक्ती झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष म्हणून र. नि. भट व उपाध्यक्ष म्हणून आनंद राजवाडे यांची फेरनिवड करण्यात आली. मुख्य सचिव म्हणून प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे यांची नियुक्ती करण्यात आली.

सिन्नर तालुक्यात अवैध मद्यसाठा जप्त
नाशिक, २३ जून / प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील दोडी येथील एका हॉटेलमधून राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने दमणनिर्मित पाच हजार ८०० रूपयांच्या मद्याचा साठा जप्त करून बस्तीराम सांगळे या संशयितास अटक करण्यात आली आहे. याशिवाय दापूर येथे एका टाटा सुमो गाडीतून विदेशी मद्याच्या ४०८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. मुद्देमालाची किंमत दोन लाख ४६ हजार ३०८ रूपये एवढी असून भिमराज साबळे व मंगेश बेदरकर या संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काच्या नाशिक विभागाने केली.

ताहाराबादजवळ अपघातात चार शालेय विद्यार्थी ठार
सटाणा , २३ जून / वार्ताहर

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही धोकादायक झाल्याचे दिसत असून मंगळवारी सकाळी ताहाराबादजवळ विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार विद्यार्थी जागीच ठार तर आठ जण जखमी झाले. संतापलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त जीप पेटवून देत रास्तारोको केला. अपघातातील मृत व जखमी ताहाराबादच्या मोना इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत. तालुक्यातील निताणे परिसरातील १२ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली अ‍ॅपेरिक्षा सकाळी नऊच्या सुमारास ताहाराबादजवळ पोहोचली असता जीपने तिला धडक दिली. या अपघातात ऋषिकेश संजय देवरे (४) , प्रियंका अनिल देवरे (१०) , ललित अनिल देवरे (६) , रितु उर्फ आकांक्षा राजेंद्र देवरे (९) हे विद्यार्थी जागीच ठार झाले. उर्वरित विद्यार्थी जखमी झाले.

कळणे येथे उपोषण
सावंतवाडी, २३ जून/वार्ताहर कळणे येथील मायनिंग प्रकल्पाबाबत उलटसुलट चर्चा सूरू करून सरपंच सुनीता भिसे व इतरांविरोधात पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात कळणे मारुती मंदिरात तीन दिवसांच्या उपोषणास प्रारंभ झाला आहे. पालकमंत्री नारायण राणे आणि कंपनीने घेतलेल्या भूमिका, तसेच अधिकाऱ्यांची मवाळ भूमिका, यावर उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.