Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जात वैधता प्रमाणपत्रांअभावी शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह
चिखली, २३ जून / वार्ताहर

 

अभियांत्रिकी, वैद्यकीय इत्यादी क्षेत्रात शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अद्याप न मिळाल्याने मागास व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची एकूण प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे.परिश्रमपूर्वक यश मिळवून सुंदर आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांचे कुटुंबीय देखील या प्रकारामुळे अडचणीत आले आहेत. प्रमाणपत्रापूर्वी हमीपत्र लिहून दिल्यास प्रवेश देण्याची पद्धत शिक्षण विभागाने बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे.
वैधता प्रमाणपत्रासाठी डिसेंबर ०८ मध्ये प्रकरण पाठवून अद्याप आले नसल्याने समाजकल्याण विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
बारावी परीक्षा उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या व त्यानंतर सीईटी परीक्षेतही यश मिळवलेल्या मागास व इतर मागास वर्गातील (एस.सी./ओ.बी.सी.) विद्यार्थ्यांना कठीण प्रवेश प्रक्रियेसह आता निराळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जाती वैधता प्रमाणपत्रासाठी शाळा/महाविद्यालयांमार्फत तर काहींनी व्यक्तिगतरीत्या विशेष समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडे प्रकरण सादर केले आहे. यावर तात्काळ निर्णय होऊन किमान बाराव्या इयत्तेनंतरची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी वैधता प्रमाणपत्र मिळावे, अशी अपेक्षा असताना शेकडो विद्यार्थ्यांना अद्यापही प्रमाणपत्र मिळालेले नाही.
यापूर्वी केवळ अमरावती येथे असलेल्या विशेष समाजकल्याण अधिकारी कार्यालयावर कामाचा बोजा लक्षात घेऊन सुमारे तीन महिन्यांपूर्वी अकोला येथे असे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अकोला, बुलढाणा व वाशीम या तीनच जिल्ह्य़ाची जबाबदारी या कार्यालयावर असून सहा महिन्यांनंतरही शेकडो विद्यार्थ्यांचे वैधता प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत.
१०० रुपयाच्या हमीपत्रावर आता प्रवेश देणे बंद झाले असून प्रवेश अर्ज स्वीकारतानाच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी केली जाते. प्रवेश प्रक्रिया संपत असताना अद्याप प्रमाणपत्रापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने योग्य तो निर्णय त्वरित घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.