Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

विविध

नजमा हेपतुल्ला यांचेही आता भाजप नेतृत्वावर शरसंधान..
शिकागो, २३ जून/पीटीआय

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये जाहीरपणे सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत आता ज्येष्ठ नेत्या नजमा हेपतुल्लाही उतरल्या आहेत. निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाने पुरेसा गृहपाठ केला नाही, तसेच वरुण गांधी यांच्या भाषणाचाही पक्षाला फटका बसला, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप
नवी दिल्ली, २३ जून/पी.टी.आय.

आग्नेय दिल्लीतील एका पोलीस स्थानकात तेथील ठाणेदार (स्टेशन ऑफीसर) आणि चार अन्य पोलिसांनी आपल्यावर पाशवी बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. महिलेच्या या तक्रारीमुळे पोलीस ठाण्यासमोर हिंसक निदर्शने झाली असून संतप्त नागरिकांनी या ठाण्याच्या इमारतीचीही नासधूस केली.

अमेरिकेत तंबाखूविरोधी ऐतिहासिक कायद्यावर ओबामांची स्वाक्षरी..
वॉशिंग्टन, २३ जून/पीटीआय

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज तंबाखूविरोधी ऐतिहासिक कायद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे सिगारेट उत्पादकांचे अनेक अधिकार कमी झाले आहेत. तंबाखूसेवनाच्या विरोधात उचललेले हे पाऊल क्रांतिकारक मानले जात आहे. अमेरिकेत वयाच्या १८ वर्षांखालील किमान एक हजार मुले रोज धूम्रपान करतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

ओरिसात कालिदासांचे मंदिर
केंद्रपाडा (ओरिसा), २३ जून / पीटीआय

आजच्या आधुनिक युगात संस्कृत भाषेचे अस्तित्व संपत चालल्याचेच प्रत्ययास येते. परंतु ओरिसातील या गावात संस्कृत कवी कालिदासावरची श्रद्धा आजही टिकून आहे. चौथ्या शतकातील राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या दरबातील कवी कालिदासाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करणाऱ्या मंदिरात येथील गावकरी मोठय़ा भक्तीभावाने जातात. तसेच कालिदास यांचा जयंती सप्ताहही दरवर्षी मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. मंगळवारी महाकवी कालिदास दिनीही मंदिरात भक्तांची रिघ लागली होती. ‘शाकुंतल’सारख्या अजरामर महाकाव्याचे जनक कालिदास यांचे मंदिर येथून १२ कि.मी. अंतरावर आहे. शतकाहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या या मंदिराचे नेमके ऐतिहासिक दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. परंतु हिंदू भाविक मोठय़ा भक्तीभावाने कालिदासांची पूजा करतात. प्रख्यात संस्कृत संशोधक दिलीप दत्त हेही या वार्षिक जयंती सोहळ्यात उत्साहाने सामील झाले. दत्त यांनी सांगितले की, लोक कालिदासांना हिंदू देव मानून पूजतात अशी माझी धारणा होती, परंतु आपण महान संस्कृत कवीची पूजा करतोय याची लोकांना जाणीव आहे, हे पाहून आपल्याला सुखद धक्का बसला.

इस्टमन कोडॅकची कलर फिल्म आता इतिहासजमा..
रोचेस्टर (न्यूयॉर्क), २३ जून/ए. पी.

चित्रपट बनविण्यासाठी एकेकाळी जणू परवलीचा शब्द असलेली इस्टमन कोडॅक कंपनीची कलर फिल्म (कोडॅक्रोम) आता या फिल्मला बाजारात उठाव नसल्यामुळे इतिहासजमा होणार आहे..चित्रपटांच्या स्थिर आणि चलत् चित्रीकरणासाठी जगभरातील छायाचित्रकारांची आवडती असलेल्या या फिल्मचे उत्पादन या वर्षीच्या हिवाळ्यापासून बंद करण्याचे कोडॅकच्या मावळत्या अध्यक्षा मेरी जेन हेल्यार यांनी नुकतेच जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला.. मागील ७४ वर्षे पॉल सायमन यांनी बाजारात आणलेली ही इस्टमन फिल्म कोडॅक कंपनीची जणू ओळख बनलेली होती. पण सध्याच्या डिजिटल चित्रणाच्या युगात या फिल्मला मागणी नाही. स्थिर चित्रणासाठी लागणाऱ्या कंपनीच्या इतर फिल्म्स्च्या तुलनेत या जुन्या ईस्टमन फिल्मची विक्री एक टक्का सुध्दा नाही. त्यामुळेच अनेक चाहत्यांना हळवे व्हायला लावणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. निसर्गाचे हिरवेगार दर्शन, अनेक हिंदी चित्रपटांमधील यादगार गाण्यांचे दर्शन रसिकांना १९६० च्या दशकात याच जुन्या फिल्मद्वारे होत होते. इस्टमन कलर फिल्म अशी त्यांची जाहिरातही होत असे.

बैतुल्लाचा प्रतिस्पर्धी झैनुद्दीनचा अंगरक्षकांकडूनच खून
इस्लामाबाद २३ जून/पीटीआय

पाकिस्तानातील तेहरीक ए तालिबान या संघटनेचा प्रमुख बैतुल्ला मेहसूद याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला वरिष्ठ दहशतवादी कमांडर कारी झैनुद्दीन याला त्याच्या रक्षकानेच गोळ्या घालून ठार मारले. दरम्यान पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांतानजीक अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सात तालिबानी दहशतवादी ठार झाले. बैतुल्ला मेहसूदचा प्रतिस्पर्धी असलेल्या झैनुद्दीन याला डेरा इस्माईल खान येथील मदिना कॉलनीत असलेल्या त्याच्या निवासस्थानी रक्षकांपैकी एकाने गोळ्या घातल्या, हल्लेखोर नंतर पळून गेले. आज सकाळी ही घटना घडली. त्याचा निकटचा साथीदार बाझ मोहंमद या हल्ल्यात जखमी झाला आहे. सुरक्षा रक्षकांपैकी एकजण झैनुद्दीनच्या खोलीत घुसला व त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यावेळी झैनुद्दीन त्यावेळी सकाळचे नमाजपठण करून विश्रांती घेत होता.

पावसाची करुणा भाकण्यासाठी छत्तीसगड सरकारचा ‘वरुणयज्ञ’
रायपूर, २३ जून / पीटीआय

उन्हाची काहिली आणि पावसाची दिरंगाई यामुळे छत्तीसगडला वेठीस धरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने चक्क ‘वरुणयज्ञ’ करून वरुणराजाची करुणा भाकली आहे. राज्याचे कृषीमंत्री चंद्रशेखर साहू यांनी ऐतिहासिक बुधेश्वर माधव मंदिरात सोमवारी ‘वरुणयज्ञ’ केला. भारतीय संस्कृती-परंपरेप्रमाणेच आम्ही हा यज्ञ केला असून, वरुणराजा आमच्या याचनेचा मान राखेल आणि लवकरच मुसळधार पाऊस बरसेल. त्यामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणात धनधान्य पिकेल, अशी आशा साहू यांनी यावेळी व्यक्त केली. छत्तीसगडमध्ये सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्याच आठवडय़ात पाऊस पडतो. परंतु सध्याचे निस्तेज वातावरण आणि हिरमुसलेल्या पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज यामुळे राज्य सरकार आणि शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. खरीपाची पिके घेण्यासाठी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत.

पहिल्या १ लाख ५५ हजार ‘नॅनो’ कार ग्राहकांची
टाटा मोटर्सने केली निवड
नवी दिल्ली, २३ जून/पीटीआय

जगातील सर्वात कमी किमतीच्या असलेल्या नॅनो कारच्या पहिल्या १ लाख ५५ हजार ग्राहकांची टाटा मोटर्सने आज निवड केली आहे. या ग्राहकांना पुढील महिन्यापासून नॅनो कार देण्यास प्रारंभ होईल. पहिल्या एक लाख नॅनो कार ग्राहकांना मार्च २०१० पर्यंत वितरित करण्यात येतील. त्यानंतर पुढच्या टप्प्यात ५५०२१ ग्राहकांना या कार देण्यात येणार आहेत. नॅनो कार घेण्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी २०६७०३ जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख ५५ हजार ग्राहकांची निवड करण्यात आली. ही सर्व निवडप्रक्रिया संगणकीकृत लॉटरीद्वारे पार पाडण्यात आली. पहिल्या एक लाख ग्राहकांना नॅनो कार एक लाख रुपयांत देण्यात येणार आहे. ही एक्स-शोरुम किंमत आहे. ग्राहकांना नॅनो कार लवकरात लवकर वितरित करता याव्या असाच टाटा मोटर्स कंपनीचा प्रयत्न आहे. पंतनगर प्रकल्पामध्ये सध्या नॅनो कारचे उत्पादन सुरू असून साणंद येथेही ते लवकरच सुरू होईल.