Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

व्यापार - उद्योग

भारतातील लघु व मध्यम उद्योगांसाठी आशादायी चित्र
‘यूपीएस एशिया बिझनेस मॅनेजमेंट’चे सर्वेक्षण

व्यापार प्रतिनिधी: आíथक मंदीच्या काळातही देशातील लघु व मध्यम उद्योगांसाठी आशादायी चित्रं असल्याचा निष्कर्ष ‘यूपीएस एशिया बिझनेस मॅनेजमेंट’ च्या यावर्षीच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. हे सर्वेक्षण ऑस्ट्रेलिया, चीन , हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, जपान, कोरिया, मलेशिया, फिलिपाइन्स, तैवान आणि थायलंड या आशियाप्रशांत क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योगांच्या १२०० अधिकाऱ्यांशी चर्चा करून करण्यात आले आहे.

फ्युचर जनरालीतर्फे नवीन ‘फ्युचर आनंद’ पॉलिसी
व्यापार प्रतिनिधी: भारतातील फ्युचर ग्रुप तसेच इटलीच्या जनराली ग्रुप यांनी विमा क्षेत्रात संयुक्तपणे स्थापलेली कंपनी ‘फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी’ने आजीवन तसेच एंडोवमेंट अ‍ॅश्युरन्स यांचा मेळ घालणारी ‘फ्युचर आनंद’ पॉलिसी प्रस्तुत केली आहे. दोन पॉलिसींवर होणाऱ्या खर्चापेक्षा अत्यंत कमी गुंतवणुकीत एकाच पॉलिसीवर दुहेरी संरक्षण देणारी ही पॉलिसी म्हणजे देशातील बचतीबाबत दक्ष विमाकर्त्यांसाठी आदर्श पर्याय ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.

‘बजाज अलियान्झ लाइफ’ची ‘इन्व्हेस्ट प्लस’ पारंपरिक विमा योजना
व्यापार प्रतिनिधी: बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने पारंपरिक पद्धतीची ‘इन्व्हेस्ट प्लस’ ही नवी आयुर्विमा योजना बाजारात आणली आहे. ही पारंपरिक पद्धतीची योजना असली तरी ती युनिट निगडित विमा योजनेची (युलिप) संपूर्ण लवचिकता देते आणि प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीवर किमान निश्चित लाभ जाहीर करते. बाजारातील स्थितीचा परिणाम होऊ न देता हा लाभ पूर्ण वर्षासाठी समान राखला जातो.

व्यापार संक्षिप्त
औषध निर्माता संघाचे संशोधनविषयक पुढाकारासाठी महत्वपूर्ण संस्थांशी सामंजस्य
व्यापार प्रतिनिधी: देशातील औषध निर्मात्यांचा महासंघ अर्थात ‘ओपीपीआय’ने येत्या काळात संशोधन व विकासावर संयुक्तपणे भर देण्याचा एक भाग म्हणून देशातील दोन महत्वाच्या संस्थांशी सामंजस्याचा करार केला आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (एनआयपीईआर) आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) या दोन संस्थांशी सामंजस्याचा करार करण्यात आला आहे. औषध क्षेत्रात नाविन्यतेवर भर देण्याचा महासंघाचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असून, त्याच संबंधाने पुढचे पाऊल टाकताना ‘सायंटिस्ट्स अ‍ॅण्ड यंग सायंटिस्ट्स अ‍ॅवार्ड्स’ या पुरस्कार योजनेची महासंघाने घोषणा केली आहे. वरील दोन संस्थांमधील वैज्ञानिक आणि तरुण होतकरू वैज्ञानिकाची दरसाल निवड करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये रोख रकमेचे पारितोषिक व सन्मानचिन्ह बहाल करण्याची महासंघाची योजना आहे.

महिंद्र हॉलिडेज् भागविक्रीचा उद्याचा अंतिम दिवस
व्यापार प्रतिनिधी: जवळपास वर्षभराच्या विश्रांतीनंतर भांडवली बाजारात प्रश्नरंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) दाखल झालेली दमदार कंपनी महिंद्र हॉलिडेज् अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स लिमिटेडची भागविक्री येत्या शुक्रवारी २६ जून रोजी समाप्त होत आहे. १० रु. दर्शनी मूल्याच्या ९२.६५ लाख समभागांसाठी असलेल्या खुल्या प्रश्नरंभिक विक्रीसाठी प्रति समभाग रु. २७५ ते रु. ३२५ या दरम्यान किंमत बोली निश्चित करण्यात आली आहे. २३ जानेवारीला ही भागविक्री खुली झाल्याच्या पहिल्याच दिवशी १८.७५ समभागांसाठी अर्थात २० टक्के समभागांसाठी भरणा पूर्ण करून कंपनीने दमदार सुरुवात केली आहे. भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा विनियोग कंपनीकडून कूर्ग, बिन्सारी (उत्तराखंड), अष्टमुदी (केरळ), तुंगी (महाराष्ट्र) येथे उभारल्या जाणाऱ्या नव्या रिसॉर्ट्सवर केला जाणार आहे. कंपनीचे सध्या भारतात व थायलंडमध्ये २७ रिसॉर्ट्स आणि त्या अंतर्गत १,२६१ अपार्टमेंट्स कार्यरत आहेत. महिंद्र हॉलिडेज्च्या सदस्यांची संख्या ९६,०६७ वर गेली असून, केवळ गेल्या एका आर्थिक वर्षात सदस्यांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या चार वर्षात कंपनीच्या करोत्तर नफ्यात वार्षिक सरासरी ७६ टक्के वृद्धीदराने प्रगती झाली आहे.

कॅनरा बँकेच्या मुख्यालयात ‘रिटेल अ‍ॅसेट हब’
व्यापार प्रतिनिधी: सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने आपल्या मुख्य कार्यालयात ‘रिटेल अ‍ॅसेट हब’चे अलीकडेच उद्घाटन केले. बँकेचे महाव्यवस्थापक एम. रामकुमार यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले. ग्राहक हाच बँकेचा भक्कम आधार असून, ग्राहकांना सुलभ आणि अविलंब कर्जमंजुरी करून देणे हे या हबचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे यावेळी बोलताना रामकुमार यांनी सांगितले. उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील खातेधारक तसेच नव्या पिढीतील तंत्रज्ञानसमर्थ युवा ग्राहकांना आकर्षित करणे; आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतशीर कार्यप्रणालीचा वापर करून अविलंब कर्जसुविधा उपलब्ध करून देणे आणि केंद्रीभूत प्रक्रियेद्वारे कर्जमंजुरी आणि कर्जवितरण करणे अशी कामे या रिटेल अ‍ॅसेट हबद्वारे पूर्ण केली जातील. उद्घाटन समारंभाला बँकेचे उपमहाव्यवस्थापक डेनिस रॉड्रिग्ज आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक राणे हे या रिटेल अ‍ॅसेट हबचे प्रमुख राहतील.

‘मिशेलिन’ चा ‘टायर प्लस’ अभिनव उपक्रम
व्यापार प्रतिनिधी: मोटारींचे टायर बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी मिशेलिन टायर्स आणि एन. मेहता टायर्स यांनी सुरू केलेला टायर प्लस शो रूम हा विक्री उपक्रम आज पुण्यात सुरू झाला. मिशेलिन इंडिया टायर्स चे विक्री आणि मार्केटिंग विभागाचे प्रमुख फिलिप नेरत आणि विपणन व्यवस्थापक शंतनू देशपांडे या वेळी उपस्थित होते. नाशिक फाटा येथे असलेल्या या स्टोअर मध्ये टायर आणि टायरविषयीची कोणतीही सेवा पुरवण्यासाठी, सर्व आधुनिक यंत्रांनी सुसज्ज असे वर्कशॉप आहे, असे नेरत यांनी सांगितले.