Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जकात विरोधात तीव्र लढा उभारण्याचा व्यापारी आणि उद्योजकांचा निर्धार
अमरावती, २३ जून / प्रतिनिधी

 

महाराष्ट्रातून जकात कर हद्दपार व्हावा ही सर्व व्यापारी आणि उद्योजकांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. सरकार याबाबत निर्णय घेण्यास तयार नाही, आता व्यापारी आणि उद्योजकांनी एकत्र येऊन आपला लढा तीव्र केला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दिग्विजय कपाडिया यांनी येथे केले. अमरावती एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष मानसिंह पवार, सरचिटणीस सुधीर शहा, ‘सारथी’ चे अमर वझलवार उपस्थित होते.
या बैठकीत जकात कराखेरीज वीज भारनियमन, वीज दरवाढ, वजनमाप अधिकाऱ्यांचा होणारा त्रास, नवीन अन्न-भेसळ प्रतिबंधक कायदा, मुळा-प्रवरा वीज वितरण सोसायटीला दिले जात असलेले झुकते माप, व्यापारी-उद्योजकांची एकजूट आदी विषयांवर चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीत जकात कराच्या मुद्दय़ावर सत्तारूढ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अमरावती महानगर चेंबरने घेतला होता. या बहिष्कारामुळेच अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विजयी झाले. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत शासनाने जकात कर हटवला नाही, तर सत्तारूढ पक्षांच्या उमेदवारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी महानगर चेंबरचे अशोक मंत्री यांनी केली. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष मानसिंह पवार यांनी जकात करासंबंधीची भूमिका मांडली. दिग्विजय कपाडिया यांनी व्यापाऱ्यांची एकजूट व्हावी यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सरचिटणीस सुधीर शहा यांनीही यावेळी आपले विचार मांडले.
या बैठकीला अमरावती महानगर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन, घनश्याम राठी, राजेंद्र लुनावत, विनोद कलंत्री, सातुर्णा असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा तसेच नागपूर येथील मोहन देव, अनिल गचके, अ‍ॅड. राजेंद्र राठी, मुंबई येथील रमेश नेमाणी, आशीष पेडणेकर, दिनेश सेठ, विकास राठी, बबन चौरे, अचलपूरचे गजानन कोल्हे प्रश्नमुख्याने हजर होते. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक किरण पातुरकर यांनी केले तर अमर वझलवार यांनी आभार मानले. बैठकीला अमरावतीच्या उद्योजकांपैकी परेश राजा, जयप्रकाश लढ्ढा, रामकिशोर सोनी, पुरुषोत्तम बजाज, मधू करवा, मिलिंद देसाई, सुरेश बत्रा, माणिकचंद लुल्ला, विजय कुळकर्णी, विजय दातेराव, नितीन जाधव, अरुण ढवळे, सुरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.