Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

विशेष लेख

बोलते व्हा.. लिहिते व्हा..

 

बोलणं-लिहिणं यात प्रयोग करणं, त्याचा प्रभाव आजमावणं याला सामाजिक-राजकीय क्षेत्रांत फार महत्त्व नाही. आहे त्यात भागवण्याकडे कल असतो. पण आता मीडियाचं महत्त्व आणि तरुणांना आपल्या बाजूने वळवण्याची निकड वाढत चालली असल्याने कार्यकर्त्यांनी कम्युनिकेशनकडे, एसएमएसची योग्य शब्दात रचना करण्यापासून भाषणाचा मसुदा तयार करण्यापर्यंत लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

साबण जसा जाहिरात करून विकला जातो त्याच प्रकारे भ्रातृभाव हे मूल्य लोकांपर्यंत का नाही पोहोचवता येणार? मूळ मुद्दा लोकांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा, आपल्या अजेंडय़ात त्यांना वाटेकरी करून घेण्याचा, त्यांची जबाबदारी पार पाडायला त्यांना प्रेरित करण्याचा, विचारांचं बोट धरून त्यांना कृतीकडे घेऊन जाण्याचा, आपण करत असलेलं काम हे त्यांचंच काम आहे, हे त्यांना पटवण्याचा आणि कामात कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांनाही सहभागी करून घेण्याचा आहे.

महाराष्ट्रातल्या सात शहरांमध्ये २००६ पासून ‘माता- शिशू आरोग्य’ या विषयावर एक प्रकल्प सुरू आहे. माता- शिशू आरोग्य, प्रकल्प हे शब्द वाचून कुणाला वाटेल हे नेहमीचेच सामाजिक काहीतरी (बोअर!) असणार. पण जे जे माणसांशी, माणसाच्या जगण्याशी संबंधित असतं ते कधीही कंटाळवाणं नसतं; असूच शकत नाही आणि जिथे आई आहे, बाळ आहे तिथे तर सगळी मानवी संस्कृतीच आली. म्हणजे हा तर कायमचाच ताजा राहणारा विषय. मीडियात काम करणाऱ्यांना कोणत्याही विषयातला मानवी चेहरा शोधता येतो, चितारता येतो. अगदी रुक्ष समजल्या जाणाऱ्या आकडेवारीतसुद्धा माणसांचं जगणं असतंच ना?
सुरुवातीला या प्रकल्पाचा उल्लेख केला, त्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी संपर्क संस्थेतर्फे जी प्रशिक्षण कार्यक्रमांची मालिका घेत आहोत तिचं सूत्र हेच आहे. कार्यकर्त्यांना आपलं काम व्यापक करायचं असेल, मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, समस्या समाजाची आहे ती सोडवण्यासाठी लोकही योगदान देऊ शकतात, त्यांनी आपला वाटा उचलायलाच हवा, अशी इतरांची गुंतवणूक हवी असेल तर एखाद्या प्रकल्पाच्या चौकटीपलीकडे जाऊन आपल्या कामातला ‘माणूस’ उलगडून दाखवता यायला हवा. त्या त्या विषयाशी संबंधित तथ्य, आकडेवारी, केसेस, धोरणात्मक बाबी हे सगळं आधाराला हाताशी असतंच. माहितीचं महत्त्व अतोनात आहेच, पण निव्वळ माहिती काय कामाची? माणूस आणि माहिती यांची जोडी जुळवता आली पाहिजे. हे जमून गेलं की आपण परिणामकारक सोशल मार्केटिंग करू शकतो. होय, ‘सोशल मार्केटिंग’. हा आजचा शब्द आहे. पूर्वी ज्याला ‘प्रबोधन’ म्हटलं जायचं त्याचंच नवं नाव ‘अ‍ॅडव्होकसी’, ‘सोशल मार्केटिंग’.
अमेरिकेत १९५२ साली जी. डी. वेब या जाहिरात क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांने एक प्रश्न उपस्थित केला. साबण जसा जाहिरात करून विकला जातो त्याच प्रकारे भ्रातृभाव हे मूल्य लोकांपर्यंत का नाही पोहोचवता येणार? वेब यांनी वस्तूंचं मार्केटिंग आणि समकालीन सामाजिक मोहिमा यांचा तुलनात्मक अभ्यास करून म्हटलं की, ज्या सामाजिक मोहिमांनी वस्तूंच्या मार्केटिंगचं तंत्र तंतोतंत अवलंबलं त्या पूर्णपणे यशस्वी ठरल्या. (संदर्भ : जर्नल ऑफ मार्केटिंग- अंक क्र. ३५/ १९७१) अमेरिकेत तर राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या मार्केटिंगची परंपरा जुनीच आहे. नुकताच बराक ओबामा यांच्या निवडणूक मोहिमेत तर रेडिओपासून इंटरनेटवरच्या अत्याधुनिक सुविधांपर्यंत सर्वच्या सर्व माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर आणि कल्पक उपयोग केला गेला हे आपण पाहिलंच. ओबामा यांनी तर त्यांच्या शपथविधीनंतरच्या भाषणासाठीही मुद्दे सुचवण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं आणि अमेरिकन जनतेनेही त्यांच्या पहिल्यावहिल्या भाषणाचा मसुदा बनवण्यात खूप उत्साहाने, आनंदाने सक्रिय भाग घेतला. यासाठीच्या खास ब्लॉगवर लोकांच्या मतं, अपेक्षा यांची भरती आली होती.
यातला मूळ मुद्दा, लोकांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा, आपल्या अजेंडय़ात त्यांना वाटेकरी करून घेण्याचा, त्यांची जबाबदारी पार पाडायला त्यांना प्रेरित करण्याचा, विचाराचं बोट धरून त्यांना कृतीकडे घेऊन जाण्याचा, आपण करत असलेलं काम हे त्यांचंच आहे हे त्यांना पटवण्याचा आणि कामात कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांनाही सहभागी करून घेण्याचा आहे. हा तसा लांबचा रस्ता. तंत्रज्ञान हे साधन, माध्यम आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाने मात्र ही लोकांपर्यंत पोहोचण्याची वाट सोपी आणि जवळची करून दिली आहे. याचं पुरेसं आकलन आपले सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पुढारी यांना झालं आहे का?
माझी आकाशवाणीतल्या कामातली आणि ‘संपर्क’तर्फे केलेल्या सामाजिक प्रश्नांच्या अ‍ॅडव्होकसीमधली निरीक्षणं इथे नोंदवावीशी वाटतात. मीडियामध्ये सामाजिक प्रश्नांना मिळणाऱ्या जागेचा संकोच होत चालला आहे, अशी खंत चळवळीतले कार्यकर्ते नेहमीच बोलून दाखवत आले आहेत. पूर्वी याचं खापर भांडवलदारांचे हस्तक म्हणून काम करणाऱ्या वृत्तपत्रांवर फोडलं जायचं. आता त्यासाठी जागतिकीकरण, मीडिया कॉर्पोरेट होणं वगैरे गोष्टींना जबाबदार धरलं जातं. एका राजकीय पक्षाच्या जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात जाणवलं की, कार्यकर्ते आपल्या विशिष्ट कोनातूनच जगाकडे बघत असतात. त्यामुळे बदलणाऱ्या जगाचं आकलन करून घेण्याला मर्यादा येतात. आपला पक्ष, त्याची भूमिका याबद्दलची निष्ठा समजण्यासारखी. पण आपल्या कामाचा विस्तार करण्यासाठी पक्षापलीकडच्या लोकांपर्यंत पोहोचायचं तर ते लोक आपल्याहून निराळा विचार करणारे असणार हे गृहीत धरायलाच लागतं. अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया हवाच. प्रत्येक सामाजिक, राजकीय संघटनेची आपापली मुखपत्रं असतात. पण त्यांचा वाचक मर्यादित असतो. या मुखपत्रांचा वाचकवर्ग वाढवायचा तर आपल्या भूमिकेहून निराळी भूमिका असणाऱ्यांनाही रुचेल असा मजकूर द्यायलाच लागतो. आम्ही आमच्या प्रशिक्षणात कार्यकर्त्यांचा वृत्तपत्राचं वाचन आणि विश्लेषण असा एक धडाच घेत असतो. हा धडा झाल्यावर, ‘आम्ही वृत्तपत्र अशा प्रकारे कधी वाचलंच नव्हत,ं’ अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते देतात. मुख्य प्रवाहातल्या मीडियाचं स्वरूप सर्वसमावेशक असल्यानेच त्यात प्रत्येकाच्या भूमिकेला जागा असतेच आणि सुरुवातीला म्हटलं तसं जे जे माणसांशी, माणसाच्या जगण्याशी संबंधित, ते कधीही कंटाळवाणं नसतं. फक्त मिळणाऱ्या जागेचा उपयोग करून घेण्याचं कौशल्य अवगत हवं, ही शिकवण हा पाठ देतो.
आकाशवाणीत सामाजिक विषयांवर कार्यक्रम करताना अडचण यायची ती ही की, संबंधित विषयावर उत्तम पकड असणाऱ्या कार्यकर्त्यांला तो विषय आकाशवाणी माध्यमाला हवा त्या पद्धतीने मांडताच यायचा नाही. मुलाखतीसाठी दहा मिनिटे वेळ दिला की कार्यकर्त्यांला वाटायचं, आपला विषय इतका मोठा, महत्त्वाचा.. सांगण्यासारखं इतकं काही असताना फक्त दहा मिनिटं वेळ? आता टीव्ही चॅनल्सनी तर वेळ सेकंदांवर आणून ठेवली आहे. बैठका, जाहीर सभा यात पसरट बोलायची सवय असल्यामुळे कार्यकर्त्यांना माध्यमाच्या गरजेनुरूप आटोपशीर आणि मार्मिक बोलण्यात अडचण येते.
मुळात बोलणं, लिहिणं याचा अभ्यास, सराव, त्यात प्रयोग करणं, प्रभाव आजमावणं याला सामाजिक-राजकीय क्षेत्रांत फार महत्त्व दिलं जात नाही. अभ्यासाचा कंटाळा, आहे त्यात भागवण्याकडे कल असतो. पण आता मीडियाचं महत्त्व आणि तरुण पिढीला आपल्या बाजूने वळवण्याची निकड वाढत चालली असल्याने कार्यकर्त्यांनी कम्युनिकेशनकडे, बोलण्या-लिहिण्याकडे- अगदी एसएमएसची योग्य शब्दात रचना करण्यापासून भाषणाचा मसुदा तयार करण्यापर्यंत लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
मुद्दा हा की, कार्यकर्त्यांनी मीडियामधून बोलत आणि लिहीत राहणं गरजेचं आहे. मुख्य प्रवाहातल्या मीडियाचेही हितसंबंध असतात आणि त्याच्या आड येणाऱ्या विषयांना स्थान मिळणार नाही, असंही घडतं. अशा वेळी नियंत्रणमुक्त ई माध्यमांद्वारे लोकांपर्यंत नक्की पोचता येतं. या ई माध्यमांची भाषा पुन्हा निराळी! तरुण पिढीपर्यंत पोहोचायचं तर ई माध्यमंच जास्त महत्त्वाची आहेत. सुरुवातीला उल्लेख केला त्या ‘माता- शिशू आरोग्य’ या विषयावर महाराष्ट्रातल्या सात शहरांमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात आम्ही वृत्तपत्रवाचन आणि बातमी लेखनाच्या पाठापासून केली होती. आता ते सर्वजण ‘जननी सुरक्षा जागृती अभियान’ अशी मोहीम आखण्यापर्यंत येऊन पोहोचले. हे अनुकरणीय आहे. सरकारी धोरणावर प्रभाव, धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी तर मीडिया महत्त्वाचा आहेच, पण राजकारणावर प्रभाव टाकण्याची ताकदही अशा सोशल मार्केटिंगमध्ये नक्की आहे.
मेधा कुळकर्णी
संपर्क चरखा नेटवर्क
net.sampark@gmail.com