Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

छावा संग्राम परिषदेचे ‘रास्ता रोको’ मागे
भंडारा, २३ जून / वार्ताहर

 

दारू विक्रीच्या दुकानाचे स्थानांतरण रद्द करण्यासाठी छावा संग्राम परिषद व महिलांनी लाखांदूर येथे रास्ता रोकोचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाने पूर्वी दिलेला आदेश बदलून पुढील आदेशापर्यंत दुकानाचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. लाखांदूर येथील प्रभाकर घाटबांधे यांचे परवानाप्रश्नप्त देशी दारू विक्रीच्या दुकानाची जागा अनधिकृत आढळल्याने १८ नोव्हेंबर २००८ ला दुकानाला सील ठोकण्यात आले. हे दुकान मालकाने १२ मे २००९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देऊन दुकानाचे स्थानांतरण करण्याची परवानगी मिळवली.
त्यामुळे लाखांदूर प्लॉटवरील धार्मिक स्थळे व विविध कार्यालयाजवळ परवानाप्रश्नप्त देशी दारूचे दुकानांचे स्थानांतर करण्यात येणार होते. याची माहिती मिळताच दारू विक्रीच्या दुकानाला विरोध करण्यासाठी छावा संग्राम परिषद व स्थानिक महिलांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत संबंधित अर्जदाराचे सर्व व्यवहार बंद करून कागदपत्रे जप्त करण्याचे आदेश दिले. रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने २४ तासाच्या आत मागणी मंजूर केल्याने आयोजित रास्ता रोको मागे घेण्यात आला.
तहसीलदार खाडीलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरक्षक मगरे, नायब तहसीलदार चांदेवार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकानाबाबत जारी केलेला आदेश वाचून दाखविला. मागणी मंजूर झाल्याने रास्ता रोको मागे घेतल्याची घोषणा छावा संग्राम परिषदेचे तालुका अध्यक्ष निशाद लांजेवार यांनी केली.