Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आर्णी तालुक्यात बोगस खतांची विक्री; १३ आरोपींविरुद्ध गुन्हा
आर्णी, २३ जून / वार्ताहर

 

तालुक्यातील अंतरगाव येथे नुकताच रासायनिक खताचा साठा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. या रासायनिक खताची तपासणी केली असता त्यातील २०-२०-०० या मिश्रखताचे ३३ पोते निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाले. मध्यप्रदेशातील मेसर्स रजतकुमार विनोदकुमार या फर्मचा या बोगस खताशी नाळ जुळल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी या संदर्भात आर्णी पोलीस ठाण्याला तक्रार दाखल केली असून १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे बोगस खत विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जळगाव येथील गोसर कुटुंबातील सात जण असून अशोक गुप्ता, अरविंद पठाडे यांचाही त्यात समावेश आहे. आर्णी तालुक्यातील अंतरगाव येथील संतोष जयस्वाल, रामप्रसाद जयस्वाल, बाबुलाल जयस्वाल यांचाही सहभाग आहे. खताचा साठा जयस्वाल यांच्याकडून जप्त करण्यात आला. कृषी अधिकारी प्रमोद बागडे यांनी २० जूनला दिलेल्या तक्रारीवरून जळगाव येथील ९, खंडवा येथील १ व अंतरगाव येथील तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे. नुकतेच आर्णी येथील पाच रासायनिक खत विक्रेत्यांच्या गैरप्रकाराअभावी परवाने रद्द करण्यात आले होते. त्यानंतरच्या या कार्यवाहीमुळे रासायनिक खते, बियाणे, औषध विक्रेत्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.