Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सत्यसाई सेवा समितीची जलसेवा
यवतमाळ, २३ जून / वार्ताहर

 

भीषण पाणीटंचाई कशाला म्हणतात आणि घोटभर पाण्यासाठी सारे गाव, गावातील आबालवृद्ध स्त्री-पुरुष, गाडगे-मडके घेऊन कसा जीवघेणा संघर्ष करतात, हे पाहायचे असेल तर आजही यवतमाळ जिल्ह्य़ातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव), कोव्हळा, तोटनाळा, करजगाव, गोरेगाव, वागद, तेलगव्हाण इत्यादी गावांना एकदा तरी भेट दिली पाहिजे.
भीषण पाणीटंचाईच्या बातम्या वाचून क्षणभर स्तब्धता येईल पण, या टंचाईचा प्रत्यक्ष सामना करीत असलेल्या गावकऱ्यांचे लहानसहान मुलामुलींचे आक्रंदन पाहिले म्हणजे काळीज चर्र झाल्याशिवाय राहणार नाही. मृग नक्षत्र संपल्यावरही पावसाने हजेरी लावलेली नसल्याने वरील गावातील जनतेचा पाण्यासाठी होणारा आक्रोश पाहून दारव्हा येथील श्री सत्यसाई सेवा संघटनेने स्वखर्चाने धुळे येथून पाण्याचा टँकर व ट्रक भाडय़ाने आणून जी नि:शुल्क जलसेवा या गावांसाठी सुरू केली आहे ती शब्दातीत आहे. १३००० लिटर क्षमता असलेली प्रचंड टाकी पाण्याने भरून ट्रकवर लादून जेव्हा या गावात येते तेव्हा गावकऱ्यांची उडणारी झुंबड पाहिली म्हणजे स्वातंत्र्याच्या ६० वर्षातही आम्ही साधे पाणी आमच्या नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकत नाही, याची लाज वाटल्याशिवाय राहत नाही. सत्यसाई सेवा समितीचा टँकर आला की, शेकडो गावकरी ‘टँकर आयो रे’ असे ओरडत गावातील भव्य अशा कोरडय़ा विहिरीवर एकत्र येतात. शिस्तबद्ध पद्धतीने विहिरीच्या काठावर बादल्या भरण्यास ठेवतात. टँकरचे पाणी कोरडय़ा ठण्ण विहिरीत रिते केले जाते आणि मग त्या विहिरीतील पाणी काढण्याची एकाच वेळी असंख्य नागरिकांची जी धडपड सुरू होते ती काळजाचे ठोके चुकवणारीच असते. सत्यसाई सेवा समितीने या कामाजी जी ‘सीडी’ तयार केली आहे ती पाहून मुंबईतील अनेक दानशूर पाणीटंचाई निवारणार्थ लाखो रुपयांची मदत पाठवतील, त्या मदतीचा सदुपयोग करून अधिक जनसेवा करता येईल, असा विश्वास समितीचे समन्वयक प्रश्न. डॉ. एस.के. सातपुते (अकोला) यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला.
तारनाळा गावात तर नळयोजनेच्या पाण्याच्या टाकीवर चढून गावकरी-महिला टाकीतून पाणी काढतात आणि टाकीच्या शिडीवरून चढतात व उतरतात, असे भीषण व जीव धोक्यात घालणारे दृश्य पाहायला मिळते. सत्यसाईसेवा समितीला पाणी वाटपाच्या पुण्य कार्यात मदत करण्यासाठी वरूडचे पोलीस पाटील खुशाल भाऊराव राऊत, बोथचे अशोक खडसे, मान कोपऱ्याचे गोपाल ढोक, माधव ठाकरे इत्यादींनी त्यांच्या शेतातील विहिरी खुल्या करून दिल्या. टंचाईकाळात अनेक लोक हजारो रुपये घेऊन पाणी विकतात. मात्र, सत्यसाई समितीला दररोज लाखो लिटर पाणी फुकटात देणारे दानशूर मिळाले. ट्रक व टँकर देणारे, मिळणारे, रात्रंदिन पाणी वाटप करणारे साईसेवक मिळाले. त्यामुळे या भागातील लोकांना मोफत आणि मुबलक पाणी गेल्या दीड महिन्यापासून आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो आणि आजही हे काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया साई समितीचे छगन जाधव, सतीश पापळकर आणि त्यांच्या सहकार्यानी व्यक्त केली आहे. एखाद्या स्वयंसेवी संघटनेचा महाराष्ट्रातील हा एकमेव प्रकल्प असल्याचेही पापळकर यांनी सांगितले.