Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘भूपाळी ते भैरवी’ला रसिकांची दाद
बुलढाणा, २३ जून / प्रतिनिधी

 

अभिजात संगीत, कला अकादमी व कला रसिक मंचच्या वतीने येथील टिळक नाटय़ व क्रीडा मंदिराच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या ‘भूपाळी ते भैरवी’ हा लोकगीतांच्या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.
कला रसिक मंचाचे ज्येष्ठ सभासद प्रल्हादराव निकम व त्यांच्या पत्नी ललिता निकम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अभिजात संगीत व कला अकादमीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा व्यवहारे, कला रसिक मंचाचे अध्यक्ष शशिकांत बेंदाडे, गौतम हिवाळे, डॉ. माधवी जवरे, डॉ. देशपांडे यांनी भुपाळी ते भैरवी या कार्यक्रमाचे पुणे येथील प्रस्तुतकर्ते सचिन करंबळेकर, कुमार करंदीकर, प्रशांत पांडव, उद्धव कुंभार, संपदा थिटे, मीनल पोंक्षे यांचे स्वागत केले. याप्रसंगी गीते काका यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ अ‍ॅड. बाळासाहेब कविमंडण यांच्या हस्ते महिला संगीत विद्यालयास सतरंजी सप्रेम भेट दिली.
सचिन करंबळेकर यांनी महाराष्ट्रातील लोकसंगीताचा मागोवा घेताना भुपाळी, वासुदेव, भारूड तर संपदा थिटे, मीनल पोंक्षे यांनी ओवी, आरती, गवळणीचे विविध प्रकार, लावण्यांचे विविध प्रकार आणि कुमार करंदीकर यांनी अभंग असे संगीत प्रकार सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी उत्कृष्ट समूहगीते सादर करण्यात आली. श्रोत्यांच्या मागणीवरून वि.दा. सावरकरांचा पोवाडाही सादर करण्यात आला. प्रशांत पांडव यांचे तबला वादन रसिकांची दाद घेऊन गेला तर उद्धव कुंभार यांनी तालवाद्यांची साथ केली. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र मोरे तर प्रश्नस्ताविक डॉ. माधवी जवरे यांनी केले. संध्याकाळी झालेल्या रिमझिम पावसाच्या उपस्थितीत रात्री दहा वाजेपर्यंत रंगलेल्या या संगीत मैफलीला शहरातील रसिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गौतम हिवाळे, डॉ. विनोद जवरे, सुरेश पवार, रवी रिंढे, संदीप गावंडे, सुरेश तायडे यांनी सहकार्य केले.