Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘चोरांना पकडण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करा’
अमरावती, २३ जून / प्रतिनिधी

 

गेल्या पाच ते सहा वर्षापासून अमरावती शहरात विविध ठिकाणांहून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटण्याचे सत्र सुरू आहे. एक-दोन चोरटय़ांन पकडून पोलीस पाठ थोपटून घेत असले तरी चोरांवर अंकुश लावण्यात पोलीस यंत्रणा सेपशेल अपयशी ठरल्याची टीका शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप बाजड यांनी केली असून या चोरांचा तपास करण्यासाठी कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शहरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना विशेषत: वृद्ध महिलांना लक्ष्य ठरवून चोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिणे लुटण्याचा प्रकार सुरू केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून हे तोतये भरदिवसा लूट करतात आणि पोलीस यंत्रणा गप्प बसते हे दुर्दैवी आहे, असे बाजड यांचे म्हणणे आहे.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या जाऊबाईंनाच या तोतया पोलिसांनी हिसका दाखवला होता. त्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाच्यावेळी पोलीस ठाण्याजवळच एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि बांगडय़ा लुटण्यात आल्या. असे गंभीर प्रकार घडूनही पोलीस यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप बाजड यांनी केला आहे. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा याप्रकरणी अयशस्वी ठरली आहे. एखाद्या प्रकरणाचा छडा लागत नसल्यास उच्च यंत्रणेकडे तपास देण्याची पद्धत आहे. मंगळसूत्र चोरीच्या या प्रकारांना पोलीस आयुक्त गंभीर माणण्यास तयार नाहीत काय, असा सवाल बाजड यांनी केला आहे.