Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

व्यक्तिवेध

भारतीय बँकर अजयपाल बांगा हे त्यांना ‘मास्टर कार्ड’ने वार्षिक ९० कोटी रुपये पगाराची ऑफर दिल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत. एवढा पगार घेणारी ही व्यक्ती कोण, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडेल. मात्र देशाच्या व आता जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात बांगा यांचे नाव सर्वाना परिचित आहे. जगातली आत्तापर्यंतची गलेलठ्ठ पगाराची ही नोकरी ठरली आहे. यापूर्वी ‘अमेरिकन एक्स्प्रेस बँक’चे सीईओ केनेथ शेनॉल्ट आणि सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडित हे सर्वाधिक पगार मिळविणारे अधिकारी ठरले होते. अजयपाल बांगा हे सध्या सिटी ग्रुपमध्ये एशिया-पॅसिफिकचे प्रधान कार्यकारी अधिकारी-

 

सीईओ- म्हणून कार्यरत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी ते ‘मास्टर कार्ड’मध्ये प्रेसिडेंट अणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून सूत्रे स्वीकारतील. मास्टर कार्डबरोबर त्यांनी केलेल्या करारानुसार, त्यांना २० लाख १५ हजार अमेरिकन डॉलर (सुमारे १० कोटी रुपये) एवढे वेतन आणि इतर भत्ते मिळून एक कोटी ५९ लाख डॉलर (सुमारे ८० कोटी रुपये) मिळणार आहेत. यात त्यांना मिळणाऱ्या ४२ लाख डॉलरच्या बोनसचाही समावेश असेल. दिल्लीत वाढलेल्या बांगा यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतच झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. केल्यावर अहमदाबाद येथील आय.आय.एम.मध्ये त्यांनी व्यवस्थापनात उच्च शिक्षण घेतले. १९८१ मध्ये बांगा यांनी नेस्लेमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने ते पेप्सीको या कंपनीत विपणन संचालक म्हणून दाखल झाले. पेप्सीकोमध्ये असताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. प्रामुख्याने फ्राइड चिकन रेस्टॉरंट उशीरापर्यंत खुले ठेवण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेशी संघर्ष करावा लागला. भारतात पिझ्झा हट आणि के.एफ.सी. ही दोन उत्पादने आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या कंपनीत बांगा फार काळ रमले नाहीत परंतु त्यांना या कंपनीत मिळालेला अनुभव फार मोलाचा होता. १९९६ मध्ये ते सिटीबँकमध्ये भारतात दाखल झाले. पुढील दोन वर्षांतच ते बँकेच्या युरोप, मध्य-पूर्व, आफ्रिका व भारतीय उपखंडात उपभोक्ता विभागाचे प्रमुख झाले. २००२च्या प्रारंभी ते उत्तर अमेरिकेतील रिटेल बँकिंगचे प्रेसिंडेंट होते. त्यांनी या काळात बँकेचा व्यवसाय झपाटय़ाने वाढविला. बँकेचा विस्तार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी बँकेचा व्यवसाय अल्पावधीत दुपटीने वाढविला. २००५ साली गोल्डन स्टेट बँक, फर्स्ट अमेरिकन बँक या दोन बँका ताब्यात घेण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बँकेचा उपभोक्ता विभाग त्यांनी अल्पावधीत वाढवून दाखविला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना बढतीही वेगाने मिळत गेली. सिटी बँकेच्या एशिया पॅसिफिक विभागाचे ते सध्या प्रधान कार्यकारी अधिकारी आहेत. या विभागात सिटी बँकेची वृध्दी करून दाखवून त्यांनी अनेकांना आश्चर्यचकित केले. सिटीच्या कार्यकारी समिती व ज्येष्ठ नेतृत्त्वात त्यांचा समावेश होतो. २००५ ते ०८ या काळात बांगा सिटीच्या आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल कन्झ्युमर ग्रुप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सिटी बँकमध्ये त्यांनी जबाबदारीची अनेक पदे सांभाळली आहेत. विविध बँकेच्या शाखांचा विकास करण्याबरोबर त्यांनी स्थावर मालमत्ता क्षेत्रे, व्यापारी अर्थसहाय्य, भूभाग भाडेपट्टीने तसेच तारण तत्त्वावर देण्याच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांत मोठय़ा भूमिका पार पाडल्या आहेत. शैक्षणिक कर्ज, विविध वित्तीय सेवा या क्षेत्रांतील कंपन्यांना अधिकारपदावरून त्यांनी मार्गदर्शन केले. परदेशातल्या करिअरला ब्रुसेल्स येथून सुरुवात करून आता जगभरात प्रसिद्ध झालेला, बँकिंग उद्योगात विविध क्षेत्रात आणि विविध पातळ्यांवर काम केलेला त्यांच्यासारखा अधिकारी विरळाच. एवढी वर्षे परदेशात राहूनही त्यांनी भारतीय मातीशी आपले नाते कायम टिकविले. परदेशांत विविध भारतीय संघटनांशी संबंध राखले. अशा चतुरस्र नेतृत्वाला मास्टर कार्डने जगातला सर्वाधिक पगार देऊ करत आपल्या व्यवसायात सामावून घेणे हा त्यांच्या आजवरच्या कामगिरीचा उचित सन्मान म्हटला पाहिजे.