Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गौरव पशिने मृत्यू प्रकरणातील आणखी एक आरोपी अटकेत
भंडारा, २३ जून/ वार्ताहर

 

अश्लील चित्रफितीद्वारा गौरव पशिने यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यापैकी सातव्या आरोपीला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव राजकुमार शर्मा (२०) असून तो येथील साईनाथ नगरात राहतो.
१६ जूनला गळफास लावून व विष घेऊन आत्महत्या करणाऱ्या गौरव पशिने याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले होते. यातील एक आरोपी बादल गेडाम याच्या लॉस्ट माईल या इंटरनेट कॅफेला सील करून तेथील चार संगणक उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत सोळुंखे आणि त्याच्या चमूने ताब्यात घेतले आहेत. माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या अंतर्गत चारही सीपीयू हैदराबाद येथे तपासाकरिता पाठविण्यात येणार आहेत. अश्लील चित्रफितीचा प्रसार करण्याच्या आरोपाखाली सायबर क्राईम अंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर क्राईम खाली गुन्ह्य़ाची नोंद होण्याची जिल्ह्य़ातील ही पहिलीच घटना आहे.
आरोपींची नार्कोटेस्ट करून गौरव पशिने आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीबीआय कडे सोपवावा, अशी मागणी मुकेश थानथराटे यांनी पत्रपरिषदेत केली.
भावी पिढीवर अशा प्रकारे दुष्परिणाम होऊ नये यादृष्टीने सर्व सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन युवकांच्या वाढत्या विकृत प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न करावा, असेही थानथराटे यांनी आवाहन केले.
१६ एप्रिल नंतर त्वरित सायबर क्रॉईम अंतर्गत गुन्हे दाखल न करता, आरोपींना पुरावे नष्ट करण्याची संधी पोलिसांनी दिल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. पोलिसांच्या दिरंगाईमुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. आरोपींना उत्तम बडदास्त देऊन विशेष वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
आरोपींची २० जूनपर्यंत पोलीस कोठडी होती न्यायालयाने ती २२ जून ०९ पर्यंत मंजूर केली आहे.
सायबर क्राईम लक्षात घेऊन पोलिसांनी बादल गेडाम यांच्या इंटरनेट कॅफेवरील छाप्यानंतर आत्महत्या प्रकरणातील सहा आरोपींच्या घरी छापे घालून चार संगणक, एक मोबाईल चीप, एक सीमकार्ड जप्त केले. पोलिसांनी सायबर क्राईमच्या कलम ६७ अन्वये, गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सिद्ध झाला तर ५ वर्षे कारावास व एक लक्ष रुपये दंड होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार बादल गेडाम यांच्या ‘लॉस्ट माईल’ इंटरनेट कॅफेमधून अश्लील चित्रफित सर्वत्र पसरली होती.