Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

क्रीडा

व्हीनस, डेव्हीडेन्को, यान्कोविचची आगेकूच
विम्बल्डन, २३ जून/पीटीआय

निकोलाय डेव्हीडेन्को, व्हीनस विल्यम्स व येलेना यान्कोविच या मानांकित खेळाडूंनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आज शानदार विजय नोंदवित दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. पुरुष गटात १२ वे मानांकन लाभलेल्या डेव्हीडेन्को याने स्थानिक खेळाडू डॅनियल इव्हान्स याचा ६-२, ६-३, ६-३ असा धुव्वा उडविला. त्याने फोरहॅंड परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. त्याने केलेल्या वेगवान सव्‍‌र्हिसेसला प्रतिस्पध्र्याकडून फारसा प्रतिकार झाला नाही. तीनही सेटमध्ये प्रत्येकी दोन वेळा डेव्हीडेन्को याने सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. याच गटात लिओनार्द मेयर यानेही दणदणीत विजय मिळविला.

गंभीरची ‘फिंगर टिप्स्’ आफ्रिदीला फळली
विनायक दळवी
मुंबई, २३ जून

२००६-०७ च्या भारत पाकिस्तान मालिकेत गौतम गंभीर आणि शाहीद आफ्रिदी यांच्यात चांगलीच जुंपली होती. क्रिकेट मैदानाबाहेरही त्या वादाचे पडसाद उमटले होते. हेच दोन खेळाडू कधी एकमेकांचे हितचिंतक होतील, असे त्या वेळी वाटले नसते. २००९ साली मात्र हे चित्र एकदम पालटले आहे. गौतम गंभीरने आफ्रिदीला फलंदाजीतील काही महत्त्वाचे सल्ले दिले. ज्यामुळे आफ्रिदी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपान्त्य व अंतिम फेरीत चमकला.

गोलंदाजांना मान देण्याची आफ्रिदीला झाली जाणीव
कराची, २३ जून/ पीटीआय

शाहिद आफ्रिदी म्हटलं की, हातामध्ये असलेली बॅट गोलंदाजांना बडविण्यासाठी आहे अशी धारणा असलेला गोरा गोमटा ‘पठाणी’ चेहरा डोळयासमोर येतो. हातातल्या बॅटने प्रत्येक चेंडूचा समाचार घ्यायचा हीच फक्त गोष्ट त्याच्या डोक्यात पूर्वी असायची आणि म्हणूनच त्याची बॅट लागली तर लागायची, नाहीतर तो शून्यावरही तंबूत परतायचा. त्यावेळी संघाला आपली किती गरज आहे हा विचार तो करायचाही नाही. पण या विश्वचषकात त्याच्यामध्ये झालेला बदल पाहायला मिळाला. यावेळी आफ्रिदी एक ‘मॅच्युअर’ खेळाडू वाटला.

गेलने घेतलाय टीम इंडियाचा धसका
किंग्जस्टन, २३ जून/ पीटीआय

भारतीय संघाचा ट्वेन्टी-२० विश्वचषकात दारूण पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि सुरेश रैना यांच्या अनुपस्थीतीमध्ये खेळणार आहे. तरी देखील वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेलने आगामी एकदिवसीय मालिकेसाठी ‘टीम इंडियाचा’ धसका घेतलाय. भारतीय संघामध्ये कोणत्याही पस्थिीतीमध्ये पुनरागमन करायचा दम असून त्यांना ‘अंडरडॉग्ज’ समजणे ही आमची घोडचूक ठरेल, असे मत गेलने व्यक्त केले आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू विमानतळावरूनच गायब; क्रिकेटचाहत्यांची निराशा
कराची, २३ जून / वृत्तसंस्था

ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धा जिंकून मायदेशी परतलेल्या पाकिस्तानच्या संघाचे स्वागत करता न आल्याने येथील विमानतळावर जमलेल्या हजारो पाकिस्तानी चाहत्यांच्या पदरात घोर निराशा पडली. इंग्लंडहून येथील अल्लामा इक्बाल विमानतळावर दाखल झालेल्या पाकिस्तान संघाला थेट पाकिस्तान क्रिकेट अकादमीत नेण्यात आले.आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी जमलेल्या क्रिकेट शौकिनांना ही गोष्ट कळल्यावर त्यांच्या निराशेची जागा संतापाने घेतली.

सायनाची मलेशियन ओपनमध्ये आज सलामी
नवी दिल्ली, २३ जून / पीटीआय

इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद पटकाविणारी सायना नेहवाल उद्यापासून सुरू होत असलेल्या मलेशियन ओपन ग्रां प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा तसाच इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. द्वितीय मानांकित सायनाची सलामीच्या सामन्यात थायलंडच्या ३९व्या मानांकित पोर्नटिप बुरानाप्रासरत्सुक हिच्याशी गाठ पडणार आहे. भारताची आदिती मुटाटकरची सिंगापूरच्या मिंगतियान फु हिच्याशी गाठ पडेल तर पुरुषांमध्ये चेतन आनंद, अरविंद भट्ट, १६वा मानांकित अनुप श्रीधर यांच्या मोहिमेलाही उद्या सुरुवात होईल. दरम्यान, पी. कश्यप आपली सातत्यपूर्ण कामगिरी इथेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. स्पॅनिश ओपन व ओपन वोलॅन्ट डीओर स्पर्धात चमकदार कामगिरी करून कश्यपने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला होता. आनंद पवार, अजय जयराम यांच्याही सलामीच्या लढती उद्या होणार आहेत. मिश्र दुहेरीत प्रथम मानांकित व्ही. दिजू व ज्वाला गट्टा यांची पहिली लढतही उद्याच रंगणार आहे.

युनूसचा निर्णय दुर्दैवी - मांजरेकर
नवी दिल्ली, २३ जून / पीटीआय
युनूस खानने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा त्याग करण्याचा निर्णय दुर्दैवी असून त्याचा पाकिस्तान क्रिकेटवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे मत भारताचा माजी कसोटीपटू व सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेला संजय मांजरेकर याने व्यक्त केले आहे. मांजरेकरने म्हटले आहे की, पाकिस्तानमधील क्रिकेट सध्या सावरण्याच्या स्थितीत असताना युनूसने घेतलेला हा निर्णय धक्कादायक आहे. पाकिस्तानला सध्या उत्तम नेतृत्वाची गरज आहे. २००७च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इन्झमामच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ प्राथमिक फेरीतच बाद झाल्यानंतर युनूसने संघाचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला होता. त्याची ही धक्कादायक निर्णय घेण्याची पद्धत जुनीच आहे, असे मांजरेकरला वाटते.
युनूसने कर्णधारपदी राहावे - मियाँदाद
कराची - कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा युनूस खानने घेतलेला निर्णय त्याने मागे घ्यावा व पुन्हा एकदा हे पद भूषवावे. त्याच्या उपस्थितीमुळे पाकिस्तान संघ पुढील विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत विजेतेपद आपल्याकडेच राखू शकेल शिवाय २०११च्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही विजेतेपद पटकावून शकेल, असे मत पाकिस्तान बोर्डाचे महासंचालक जावेद मियाँदाद यांनी व्यक्त केले आहे.

संक्षिप्त क्रीडावृत्त
व्हिसाच्या समस्येमुळे तीन भारतीय क्रिकेटपटू अजूनही भारतातच
मुंबई: वेस्ट इंडिजमधील चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय खेळाडू रवाना झाले असले तरी मुंबईचा अभिषेक नायर, तामिळनाडूचा मुरली विजय व सुब्रमणीयम बद्रिनाथ या खेळाडूंना मात्र अद्याप व्हिसा न मिळाल्याने प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार या खेळाडूंना लंडनहून वेस्ट इंडिजला जाण्यासाठी ब्रिटनचा ट्रान्झिट व्हिसा मिळालेला नाही. नायर आणि मुरली विजय यांच्या व्हिसाची प्रक्रिया पूर्ण झाली असून बद्रिनाथला अजूनही व्हिसा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, अभिषेक व विजय यांना व्हिसा मिळाला असून ते आज रात्री लंडनला रवाना होतील तर बद्रिनाथ उद्या निघणार आहे. अभिषेक आणि विजय उद्या सायंकाळी जमैकाला पोहोचतील. इतर खेळाडू मात्र वेस्ट इंडिजला इंग्लंडमधील ट्वेन्टी-२० स्पर्धा संपल्यानंतरच रवाना झाले आहेत. तेथे त्यांचा सरावही सुरू आहे.

बांगलादेश क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मशर्रफ मोर्तझा
ढाका: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज मशर्रफ मोर्ताझाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मोहम्मद अश्रफूलच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाला सुपर एट फेरी गाठण्यात अपयश आले. जून २००७ मध्ये वयाच्या २२व्या वर्षी मोहम्मद अश्रफूलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.

अंधांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मदन बागायतकरला जेतेपद
मुंबई: ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड मराठवाडा स्पोर्ट्स कौन्सिल फॉर दि ब्लाइंड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू गोविंदसिंग स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंधांच्या राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या मदन बागायतकरने ७ पैकी ७ गुण मिळवून विजेतेपद पटकाविले, तर सातारा येथील अतुल काकडे उपविजेता ठरला. मुंबई येथील दीपक नेवासकर याने तृतीय स्थान प्राप्त केले. या व्यतिरिक्त वयाची पर्वा न करता ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नारायण पुरव मुंबई यांनीही स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी डी. पी. सावंत, सचिव शारदा भुवन शिक्षण संस्था, नांदेड तर प्रमुख अतिथी म्हणून डी. पी. सिंग अधीक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड, प्रमुख पंच मा. दीपक आडे, मदन बागायतकर (ऑल इंडिया चेस फेडरेशन) व इतर मान्यवर मंडळ उपस्थित होती.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राची पाच सुवर्णपदकांची कमाई
जयपूर २३ जून/पीटीआय

राष्ट्रीय जलतरण स्पर्धा महाराष्ट्राची पाच सुवर्णपदकांची कमाईकाव्या भांडेकर हिने विक्रमासह मिळविलेल्या सुवर्णपदकांसहीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आज पहिल्या दिवशी पाच सुवर्ण, दोन रौप्य व तीन ब्रॉंझपदकांची कमाई केली.
भांडेकर हिने मुलींच्या १४ वर्षांखालील गटात १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यत १ मिनिट ९.४४ सेकंदात पार करीत आपलीच सहकारी जोत्स्ना पानसरे हिने नोंदविलेला १ मिनिट १० सेंकंदाचा विक्रम मोडला. पानसरे हिने १७ वर्षांखालील गटात आज १०० मी.बॅकस्ट्रोक शर्यत जिंकताना १ मिनिट १०.५६ सेकंद वेळ नोंदविली. याच वयोगटात महाराष्ट्राच्या पूर्वा शेटय़े हिने १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. तिने हे अंतर १ मिनिट २०.७० सेकंदात पूर्ण केले.