Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पवारांची धोरणे शेतकरी विरोधी -खासदार राजू शेट्टी
बुलढाणा, २३ जून / वार्ताहर

 

देशाचे कृषीमंत्री शरद पवार यांचे कृषीविषयी धोरण शेतकरी विरोधात आहे. कर्जमाफीच्या यशाचे श्रेय लाटण्याचा ते प्रयत्न करतात. त्यासोबत कर्जमाफीच्या अपयशाची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे. ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकऱ्यांसाठी व जिल्हा बँकांचे चांगभले करण्यासाठी होती, असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजू शेट्टी यांनी केला. येथील विश्राम भवनावर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन अमदाबादकर, रविकांत तुपकर पाटील उपस्थित होते.
शरद पवारांचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या आयात-निर्यातीचे धोरण अतिशय फसवे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव सतत पडत राहतात. मका व तांदूळ निर्यातीमुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला तर पाम तेलाच्या आयातीमुळे सोयाबीनचे भाव गडगडले. आज महाराष्ट्रात राजकारण हे ठराविक घराण्यांची मक्तेदारी झाली आहे. वतनदार व वाडय़ावाल्यांची सत्ता महाराष्ट्रावर आहे. ही सत्ता सर्वसामान्यांच्या हाती देण्याचा प्रयोग आपण पश्चिम महाराष्ट्रात केला. तो यशस्वी देखील झाला. सर्वसामान्य शेतकरी-शेतमजुरांच्या हाती सत्ता देण्याचा प्रयोग येत्या विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात करण्याची घोषणा त्यांनी केली. येत्या विधानसभा निवडणुकीत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वच्छ चारित्र्याचे व रचनात्मक चळवळीतील कार्यकर्ते उभे करील व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी व त्यांची एकजुट करण्यासाठी महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बांधणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत तरुणांची जबरदस्त फळी उभारण्यात येत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतचा वेग ८.७ टक्के आहे. कृषी आर्थिक प्रगतीचा वेग केवळ २.८ टक्के आहे. देशाच्या बजेटमध्ये शेती क्षेत्रासाठी केवळ २ ते ३ टक्के तरतूद करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी ही विषम परिस्थिती असून त्यामुळे ६३ टक्के शेतकऱ्यांवर केंद्र सरकार अन्याय करत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा, अशी मागणी लोकसभेमध्ये करणार आहोत. देशात व विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. ही सरकारी व्यवस्थेच्या विरोधात शेतकऱ्यांची असलेली नाराजी आहे.
शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर अतिशय खालावलेला असून शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत वैद्यकीय, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत शेती अर्थ व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत देशाला व समाजाला भवितव्य नसल्याचे ते म्हणाले. शरद जोशी व त्यांच्या शेतकरी संघटनेला आमचा अजिबात विरोध नाही. दोन्ही संघटनांची तत्त्वे एकच असून शेतकऱ्यांना न्याय देण्याची दोघांचेही धोरण असल्याचे सांगून शरद जोशी विषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. पत्रकार परिषदेनंतर येथील गर्दे वाचनालयात खासदार राजू शेट्टी यांचा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना व विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला.