Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राजा आला, पण प्रजेची पाटी कोरीच !
जयेश सामंत
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीकडे अक्षरश डोळे लावून बसलेल्या नवी मुंबईतील सिडकोच्या निकृष्ट इमारतींमध्ये रहाणाऱ्या सुमारे ५२ हजारांहून अधिक कुटुंबांचा सोमवारी पुन्हा भ्रमनिरस झाला. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राजा आला, तर काही तरी देऊन जाईल, अशी भाबडी अपेक्षा बाळगणाऱ्या या रहिवाशांच्या पदरात तीच ती जुनी आश्वासने पडली. उल्हासनगर, धारावीसारख्या अनधिकृत बांधकामांच्या पुनर्बांधणीसाठी सरकार एकीकडे चार एफएसआयची खैरात करते, पण ऐरोली, वाशीपासून बेलापूपर्यंत पसरलेल्या नवी मुंबईतील निकृष्ट इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अजूनही सरकारने फारसा गांभीर्याने घेतलेला नाही, हेच मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात दिसून आले.

ठाणे शिक्षण मंडळाचा नियोजनशून्य कारभार
पाऊस सरताना रेनकोट!
दिलीप शिंदे
प्रशासन आणि शिक्षण मंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सातत्याने खालावत असून सकस आहार, गणवेषासह पुरविण्यात येणाऱ्या अन्य सुविधांमधील सावळागोंधळ विद्यार्थ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्यात नव्याने भर पडेल ती रेनकोट योजनेची. अर्थसंकल्पात तरतूद नसताना या वर्षी पहिल्यांदाच सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना दीड कोटी रुपये खर्चून रेनकोट पुरविण्याचा घाईघाईने निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ठेकेदार निश्चितीत घोळ झाल्याने ऐन पावसाच्या मोसमात विद्यार्थ्यांना रेनकोट मिळणार नाहीत.

भूखंडांचे श्रीखंड खाण्याचा डाव फसला
फेरप्रस्ताव सादर करण्याचे महापौरांचे आदेश

ठाणे/प्रतिनिधी : ठाणे महापालिका क्षेत्रात दर्जेदार शैक्षणिक सुविधा विकसित करण्यासाठी शैक्षणिक प्रयोजनार्थ आरक्षित असलेले भूखंड राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्थांच्या घशात घालून, त्याचे श्रीखंड खाण्याचा प्रशासनाचा डाव मंग़ळवारी सर्वसाधारण सभेत हाणून पाडण्यात आला. पालिका क्षेत्रात प्रश्नथमिक शाळांसाठी ४६, माध्यमिक शाळांसाठी १४, महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन यासाठी प्रत्येकी एक, असे ६२ भूखंड आरक्षित आहेत.

ठाणे महापालिकेत गुंड आणि बंदुकीच्या धाकाने टेंडर सेटिंग!
ठाणे /प्रतिनिधी

गुंड आणि बंदुकीच्या दहशतीखाली भरदिवसा ठाणे पालिका मुख्यालयात टेंडर सेटिंग केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. मुंब्रा विभागातील साडेपाच कोटींचे काम मिळविण्यासाठी याच विभागातील ठेकेदार नगरसेवकांनी अनेकांना धमकावून निविदा भरण्यास मज्जाव केल्याच्या प्रकाराने पालिकेत खळबळ उडाली असून पोलिसांना पाचारण करून या गुंडांना पिटाळून लावण्यात आले.

त्रिसदस्यीय समिती ठरवणार ठामपा शिक्षण मंडळाचे भवितव्य!
ठाणे/प्रतिनिधी: ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ४० ते ४५ हजार विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक भविष्य ठरविणाऱ्या शिक्षण मंडळाचेच भवितव्य अडचणीत आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळातील सदस्यांची पात्रता तपासण्यासाठी राज्य सरकारने एक त्रिसदस्यीय समिती गठित केली असून, या समितीच्या अहवालावरच सदस्यांचे आणि शिक्षण मंडळाचे भवितव्य ठरणार आहे.

आश्रमशाळांमधील ‘मानसेवी’ शिक्षकांच्या मानधनात वाढ
वाडा/वार्ताहर

शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये तासिका (मानसेवी) पद्धतीवर काम करणाऱ्या प्रश्नथमिक शिक्षकांना यापूर्वी मंजूर केल्याप्रमाणे वाढीव मानधन देण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले. आमदार रामनाथ मोते यांनी ‘मानसेवी’ शिक्षकांच्या मानधनाचा विषय गेली तीन वर्षे सातत्याने विधिमंडळामध्ये लावून धरला होता.

विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी ‘‘स्व’यत्नमाला’ हा उत्तम उपाय - सुधीर जोगळेकर
डोंबिवली/प्रतिनिधी - अति गुणांच्या हव्यासापोटी पालक, शिक्षक आणि संस्थाचालक हे विद्यार्थ्यांवर अधिक अभ्यासाचा भार टाकून विद्यार्थ्यांना तणावग्रस्त करतात. या तणावातून मुक्त होण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेने तयार केलेला ‘स्व’यत्नमाला हा प्रश्नसंच उत्तम उतारा आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी शनिवारी येथे केले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेने तयार केलेल्या ‘स्व’यत्नमाला या प्रश्नपेढीचे प्रकाशन डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

२१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भेटले शाळुसोबती..
ठाणे प्रतिनिधी

अंबरनाथ येथील भाऊसाहेब परांजपे हायस्कूलमध्ये १९८७-८८ च्या शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे संमेलन अलिकडेच शाळेतील डॉ. हेडगेवार सभागृहात संपन्न झाले. त्या बॅचच्या सध्या अंबरनाथमध्येच राहत असलेल्या सात-आठ विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या संमेलनासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्र आणले. त्यावेळी दहावीला शाळेतून १८० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२० विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ शकला आणि प्रत्यक्षात ८० विद्यार्थी संमेलनास उपस्थित राहिले. त्याचबरोबर पुणे-ठाणे परिसरातून त्यावेळचे शिक्षकही या संमेलनास आवर्जून उपस्थित राहिले. अशा रीतीने २१ वर्षांपूर्वीचे शाळुसोबती आणि शिक्षक पुन्हा एकदा एकत्र आले. संस्थेचे पदाधिकारीही या संमेलनास उपस्थित होते. विद्यमान मुख्याध्यापक मोरे यांनी शाळेच्या वाटचालीविषयी सांगितले. माजी विद्यार्थिनी मीनल देवस्थळी हिने कार्यक्रमाची संकल्पना मांडली. सुशील दलाल, रूपा देसाई, गीता कुलकर्णी, प्रसाद मुदवेडकर, प्रश्नंजल राऊत, मंदार नाटेकर, कांचन आळेकर, स्वप्नील राजे आदी माजी विद्यार्थ्यांनी संमेलन घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भावे सांस्कृतिक केंद्राची पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी
शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी डोंबिवलीतील पु. भा. भावे समाजकल्याण व सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, खासदार आनंद परांजपे, उपजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर रमेश जाधव, सभापती वामन म्हात्रे, शहरप्रमुख शरद गंभीरराव, नगरसेवक सदानंद थरवळ, सोपान पाटील उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी भावेंच्या वास्तूची पाहणी करून येथील मंडल कार्यालयाचे स्थलांतर, साहित्य संस्थांना उपलब्ध करून देण्याची सुविधा, या वास्तूची डागडुजी, रंगरंगोटी याविषयी विचारविनिमय करण्यात आला. ही वास्तू इतर अडगळीतून मुक्त होईल, यासाठी महापौर जाधव व सभापती म्हात्रे यांनी लक्ष घालावे, असे शिंदे यांनी सूचित केले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी भावे सभागृह वास्तूप्रकरणात लक्ष घातल्याने व ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण लावून धरल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली.

कल्याणच्या वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल्स मिळणार
कल्याण/वार्ताहर : सॅटिसच्या नावाखाली कल्याणातील वृत्तपत्रांचे स्टॉल उद्ध्वस्त केल्याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारत ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष कैलाश म्हापदी आणि कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने यशस्वी शिष्टाई केली. यावेळी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी या विक्रेत्यांना लवकरच ठाण्याच्या धर्तीवर हक्काचे स्टॉल देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. याबाबत लवकरच विक्रेत्यांची अधिकृत यादी पालिकेकडे नाव-पत्त्यासह सादर करावी. तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा विषय महासभेच्या विषय पत्रिकेवर घेऊन या प्रश्नावर पालिकेची मंजुरी घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिले.चर्चेतोंच्यासह सरचिटणीस अजित पाटील, कल्याण शहर वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष उदय तिवारी, सरचिटणीस सुधीर कश्यप, कल्याण पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे, डोंबिवली पत्रकार संघाचे शंकर जाधव, संतोष गायकवाड आदींनी भाग घेतला.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघातर्फे चारही खासदारांचा सत्कार
बदलापूर/वार्ताहर: ठाणे जिल्ह्यातील चारही खासदारांचा सत्कार उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली.
कल्याण येथील सार्वजनिक वाचनालय सभागृहामध्ये शनिवार, २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता महापौर रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आनंद परांजपे, संजीव नाईक, सुरेश टावरे, बळीराम जाधव या चार खासदारांचा सत्कार होणार आहे.संसदेमध्ये ३ जुलै रोजी सादर करण्यात येणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या सत्काराला महत्त्व आले आहे. मुंबई रेल प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मधु कोटियन यांच्या हस्ते उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या सर्वंकष मागण्यांचा जाहीरनामा यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सर्व खासदारांनी संघटितपणे आवाज उठवावा, अशी महासंघातर्फे शेलार यांनी मागणी केली आहे.

एक कोटीची वीजचोरी पकडली
ठाणे/प्रतिनिधी : वीजचोरांविरोधात महावितरणने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत भांडुप परिमंडळात आतापर्यंत ६२७ प्रकरणांत एक कोटी १५ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून, ९३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महावितरणचे कार्यकारी संचालक सुभाष ठाकूर आणि व्यवस्थापकीय संचालक अजय महेता यांच्या आदेशान्वये १५ ते ३० जूनदरम्यान वीजचोरी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत भांडुप परिमंडळातील ठाणे सर्कलमध्ये वीजचोरीची ३०९ प्रकरणे उघडकीस आली असून, त्यात ५४ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली आहे, तर वाशी सर्कलमध्ये ३१८ प्रकरणांत ६१ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली. ही कारवाई भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता रमेश घोलप व दिनेश साबू यांनी केली. विशेष म्हणजे पनवेल शहर विभागाच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी न्हावा पोलिसांच्या मदतीने शेलघर येथील स्टोन क्रशवर रात्री छापा टाकून २०.८९ लाखांची वीजचोरी पकडली.

विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
ठाणे- येथील बाह्मण सेवा संघातर्फे ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या तसेच पालिका क्षेत्रात शिकणाऱ्या गरजू व होतकरू कनिष्ठ व वरिष्ठ महाद्यिालयीन विद्यार्थ्यांना मदत देण्यात येते. मदतीचे अर्ज १ ते १५ जुलै या कालावधीत सोमवार ते शनिवार दरम्यान मिळणार आहेत. संपर्क- २५३८९०६४.