Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सिलिंगमध्ये गेलेली जमीन परत मिळण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे
वरूड, २३ जून / वार्ताहर

 

वडिलोपार्जितील जमीन आई-वडिलांच्या मृत्यूनंतर अज्ञान राहिलेल्या मुलांकडून शासनाने सिलिंग कायद्यांतर्गत ताब्यात घेतली. मुले १८ वर्षे वयाची झाल्यानंतर ती जमीन पुन्हा मिळविण्यासाठी राजुरा बाजार येथील भोजराज गोपीलाल चांडक हे ८६ पासून शासनाविरुद्ध लढा देत आहे. नुकतीच त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन न्याय देण्याची विनंती केली.
भोजराज यांचे वडील गोपीलाल चांडक यांच्याजवळ वडिलोपार्जितील ७६ एकर जमीन राजुरा बाजार शिवारात होती. त्यांच्या मृत्यूनंतर १९६५ मध्ये गोपीलाल यांच्या पत्नी शांता यांच्या नावावर संपूर्ण ७६ एकर शेती होती. शांता यांचा मृत्यू १९७५ साली झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मीनारायण चांडक (१४), बद्रीनारायण तेव्हा १२ वर्षाचा तर भोजराज चांडक अवघ्या १० वर्षाचा होता. ही तिन्ही मुले संपत्तीचे वारसदार होते. परंतु, तेव्हा ते सज्ञान नव्हते. १९७६ साली आलेल्या सिलिंग कायद्यात शासनाने २५ एकर शेती काढून घेतली. एकीकडे मुले सज्ञान नाही. त्यामुळे ७६ एकरची ३ भावांना वाटणी होण्यापूर्वी आई-वडिलांचा मृत्यू तर दुसरीकडे शासनाने सिलिंगमध्ये २५ एकर जमीन घेतल्यामुळे अन्याय झाल्याचे भोजराज यांनी राष्ट्रपतीसमोर तक्रार मांडताना सांगितले.
विशेष म्हणजे तेव्हा आई-वडिलांच्या मृत्यूनंतर हक्क नोंदणी बुकात वारस म्हणून या मुलांची नावे होती. तिघेही सज्ञान झाल्यानंतर १९८६ पासून शासनाविरुद्ध लढा देत असल्याचे भोजराज यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री, महसूल खाते, पंतप्रधान यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या. केवळ सिलिंगमध्ये जमीन गेली म्हणून त्याचा सिलिंग बॉन्ड रूपात कायद्याच्या १०० पट रक्कम शासनाने तेव्हा पाठविली, मात्र आम्ही ती परत केल्याचे भोजराज चांडक म्हणाले.
याप्रकरणाबाबत आपण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना कैफियत सांगितली व न्याय मिळवून देण्याची मागणी केल्याचे भोजराज म्हणाले. राष्ट्रपतीना भेटण्यासाठी भोजराज यांच्या समवेत दादाराव माटे, रमेश लिखार, नत्थुजी राऊत आदी उपस्थित होते. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास २ महिन्यांनंतर नवी दिल्ली येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा भोजराज चांडक यांनी पत्रकामध्ये दिला आहे.