Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बिंदूतीर्थ बनले कचराकुंड
कारंजा-लाड, २३ जून/ वार्ताहर

 

बिंदूतीर्थ हे बेंबळा नदीचे उगमस्थान असून बेंबळापाट या नावाने आज ते ओळखले जाते. पुरातत्वविभागाच्या अनास्थेमुळे हे प्रश्नचीन कुंड नामशेष होण्याच्या मार्गावर असून कचराकुंडाची अवस्था त्याला आली आहे. कारंजा म्हणजेच करंजपूर, जलदुर्भिक्ष्यामुळे त्रस्त असलेल्या करंजपूरवासीयांची तृष्णा भागविण्यासाठी करंज ऋषींनी सप्तपवित्र नद्यांना आवाहन केले. अन् त्या या कुंडात प्रगट झाल्याची कथा पुराणात आहे.
पावसाळ्यात हे कुंड तुडूंब भरून वाहते. त्यातून वाहणारे जलप्रवाह सहज नजरेला पडतात. आजूबाजूच्या विहिरीही काठोकाठ भरून जातात. कुंडासमोरच असलेल्या प्रश्नचीन दत्तमंदिरातील विहिरींतून हाताने पाणी काढता यावे इतकी पाण्याची पातळीवर आलेली असते. कुंड साफ करून, कुंडाच्या काठावर श्री गणेशोत्सव मंडळातर्फे श्री गणपतीही बसविला जातो तर नागरिक कुंडात पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. मात्र, जसजसा उन्हाळा येतो तसतसे या कुंडातील पाणी आटत जाऊन ते कोरडे पडते. खरेतर कारंज्याच्या दक्षिणेला असणाऱ्या ऋषीतलावातील पाणी साठय़ाशी या कुंडातील जल पातळी निगडित आहे. ऋषी तलाव जितका भरेल त्या प्रमाणात या कुंडातील जलपातळी वाढत जाते. ऋषी तलावाला जसजशी ओहटी लागते तस तसे हे कुंड कोरडे पडत जात असल्याचे गेल्या अनेक वर्षाच्या निरीक्षणावरून जाणवते आहे. अशा या प्रश्नचीन असलेल्या कुंडाची आजची अवस्था अतिशय दयनीय आहे. कुंड मोडकळीला आले आहे. दगडी फरशीही उखडली आहे. त्याला लावण्यात आलेले संरक्षक लोखंडी कुंपण तुटले आहे. त्याचा काठावरच कचरा साठविला जातो. कोरडय़ा पडलेल्या कुंडाचा वापर कचरा कुंडासारखा केला जात आहे. हे कुंड पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. या खात्याची कायमची अनास्था कुंडाच्या दुर्दशेला कारणीभूत ठरली आहे.
या कुंडाची कोणतीही दुरुस्ती वा देखभाल या विभागाकडून केली जात नाही. पुरातत्व विभाग स्वत: काहीही करीत नाही आणि जीर्णोद्धार करण्यास तयार असलेल्या नागरिकांना या संस्थांना परवानगीही देत नाही. परिणामत: एक प्रश्नचीन पवित्र जलकुंड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.