Leading International Marathi News Daily
बुधवार, २४ जून २००९
  संस्कृत का व कशासाठी?
  करिअर नामा
टेक्निकल अ‍ॅनालिस्ट
  करिअर सल्ला
मान्यताप्राप्त महाविद्यालय कसे ओळखावे?
  मार्केटिंगमधील करिअरची जादू
  झोकून देण्याची कला
  स्कॉलरशीप
दहावीनंतर उपलब्ध असलेली प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
एसआयए यूथ स्कॉलरशिप
  इलेक्ट्रॉनिक्स संसाधननिर्मिती क्षेत्रात करिअर
  मिशन सीईटी.. इंग्रजीमधून
The Health Science Admissions

गीर्वाणवाणी, देवभाषा म्हणून प्रत्येक भारतीयाला संस्कृत भाषेविषयी आदर, प्रेम, उत्सुकता, कुतूहल, आकर्षण अथवा भीती वाटते. ‘विना संस्कृत नैव संस्कृति: किंवा संस्कृति: संस्कृताश्रिता’ इ. वचनांनी प्रत्येक भारतीय भारावून जातो. ‘संस्कृति: संस्कृताश्रिश्रा’ हे सत्य आहे. म्हणूनच ज्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यात रुची आहे व ज्यांना भाषा या विषयात करिअर करायची आहे, त्यांच्यासाठी संस्कृत हा चांगला पर्याय ठरू शकतो. संस्कृत वाचता येणे, समजणे आवश्यक आहे. ‘यदिहास्ति तदन्यत्र, यन्न्ोहास्ति न तत् क्वचित’ या महाभारतीय उक्तीनुसार संस्कृत भाषेत विश्वातीत समग्र ज्ञानभांडार भरलेले आहे. विविध ज्ञानशाखा, बहुविध शास्त्रे आणि उपयोजित व्यवसाय यांच्याविषयीची माहिती प्राचीन ऋषि-मुनींनी संस्कृत ग्रंथामधून लिहून ठेवली आहे. वैद्यकशास्त्र (चिकित्सा+ शल्यकर्म) निरामय जीवनासाठी आवश्यक कामशास्त्र, सांस्कृतिक जीवनाचे आधारभूत ठरलेले स्थापत्यशास्त्र, शिल्पशास्त्र, संगीतशास्त्र, नाटय़शास्त्र, जीवनमान सुस्थापित करणारे धर्मशास्त्र, अर्थशास्त्र,
 

अनेक गूढ प्रश्नांची उकल करू पाहणारे अध्यात्मशास्त्र, बौद्धिक आलेख उंचावणारी विविध दर्शने, इतिहास, पुराणे, काव्यनाटकादी साहित्यकृती.. ही यादी संपतच नाही. मनुष्यजीवनाचे प्रत्येक अंग परिपूर्ण करणारे शास्त्रग्रंथ संस्कृतात आहेत. संस्कृतच्या अध्ययनाने हे अक्षय ज्ञानभांडार ‘तिळा उघड’प्रमाणे दृग्गोचर होईल व हा गुप्त खजिना पाहून आपण विस्मयचकित होऊ.
संस्कृत विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर शाळा, महाविद्यालये यांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये संधी उपलब्ध होते. याशिवाय संशोधन क्षेत्रामध्येदेखील चांगली संधी प्राप्त होऊ शकते.
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे एम. ए., एम. फिल्. पीएच.डी. हे पारंपरिक अभ्यासक्रम आणि सर्टिफिकेट कोर्स इन संस्कृत, डिप्लोमा कोर्स इन संस्कृत असे विविध अभ्यासक्रम राबविले जातात. याच्या जोडीला मायथोलॉजी, मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी असे इतरही अभ्यासक्रम शिकविले जातात. यांची माहिती पुढीलप्रमाणे-
अभ्यासक्रम १ : एम. ए.- बी. ए. ची पदवी संस्कृतमधून घेतल्यानंतर विद्यार्थी एम. ए.ला प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय जे अन्य विषयांचे पदवीधर आहेत व ज्यांना संस्कृत शिकण्याची रुची आहे, ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून एम. ए. ला प्रवेश घेऊ शकतात. या वर्षी प्रवेश परीक्षेची तारीख २७ जून आहे. नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी शनिवार-रविवार विशेष वर्ग घेतले जातात.
अभ्यासक्रम २ - ३ : एम. ए. केल्यानंतर एम. फिल., पीएच.डी. या संशोधनात्मक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो.
अभ्यासक्रम ४ : मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी- हस्तलिखितशास्त्र
केवळ जुन्या पोथ्या म्हणून दुर्लक्षित केलेली बाडे अनेकदा महत्त्वाचे दस्तऐवज असतात. त्यातील मजकूर न समजल्यामुळे अशा पोथ्या, दस्तऐवजांची आपल्याकडून उपेक्षा होते. परंतु अशा प्रकारची हस्तलिखिते हा भारतीयांचा अमोल ठेवा असल्याचे पाश्चात्त्यांनीदेखील मान्य केले आहे. अशा हस्तलिखितांचा अभ्यास करण्याचे एक स्वतंत्र शास्त्र असून त्याला हस्तलिखितशास्त्र (मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी) असे म्हणतात. आपल्या अमोल वारशाचे जतन व्हावे या हेतूने भारत सरकारनेसुद्धा हस्तलिखित शास्त्राच्या अभ्यासास सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्यासाठी नॅशनल मिशन ऑफ मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी अशी संस्थाही निर्माण करण्यात आली आहे. या संस्थेत कार्य करण्यासाठी सक्षम विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे हस्तलिखितशास्त्रामध्ये प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका असे तीन अभ्यासक्रम चालतात. हे अभ्यासक्रम सामान्यत: जुलै महिन्यात सुरू होतात त्यांचा कालावधी प्रत्येकी सहा महिन्यांचा आहे.
अभ्यासक्रम ५ : मायथोलॉजी- पुराकथाशास्त्र
याचबरोबर पुराकथाशास्त्रांचे तौलानिक अध्ययन असाही एक पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्कृत विभागातर्फे चालविण्यात येतो. पुराकथा हा वास्तविक जगातील प्रत्येक देशाचा मानबिंदू आहे. कारण तो त्या त्या देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो. विविध देशांतील पुराकथांच्या अध्ययनाचे सुविहित शास्त्र असून त्याचा एक वर्षांचा अभ्यासक्रम शिकविणारा मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग अद्वितीयच म्हणावा लागेल. या वर्षांपासून पुराकथाशास्त्रातील प्रगत पदविकाही सुरू होणार आहे. हे अभ्यासक्रम जुलै ते एप्रिल या काळात पूर्ण केले जातात.
अभ्यासक्रम ६ : संस्कृत प्रमाणपत्र व संस्कृत पदविका
‘नैव क्लिष्टा न च कठिना’ समजली जाणारी गीर्वाणवाणी संस्कृत आपल्याला समजावी असे प्रत्येक भारतीयाला वाटते, या आकांक्षेने प्रेरित झालेल्या, आरंभापासून संस्कृत शिकण्याची इच्छा असलेल्यांसाठी संस्कृत प्रमाणपत्र व संस्कृत पदविका हे दोन अभ्यासक्रम जुलै-एप्रिलदरम्यान प्रत्येक शनिवारी चालविले जातात. संस्कृत संभाषणही यात अंतर्भूत आहे.
संस्कृत शिकल्याने भाषाशुद्धी व उच्चारणशुद्धी होते, शब्दसंपत्ती वाढते, अन्य भारतीय भाषा सुलभतेने आत्मसात करता येतात, संस्कृतातील विविध विषयांच्या ज्ञानभांडाराने बुद्धीचा विकास होतो, प्राचीन परंपरांचे मूल्यमापन व जतन करण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान मिळते. तौलनिक अध्ययनाचा पाया पक्का होतो. आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रसंस्था, चित्रपटसंस्था तसेच पुरातत्त्व संग्रहालये, ग्रंथालये इत्यादी ठिकाणी संस्कृत जाणणाऱ्या व्यक्तींची नेहमीच आवश्यकता भासते. ककळ, ळकाफ सारख्या प्रगत संस्थांमध्येही संस्कृत व विज्ञानासंबंधी प्रकल्पांमध्ये होतकरू संशोधक म्हणून संस्कृतज्ञाला मागणी असते, अशा प्रकारे विविध अभ्यासक्रमातून संस्कृत विभाग भविष्यकालीन संशोधक, शिक्षक, निवेदक घडवीत आहे.
या सर्व अभ्यासक्रमांत मिळून प्रतिवर्षी सुमारे २५० विद्यार्थी विभागात शिक्षण घेतात. संस्कृत विभागाद्वारे अनेकविध कार्यक्रम देखील राबविले जातात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि अधिवेशने आयोजित केली जातात. प्रतिवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन होते. संस्कृत दिनानिमित्त संस्कृत सप्ताह साजरा केला जातो. त्यामध्ये संस्कृतमधून विविध गुणदर्शन केले जाते. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतली जाते.
संस्कृत विभागातील विद्यार्थीही संशोधनात अग्रेसर आहेत. विद्यार्थ्यांसाठी आयोजित चर्चासत्रे किंवा संशोधन प्रकल्प स्पर्धामध्ये ते चमकदार कामगिरी करून संस्कृत विभागाचे नाव उज्ज्वल करतात. अशा प्रकारे संस्कृत विभाग सर्व दृष्टीने प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे.
अशा प्रकारच्या संस्कृत व संस्कृती- संवर्धनाच्या विविध उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे आणि आपले राष्ट्रीय ऋण अंशत: फेडण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे संस्कृत विभागाच्या विस्ताराला उपकारक होईल अशा प्रकारे रामकृष्ण बजाज संस्कृत भवनाचे बांधकाम मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात सध्या सुरू आहे. विद्यापीठाने भवनासाठी जागा दिली असून जमनालाल बजाज
ट्रस्ट व मुंबई विद्यापीठाने संयुक्तपणे
याचा आर्थिक भार उचलला आहे. अशा प्रकारे संस्कृतसाठी विद्यापीठाच्या परिसरात भवन उभे करणारे मुंबई विद्यापीठ पहिलेच असेल.


कनिष्ठ म्हणजे अकरावी- बारावीला संस्कृत विषय देणारी महाविद्यालये-
१) विल्सन कॉलेज - चर्नीरोड
२) साठय़े कॉलेज - विलेपार्ले
३) रुपारेल कॉलेज - माटुंगा
४) वझे कॉलेज - मुलुंड
५) पेंढारकर कॉलेज - डोंबिवली
६) झुनझुनवाला कॉलेज - घाटकोपर
७) एस. आय. इ. एस. कॉलेज - सायन
बी.ए.ला तीन पेपर्स संस्कृत शिकविणारी महाविद्यालये-
१) पाटकर कॉलेज - गोरेगाव
२) सोमाणी कॉलेज (भवन्स) - चर्नीरोड
बी.ए.ला सहा पेपर्स संस्कृत् शिकविणारी महाविद्यालये-
१) के. जे. सोमय्या आर्टस आणि कॉमर्स- विद्याविहार
२) रामनारायण रुइया कॉलेज - माटुंगा
३) जोशी बेडेकर कॉलेज - ठाणे
४) आर. पी. गोगटे कॉलेज - रत्नागिरी
बी.ए.ला संस्कृत शिकविणाऱ्या या महाविद्यालयांमध्ये अकरावी व बारावीसाठी संस्कृत शिकविले जाते.
डॉ. गौरी माहुलीकर
संस्कृत विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ.