Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कापूस, धान व मिरचीला फटका
चंद्रपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

पावसाचे आगमन उशिरा झाल्याचा फटका कापूस, धान आणि मिरचीला बसणार आहे. कपाशीच्या लागवडीची योग्य वेळ २० जूनपर्यंत आहे. मात्र पाऊसच नसल्याने पेरण्या झाल्या नाहीत. कपाशीची लागवडीची योग्य वेळ निघून जात आहे.फळबाग लागवडीचे लक्ष्य ५०० हेक्टर ठेवण्यात आले आहे. उशिराने पेरणी झाल्यास झाडांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच रोगांच्या प्रश्नदुर्भावाची शक्यताही वाढते. कोरडवाहू शेती असल्याने कापूस उत्पादकांना सध्याच्या स्थितीत अधिक फटका बसणार आहे. पावसाला आणखी उशीर झाल्यास कापसाचे पीक घेणारा शेतकरी सोयाबीनकडे वळण्याची शक्यता असल्याने सोयाबिनचे क्षेत्रात वाढ होणार आहे.
जिल्हय़ात धानाचे क्षेत्र एक लाख ५८ हजार हेक्टर आहे. धान उत्पादकांचा कल जास्त कालावधीच्या वाणाकडे आहे. या वाणाचे पऱ्हे आतापर्यंत टाकणे गरजेचे होते. मात्र पाऊस नसल्याने धान उत्पादकांनाही संकटाला सामोरे जावे लागत आहे. पावसाला आणखी उशीर झाल्यास कास्तकारांनी हलक्या वाणाचे उत्पादन घ्यावे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सध्या बियाणे आणि खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असली तरी पाऊस बेपत्ता झाल्याने ही सर्व स्थिती उद्भवली आहे. यंदा ४६ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध असून १३ हजार मेट्रिक टन आपातकालीन स्थितीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. ८६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. अशा स्थितीत पाऊस वेळेवर आला नाही तर खते व बियाणांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्यातरी शेतकरी आकाशाकडे डोळे वटारून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पाऊस आला तरच सर्व काही आलबेल नाही तर काहीच नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.