Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बाजारपेठेवर मंदीचे सावट
बुलढाणा, २३ जून / प्रतिनिधी

 

मान्सून लांबल्याने जिल्ह्य़ातील बाजारपेठेवर मंदीचे सावट आले असून खरेदी विक्रीच्या व्यवहाराला मर्यादा आल्या आहे. असे असताना पालेभाज्या व फळांचे भाव आकाशाला भिडले आहे.
पंधरा रुपये किलोपेक्षा कमी किमतीची कुठलीही भाजी मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नाही. दररोज आभाळी वातावरण निर्माण होते. त्यानंतर कडक उन्हं पडते. उष्णता व उकाडय़ात वाढ झाली आहे. भर पावसाळ्यात ग्लोबल वार्मिगचे चटके सोसावे लागत आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचे प्रमाण देखील वाढले आहे. खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सिंचन प्रकल्प व जलाशयांच्या पाण्याची पातळी १० टक्क्यावर आली आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरणी उशिरा झाली. त्यानंतर पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. दुबार पेरणी, उत्पन्नाच्या उताऱ्यात घट, रब्बी हंगाम हातचा जाणे अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. बुलढाणा जिल्ह्य़ातील सुमारे अकराशेहून अधिक गावे टंचाईग्रस्त आहे. यावर्षी पाऊस वेळेवर येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, जून महिन्याचे तीन आठवडे कोरडे गेले आहे. जिल्ह्य़ात सार्वत्रिक पाऊस झाला नाही. काही ठिकाणी वादळी वाऱ्यास अल्प प्रमाणात पाऊस झाला. गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेली आहे. यावर्षी पेरणीसाठी भरपूर पाऊस हवा आहे. अशा भरपूर पावसाची चातकासारखी प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
गेल्या पाच वर्षापासून वेळेवर पाऊस येण्याचे निसर्ग चक्र बिघडले आहे. रोहिणी व मृग नक्षत्रात पाऊस येत नाही. पाऊस उशिरा पडत असल्याने बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा कापूस, मूग, उडीद या पिकांचा पेरा घटला आहे. मिरची पिकाची लागवड देखील अतिशय कमी झाली आहे. यावर्षी मूग व उडिदाचा पेरा घटण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ात पाऊस वेळेवर येईल या आशेवर घाटाखालील मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद या भागात किमान ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पाऊस पूर्व धूळ पेरणी होत असते. यावर्षी ही संपूर्ण धूळ पेरणी उलटण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने यावर्षी सुमारे ७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचे नियोजन केले आहे. त्यापैकी ५ लाख हेक्टर शेती क्षेत्रकोरडवाहू व निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. या सर्व लाखो शेतकऱ्यांना पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे.
शहरांचा पाणीपुरवठा आता आठवडाभराने होत आहे. या भीषण पाणी टंचाई समोर जनावरांच्या चारा टंचाईचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी चारा डेपो व जनावरांच्या छावण्या उभारण्याच्या मागण्या केल्या आहेत. या प्रश्नावर जिल्हा प्रशासन ढिम्म आहे.