Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

सत्यसाई सेवा समितीची जलसेवा
यवतमाळ, २३ जून / वार्ताहर

भीषण पाणीटंचाई कशाला म्हणतात आणि घोटभर पाण्यासाठी सारे गाव, गावातील आबालवृद्ध स्त्री-पुरुष, गाडगे-मडके घेऊन कसा जीवघेणा संघर्ष करतात, हे पाहायचे असेल तर आजही यवतमाळ जिल्ह्य़ातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव), कोव्हळा, तोटनाळा, करजगाव, गोरेगाव, वागद, तेलगव्हाण इत्यादी गावांना एकदा तरी भेट दिली पाहिजे. भीषण पाणीटंचाईच्या बातम्या वाचून क्षणभर स्तब्धता येईल पण, या टंचाईचा प्रत्यक्ष सामना करीत असलेल्या गावकऱ्यांचे लहानसहान मुलामुलींचे आक्रंदन पाहिले म्हणजे काळीज चर्र झाल्याशिवाय राहणार नाही.

नागपूर जिल्ह्य़ात ११८ गावे स्वयंघोषित तंटामुक्त!
हिंगणा, २३ जून / वार्ताहर

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २००८-०९ या वर्षात नागपूर जिल्ह्य़ात १०४ नवीन गावे तर मागील वर्षीचे पुरस्कारपात्र १४ अशी एकूण ११८ गावे स्वयंघोषित तंटामुक्त झाली आहेत.
या स्वयंघोषित तंटामुक्त गावांचे मूल्यमापन सुरू झाले असून ते २४ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व तंटामुक्त गावांचा अहवाल २५ जूनला जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

‘शासकीय जमिनीच्या लिलावासाठी परवानगी आवश्यक’
बुलढाणा, २३ जून / प्रतिनिधी

विविध संस्था, व्यक्ती वा कंपन्या यांना विविध प्रयोजनासाठी कब्जेहक्काने वा भाडेपट्टय़ाने मंजूर करण्यात आलेल्या शासकीय जमिनीची न्यायालयाकडून वित्तीय संस्थेकडून, महसूललवादाकडून देण्यात आलेल्या आदेशामुळे अथवा अन्य प्रकारे थकबाकी वसुलीच्या कोणत्याही कारणास्तव विक्री, हस्तांतरण वा लिलाव करण्याची वेळ आल्यास, लिलाव करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी खरेदी-विक्री बेकायदेशीर होईल व ती शासनावर बंधनकारक होणार नाही.

जकात विरोधात तीव्र लढा उभारण्याचा व्यापारी आणि उद्योजकांचा निर्धार
अमरावती, २३ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्रातून जकात कर हद्दपार व्हावा ही सर्व व्यापारी आणि उद्योजकांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. सरकार याबाबत निर्णय घेण्यास तयार नाही, आता व्यापारी आणि उद्योजकांनी एकत्र येऊन आपला लढा तीव्र केला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दिग्विजय कपाडिया यांनी येथे केले. अमरावती एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष मानसिंह पवार, सरचिटणीस सुधीर शहा, ‘सारथी’ चे अमर वझलवार उपस्थित होते.

मायलेकीच्या मृत्यूने आवळगाव हळहळले
ब्रह्मपुरी, २३ जून / वार्ताहर

तालुक्यातील आवळगाव येथील एका घरात आईसह एका लहानग्या मुलीचा जळून मृत्यू झाल्याने गावकरी हळहळले आहेत. या घटनेने गावात खळबळ निर्माण झाली असून घटना रविवारी मध्यरात्री घडली असल्याचे वृत्त आहे. शारदा गोवर्धन आष्ठेकर (२२) व तिची मुलगी रोहिणी (९ महिने) अशी मृतांची नावे आहेत. दोन वर्षापूर्वी शारदाचा विवाह आवळगाव येथील गोवर्धन आष्ठेकर (२५) यांच्याशी झाला होता. शारदा ही बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील दादाजी रामचंद्र डेंगे यांची कन्या तर गोवर्धन हा ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व भाजप कार्यकर्ता बुधाजी आष्ठेकर यांचा मुलगा आहे. आष्ठेकर कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनच्या रात्री शारदाचा पती गोवर्धन व सासरे हे घरातील हॉलमध्ये तर दीर भास्कर, सासू, नणंद व तिचा पती हे घराच्या गच्चीवर झोपले होते. घरातील खोलीत शारदा मुलीसह झोपली होती. रात्री दोनच्या सुमारास त्या खोलीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच सर्वानी दार ढकलले असता पलंगावर शारदा व रोहिणी पूर्णत: जळालेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आले. ब्रह्मपुरी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मायलेकीच्या मृत्यूने आवळगाववासी हळहळले आहेत.

बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप
चंद्रपूर, २३ जून / प्रतिनिधी

नंदगूर येथील अनुदानित आदिवासी लोकसेवा आश्रमशाळा व भगवानपूर येथील विनाअनुदानित आदिवासी लोकसेवा आश्रमशाळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची मान्यता नसतानाही पद निवडीबाबतची जाहिरात प्रकाशित करून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केली. या प्रकरणाची चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश तिवारी यांनी एकात्मिक आदिवासी वकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोंडवाना कुमारलिंगो शिक्षण मंडळ बोर्डाद्वारा संचालित नंदगूर येथील आदिवासी लोकसेवा आश्रमशाळा व भगवानपूर येथील आदिवासी लोकसेवा आश्रमशाळेच्या पद निवडीबाबची जाहिरात ३ जूनला एका वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. मात्र, आश्रमशाळेला आदिवासी विकास विभागाची मान्यता नाही. असे असतानाही नोकरभरतीच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रकार संस्थेने केला. या प्रकरणाची चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सदर शाळेवर कारवाई करावी, असे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजेंद्र अल्लेवार, उपशहरप्रमुख प्रमोद पाटील आदींचा समावेश होता.

सत्यसाई सेवा संघटनेचे यवतमाळात शिबीर
यवतमाळ, २३ जून / वार्ताहर

जनसामान्यांच्या सेवेत आयुष्य झोकून देण्यातच जीवनाची सार्थकता असल्याने प्रपंच सांभाळताना घेण्यापेक्षा देण्यातच आनंद असतो आणि हे आनंदी जीवन प्रत्येकाला मिळावे यासाठी श्रीसत्यसाई सेवा संघटनेचे कार्य जगभर अव्याहतपणे सुरू आहे, असे प्रतिपादन श्रीसत्यसाई सेवा संघटनेचे अकोला, परभणी, यवतमाळ आणि नांदेड विभागाचे समन्वयक प्रश्न. डॉ. सातपुते यांनी येथे केले.
यवतमाळ जिल्ह्य़ातील सत्यसाई सेवा समित्यांचे विविध शाखांचे प्रतिनिधी तसेच साईसेवक यांच्या सेवा शिबिरात आयोजित कार्यक्रमात प्रश्न. सातपुते बोलत होते. याप्रसंगी युवा प्रमुख संजय चिंतामणी, महिला प्रमुख विद्या निलावार आध्यात्मिक प्रमुख न.मा. जोशी यांनी श्रीसत्यसाई संघटनेची ध्येय, उद्दिष्ट आणि कार्याची माहिती देऊन सेवा कार्यातील अनेक अनुभव कथन केले. जिल्हा प्रमुख सत्यसाई संघटना, सी.एच. जाधव यांनी श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे चालविल्या जात असलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेची माहिती दिली तसेच संघटनेतर्फे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पूर्णपणे विनामूल्य केल्या जाते त्याबाबत मार्गदर्शन केले. सतीश पापळकर जाधव आणि दारव्हा समितीच्या कार्याचा वक्तयांनी गौरव केला.

मेहकरच्या १५ व्यापाऱ्यांना दंड
बुलढाणा, २३ जून/ प्रतिनिधी

मेहकर शहरातील १५ आस्थापनाविरुद्ध विविध कलमांचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १५ व्यापाऱ्यांना प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकाऱ्यांनी १ ते ६ हजार रुपयांप्रमाणे एकूण २४ हजार ४०० रुपये दंड ठोठावला आहे. गुरुकृपा आभूषण रुपये दोन हजार, गुरुकृपा ज्वेलर्स सहा हजार रुपये, माऊली हॉटेल एक हजार रुपये, शुभम् हार्डवेअर एक हजार रुपये, नवनाथ रसवंती एक हजार रुपये, इम्रान भंगार एक हजार रुपये, कासम मोटार गॅरेज बाराशे रुपये, अली ट्रेडर्स बाराशे रुपये, राज मटन हॉटेल एक हजार रुपये, बिग बॉस टेलर एक हजार रुपये, समाधान लॉजींग अ‍ॅण्ड बोर्डीग एक हजार रुपये. मे. अजिंठा अ‍ॅग्रो सव्‍‌र्हिस सेंटर चार हजार रुपये, सत्यनारायण प्रश्नेव्हीजन एक हजार रुपये, न्यू आकाश ड्रेसेस एक हजार व गोदावरी मोटर्स एक हजार रुपये, दंड आकारण्यात आला आहे. सरकारी कामगार अधिकारी जे.एस. लहासे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर येथील दुकाने निरीक्षक बा.बा. हिंगे आणि टी.एस. काकडे यांनी कार्यवाही केली.

टपऱ्या हटविण्यास विरोध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा, २३ जून / वार्ताहर

जिल्हा न्यायालयाच्या शताब्दी सोहोळ्याच्या उद्घाटनासाठी येत्या १७ जुलै रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येथे येत आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील अतिक्रमणधारकांच्या टपऱ्या हटविण्यात येऊ नये, अशी मागणी बुलढाणा लघु व्यावसायिक टपरीधारक संघटनेने केली आहे.या मागणीसंदर्भात टपरीधारकांच्या शिष्टमंडळाने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यासाठी व कार्यक्रमाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील लघु व्यावसायिकांची दुकाने काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लघु व्यावसायिकांच्या टपऱ्या हटविल्यास त्यांच्यावर बेरोजगाराची कु ऱ्हाड कोसळणार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होईल. त्यासाठी टपऱ्या न हटविता राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सांगेल तेवढे दिवस दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे टपरीधारकांनी स्पष्ट केले आहे. शिष्टमंडळात भगवान एकडे, चेतन महाजन, तुळशीदास अन्वेकर, संजय अग्रवाल, प्रभाकर नरोटे, मकरंद देशपांडे, गणेश सोनुने, दत्ता पाटील, संतोष जंजाळकर, राजू बोरसे, शंकर सराफ, एस.एस. टेलर, यशवंत टेंभीकर, सुभाष खरात, शेख बाबर, एस.जे. मुळे, एस.एम. आळशी, श्रीराम उज्जनकर, गजानन जेऊघाले, नारायण मोरे, राजेश नारखेडे, विजय मिसाह, शेषराव परांडे, गजानन शेळके, सुभाष गिऱ्हे आदींचा समावेश होता.

नांगरणी करून मृतदेह बाहेर काढले
आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी
धारणी, २३ जून / वार्ताहर
कळमरवार येथील आदिवासी स्मशानभूमीवर ट्रॅक्टरने नांगरणी करून आदिवासींच्या पूर्वजांचे जमिनीत पुरलेल्या मृतदेहांचे सांगाडे बाहेर काढणाऱ्या आरोपीला धारणी पोलिसांनी अटक केली. आरोपीला जामिनावर सोडण्यात आल्याचे तीव्र पडसाद उमटले असून शिवसेनेने मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
कळमरवार येथे सिपना नदीच्या काठावर पुरातन काळापासून आदिवासींची स्मशानभूमी आहे. आदिवासींच्या रीतिरिवाजाप्रमाणे मृतदेह जमिनीत पुरले जाते. या स्मशानभूमीत अनेक मृतदेह पुरण्यात आले होते. अ. गब्बार अ. करीम याने नांगरणी करून मृतदेह बाहेर काढले. आरोपीला अटक केल्यावर त्याला जामिनावर सोडल्याने हिंदू संघटनेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून शिवसेनेचे धारणी तालुका प्रमुख दयाराम सोनी यांनी पोलिसांनी आरोपाला अभय दिल्याबद्दल आंदोलनाचा इशारा दिला आहे. तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कळमरवार येथे पोलीस बंदोबस्त वाढवला असून उपविभागीय पोलीस अधिकारी जयवंत तांभारे, पोलीस निरीक्षक अशोक पाटील हे कळमरवार येथे तळ ठोकून आहेत.

गोंदियात बालकामगार विरोधी दिवस
गोंदिया, २३ जून / वार्ताहर

सर्वसामान्य जनतेने घेऊन आपल्या मुलांना कामावर पाठवण्याऐवजी शाळेत घातले तरच बालमजुरी प्रथेचे उच्चाटन शक्य असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी राव यांनी केले. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व सहाय्यक कामगार आयुक्तांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस नुकताच पाळण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.बी. सायन्स महाविद्यालयाचे प्रश्नचार्य अंजन नायडू, डॉ. निशा भुरे, आशा ठाकूर, प्रकल्प अधिकारी योगेश वाघमारे, जी.सी. बोंबर्डे, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे क्षेत्रीय अधिकारी नितीन डबरे, महेंद्र रंगारी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. अंजन नायडू यांनी या प्रकल्पांतर्गत केलेल्या कार्याची स्तुती केली व भविष्यातही या अनिष्ट प्रथेबद्दल अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सर्व बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणता यावे, याकरिता राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत प्रकल्पाचे काम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असल्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अविनाश ढोके यांनी केले. आभार महेंद्र रंगारी यांनी मानले.

बोराखेडी ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांच्या विळख्यात
बुलढाणा, २३ जून / प्रतिनिधी

मोताळा शहरापासून जवळच असलेल्या बोराखेडी ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी आणि औषधांचा नेहमीच तुटवडा भासत असल्याने रुग्ण खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. मोताळा तालुक्यात १०६ गावे असून त्यापैकी ५० हून अधिक गावांमधील नागरिक विविध आजाराने त्रस्त आहेत. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने आणि प्रचंड उन्हाच्या दाहकतेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिसरात पाण्याचे कुठलेच स्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. हे पाणी पिल्याने अनेक नागरिकांना गॅस्ट्रो, ताप यासह पोटाच्या विकाराने त्रस्त करून सोडले आहे. दोन दिवसांपूर्वीच गढूळ पाणी पिल्याने डिडोळा गावातील अनेक नागरिकांना ‘गॅस्ट्रोची’ लागण झाली आहे. त्यामुळे बहुतांश रुग्ण ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. परंतु, या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी नाहीत. तालुक्यात निर्माण झालेली परिस्थिती व रुग्णांची हेळसांड पाहता या रुग्णालयातील समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपतालुकाप्रमुख अजाबराव घाटे, शहरप्रमुख सुरेश मापारी, प्रमोद कळसकार, महिला आघाडीच्या अंजना खुपराव, पांडुरंग पाटील, पंजाबराव घोंगटे, राजू बोरसे, राजेंद्र देशमुख, अरुण घाटे यांनी दिला आहे.

राष्ट्रीय सिकलसेल नियंत्रण संस्था स्थापण्याची मागणी
चंद्रपूर, २३ जून / प्रतिनिधी

राष्ट्रीय सिकलसेल नियंत्रण संस्था स्थापन करण्यात यावी, अशी मागणी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री मुकुल वासनिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात संपत रामटेके, नीलकंठ पांडे, संजीव गजभिये यांचा समावेश आहे. केंद्रामध्ये सरकारच्या योजना आयोगाद्वारे, सिकलसेल आरोग्य समस्या हाताळण्यासाठी सहा मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्या आधारावर कार्य व्हावे ही बाब शिष्टमंडळाने मंत्री मुकुल वासनिक यांच्या निदर्शनास आणून दिली. अशा इन्स्टिटय़ूटसाठी अंदाजे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. सिकलसेल व रक्तदोषसंबंधी सेवा देण्यासाठी स्वस्त प्रकारच्या इलेक्ट्रोफोरेसीस पद्धतीचा शोध लावणे, समाजातील सिकलसेल वाहक व सिकलसेल रुग्ण यांचा शोध घेण्यासाठी जनतेचे सर्वेक्षण करणे, सिकलसेल टाळण्यासाठी रुग्णांची नियमित तपासणी करणे, रुग्णाला रक्तसंक्रमण आणि वेदना आदी कार्यासाठी एक दिवसीय सुविधा केंद्र सुरू करणे, साहित्य वितरित करणे व उपलब्ध माहिती व संशोधन या आधारावर वैद्यकीय उपचारांचा शोध घेणे, अशी माहिती संपत रामटेके यांनी दिली.

किनगावराजा शासकीय जागेवर अतिक्रमण
मेहकर, २३ जून/ वार्ताहर
किनगावराजा येथील शासकीय जमिनीवर दोन दुकानांचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रामचंद्र महादेव वगदे यांनी मेहकरचे उपविभागीय अधिकारी (महसूल) नरेंद्र टापरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.ग्रामपंचायतनेच हे अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. या जमिनीच्या मधून पाताळगंगा नदीतून गावात जाण्याचा प्रश्नचीन रस्ता आहे. या ठिकाणी गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद आहे. गणपतीमंदिर या बांधकामामुळे झाकल्या जात असून, आठवडी बाजाराला जागा सुद्धा कमी पडते. ही शासकीय जमीन नागपूर डाकलाईनची आहे. पाताळगंगा नदीच्या काठाने असल्यामुळे अतिवृष्टी मध्ये या बांधकामास धोका पोहोचण्याचा संभव आहे. हे बांधकाम झाल्यास गावाच्या काही भागाला मोठा धोका पोहोचू शकतो, त्यामुळे बांधकाम थांबवणे आवश्यक आहे, असे रामचंद्र महादेव वगदे यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

विवेकानंद आश्रमाची नवीन कार्यकारिणी
मेहकर, २३ जून / वार्ताहर
सामाजिक आणि शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रात काम करीत असलेल्या हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. २००९ ते २०१४ अशा पाच वर्षाकरिता ही कार्यकारिणी राहणार आहे. संस्थेच्या घटनेप्रमाणे अध्यक्षपदी शुकदास महाराज कायम राहणार असून डॉ. शरदचंद्र दातेराव, अशोक पाध्ये यांची उपाध्यक्ष तर सचिव म्हणून स.ज. खाकरे यांची निवड झाली आहे. सहसचिव विष्णू कुलवंत, संजय भारती, सदाशिव सांबपुरे, कोषाध्यक्ष कमलेश बुधवाणी, सदस्यांमध्ये सुखदेव मानघाले, रतनलाल मालपाणी, परशुराम थोरहाते, भिकमसिंह सपकाळ, गजानन अवचितराव देशमुख, जयंत सोनुने, संतोष गोरे, अनिल गाढे, प्रशांत हजारी, अशोक थोरहाते, किशोर गणगणे, संजय म्हस्के, शिवाजी घोंगडे यांचा समावेश आहे. संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांनी आयोजित केलेल्या आमसभेत नवीन कार्यकारिणीची घोषणा होताच सर्व सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

दिवसाढवळ्या ४ लाखाचा ऐवज लंपास
भंडारा, २३ जून/ वार्ताहर
कपीलनगर, तकिया वॉर्ड परिसरातील दोन घरांच्या खिडक्यांमधून घरात प्रवेश करून चोरटय़ांनी सुमारे ४ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना कपीलनगर येथील भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक के.एन. हुकरे तसेच त्यांचे शेजारी तेजराम खंडाते यांच्या घरी घडली. चोरटय़ांनी आलमारीचे दार तोडून सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिणे आणि नगदी रुपये असा ४ लाखांचा ऐवज चोरला. शहरात घरफोडय़ा वाढल्या असून, आता दिवसाढवळ्याही त्या होऊ लागल्या आहेत.

दलालांवर मनुष्य तस्करीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
चंद्रपूर, २३ जून / प्रतिनिधी
नोकरीचे आमिष दाखवून युवकांना परप्रश्नंतात पाठविणाऱ्या दलालांवर मनुष्य तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे. परिसरातील काही दलाल आंध्रप्रदेशातील आंब्याच्या कंपनीत काम देतो, म्हणून शंकरपूर परिसरातील गरीब तरुणांना घेऊन जात असताना चकजाटेपार येथील रोशन मनोहर भसारकर (१६) याचा मृत्यू झाला. या संदर्भात रोशनचे वडील मनोहर भसारकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. परंतु, त्या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही. रोशनला परप्रश्नंतात नेणारे हिरापूर येथील दलाल प्रशांत दाजिबा नगराळे, नाना विठोबा रावळे या आरोपींना पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोपही अ‍ॅड. गोस्वामी यांनी केला आहे. यासंदर्भात भिसी पोलीस ठाण्यात मनोहर भसारकर, अ‍ॅड. गोस्वामी यांनी निवेदन देऊन आरोपींवर गुन्हा दाखल करावा, येणाऱ्या दहा दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

जनशिक्षण संस्थानमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण
वाशीम, २३ जून / वार्ताहर
येथील जन शिक्षण संस्थानमध्ये १ जुलैपासून ४५ दिवसांचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण नागपूर येथील एम.एस.एम.ई. विकास संस्थान व जनशिक्षण संस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये फॅशन डिझायनिंग अ‍ॅन्ड ड्रेस मेकींग या व्यावसायिक प्रशिक्षणाची माहिती सहभागी प्रशिक्षणार्थी महिलांना मिळणार आहे. प्रशिक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग महिलांसाठी ठेवण्यात आले असून अधिक माहितीसाठी ०७२५२-२३१४५ किंवा ०७१२-२५१००४६, २५१०३५२ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

भाज्यांचे भाव कडाडले
कारंजा-लाड, २३ जून / वार्ताहर

पावसाला झालेल्या विलंबाचा परिणाम भाज्यांवरही झाला असून भाज्यांचे भाव कडाडले आहेत. कारंजा येथे संगमनेर, नगर भागातून टोमॅटोची मोठय़ा प्रमाणात आवक होते. याशिवाय अकोला, अमरावती या बाजारपेठेतूनही भाजीपाल्याची सातत्याने आवक होत असते. मात्र, पावसाच्या विलंबाचा परिणाम भाज्यांच्या दर्जावरही झाला आहे. रविवारच्या आठवडी बाजारातही नवीन भाज्यांची आवक कमी आढळली. कारंज्यात रविवारी टोमॅटो २४ रु. किलो, बटाटे १५ रु., कांदे १० व १२ रु., लसून ४० ते ४५ रु., आले ७० रु., सांबार ५० ते ६० रुपये, सीमला मिर्ची ३५ ते ४० रु., फुलकोबी ४० रु., भेंडी ३२ रु., गाजर २४ रु., वांगी १६ रु., कारले २४ रु., छोटा पालक २०रु., बरबटी शेंगा २४ रु., चोपडे दोडके २९रु., शिरीचे दोडके ३२ रु., वाळली लाल मिर्ची ७० ते ८० रुपये प्रती किलो याप्रमाणे भाव असल्याची माहिती केळकर भाजी भांडारचे आशीष केळकर यांनी दिली. वाढते भाव असले तरी भाज्यांचा रसरशितपणा नजरेत भरत नसल्याने कोणती भाजी घ्यावी, असा प्रश्न गृहिणींना सतावतो आहे.

युडीएफने जाळला शाहरुखचा पुतळा
अकोला, २३ जून / प्रतिनिधी

इस्लाम आणि मोहम्मद पैगंबरबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अभिनेता शाहरुखचा पुतळा युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्यावतीने सोमवारी अकोल्यात जाळण्यात आला. अभिनेता शाहरुख खान याने एका मुलाखतीत मोहम्मद पैगंबर आणि इस्लामविषयी अनूचित उद्गार काढल्यामुळे युडीएफने शाहरुखखानचा पुतळा जाळून याचा निषेध केला. शहरातील ताजनापेठ चौकात शाहरुखच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी युडीएफचे विदर्भ महासचिव मजहरखान, सय्यद मोहसीन अली, रियाज खान, साजीद खान, शब्बीर चौहान, कादरखान, गुलाम अहमद, मोहम्मद साकीब, अबरारखान, राजीक खान, अनिस भाई आदी उपस्थित होते.

शिवणगावनजीक अपघातात एक ठार, एक जखमी
गुरुकुंज (मोझरी), २३ जून / वार्ताहर

शिवणगाव (फत्तेपूर) नजीकच्या दर्शनसिंग ढाब्याजवळ नागमोडी वळणावर दुचाकी व ट्रकची धडक होऊन दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा जबर जखमी झाला. त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी १० वाजता ही दुर्घटना घडली. मोझरी येथील संजय चवणे (३५) व महादेव सावंत (४५) हे हीरोहोंडा मोटारसायकलने (एम.एच.२७ ए.एफ.५१२८) शिवणगाववरून मोझरीकडे येत असताना दर्शनसिंग ढाब्याजवळच्या नागमोडी वळणावर नागपूरवरून अमरावतीकडे निघालेल्या ट्रकने (एम.एच.०४ एफ.९६२७) दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील दोघेही ट्रकच्या उजव्या चाकात आले तर दुचाकी वीस फूट दूर फेकली गेली. अपघातात महादेव सावंत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या संजय चवणे हा जबर जखमी झाला.

नुटा पदाधिकाऱ्यांचे धरणे, निदर्शने
अकोला, २३ जून / प्रतिनिधी
नागपूर युनिव्‍‌र्हसिटी टीचर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. प्रश्नध्यापकांना सहावे वेतन आयोग लागू करण्यात यावे, सेट,नेट धारकांवरील अन्याय दूर करण्यात यावा या मागण्यासांठी हे आंदोलन करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनेही केली. नुटाचे जिल्हाध्यक्ष, शिवाजी महाविद्यालयाचे प्रश्नचार्य सुभाष भडांगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार वसंत खोटरे, डॉ. विजय नानोटी, नानासाहेब भडांगे, प्रश्न. धयवर्धन फुंडकर, प्रभु चापके, अनिल काळे, विवेक हिवरे, प्रश्नचार्य कुलट, शंकर राऊत, लक्ष्मण पवार, जगदीश साबू, एस.पी. देशमुख, जयंत बोबडे, अनिल राठोड, धनराज खिराडे, संतोष हुसे आदींचा यामध्ये समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही शिष्टमंडळाने सादर केले.

माणिकराव तिडके यांचे निधन
हिंगणा, २३ जून / वार्ताहर

तालुक्यातील दाभा आगरगाव येथील नागरिक माणिकराव बाळाजी तिडके यांचे रविवारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात ४ मुले व एक मुलगी असून मोठा आप्त परिवार आहे. हिंगणा येथून बाबाराव भोसले यांच्या निवासस्थानावरून सोमवारी ११ वाजता अंत्ययात्रा निघून हिंगणा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी
गोंदिया, २३ जून / वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसची सभा रेलटोली स्थित कार्यालयात नुकतीच पार पडली. पक्षाचे शहर अध्यक्ष जलील पठाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यावर विशेष भर देण्यात येऊन मोहिमेची सुरुवात याप्रसंगी करण्यात आली. सभेमध्ये पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे झाली. प्रफुल्ल पटेलांनी केलेल्या विकासकार्याची माहिती या मोहिमेंतर्गत पोहोचविण्याचे सुचविले. तसेच विकासासाठी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या सभेला राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक गुप्ता, अशोक सहारे, अशोक चौधरी, शिव शर्मा, नगरसेवक रमेश कुरील, मुजीब पठाण, क्रांती चव्हाण, विजेंद्र जैन, हुकूमचंद अग्रवाल, कुंदा भास्कर, ओमी बग्गा, तेजप्रकाश ओझा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सदस्य नोंदणीसाठी पुस्तिकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विष्णू शर्मा यांनी केले.

भद्रावतीत चोरी
भद्रावती, २३ जून / वार्ताहर
येथील पंचशील नगरातील एका घरी चोरटय़ांनी २२ हजार रुपयांच्या ऐवजांसह ८ हजार रोख रक्कम लांबविल्याची घटना नुकतीच घडली. कांता कांबळे यांच्या मालकीच्या घरी शालीक शंभरकर हे भाडय़ाने राहतात. दोघेही आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता चोरटय़ांनी चोरी केली. शंभरकर हे घरी परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. काही दिवसांपासून गौतमनगर येथे रात्रीबेरात्री दार वाजविल्या जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
गया दानव यांचे निधन
येथील विंजासन वॉर्डातील गया तुकाराम दानव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. यशवंत शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक शालीक दानव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे आहेत.