Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

व्यापार संक्षिप्त
औषध निर्माता संघाचे संशोधनविषयक पुढाकारासाठी महत्वपूर्ण संस्थांशी सामंजस्य

 

व्यापार प्रतिनिधी: देशातील औषध निर्मात्यांचा महासंघ अर्थात ‘ओपीपीआय’ने येत्या काळात संशोधन व विकासावर संयुक्तपणे भर देण्याचा एक भाग म्हणून देशातील दोन महत्वाच्या संस्थांशी सामंजस्याचा करार केला आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (एनआयपीईआर) आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) या दोन संस्थांशी सामंजस्याचा करार करण्यात आला आहे. औषध क्षेत्रात नाविन्यतेवर भर देण्याचा महासंघाचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असून, त्याच संबंधाने पुढचे पाऊल टाकताना ‘सायंटिस्ट्स अ‍ॅण्ड यंग सायंटिस्ट्स अ‍ॅवार्ड्स’ या पुरस्कार योजनेची महासंघाने घोषणा केली आहे. वरील दोन संस्थांमधील वैज्ञानिक आणि तरुण होतकरू वैज्ञानिकाची दरसाल निवड करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये रोख रकमेचे पारितोषिक व सन्मानचिन्ह बहाल करण्याची महासंघाची योजना आहे.
ट्रम्प आणि डॉल्फिन बक्षीस योजनेचे विजेते
व्यापार प्रतिनिधी: महानगर टेलिफोन निगम लि.ने आपल्या सेल्युलर सेवा ट्रम्प आणि डॉल्फिनच्या ग्राहकांसाठी मार्च ते जून महिन्यात जाहीर केलेल्या बक्षीस योजनेच्या विजेत्यांची नावे घोषित केली आहेत. मारुती स्विफ्ट कार आणि सोने जिंकण्याची संधी देणारी बक्षीस योजना ३१ मार्च ते २२ जून २००९ दरम्यान योजण्यात आली होती. या कालावधीत दोन्हीपैकी कोणत्याही सेवेवर किमान १०० रु. बिलिंग/ रिचार्ज करणारे ग्राहक या बक्षीस योजनेत सहभागासाठी पात्र ठरले आहेत. मुंबईतील ट्रम्पचे २१,००६ ग्राहक तर डॉल्फिनचे १,२२२ ग्राहक या बक्षीस योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी मारुती स्विफ्ट कारचे पहिले इनाम आनंद शेंडे यांनी जिंकले तर, ५० ग्रॅम सोन्याच्या दुसऱ्या इनामाचे मानकरी मृगेंद्र पाल हे ठरले आहेत. २० ग्रॅम सोने अशा तिसऱ्या इनामाचे पाच मानकरी हे मोहम्मद अन्सारी, भानुदास पवार, सुरेश कुंभार, अब्दुल रहमान अब्दुल मन्नान आणि सलीम रसूल पठाण हे ग्राहक आहेत.
मर्सिडीजतर्फे अहमदाबादमध्ये अधिकृत सेवा केंद्र
व्यापार प्रतिनिधी: मर्सिडीज बेंझ इंडियाने त्यांच्या नवीन शोरूम आणि अधिकृत सेवा केंद्राचे अहमदाबाद येथे उद्घाटन केले. या शोरूममध्ये त्यांच्या अत्याधुनिक अशा रोडस्टरपासून एएमजी रेंजचा समावेश तर आहेच पण त्याचबरोबर एसएलके ५५ आणि एसएल ६३ एएमजी यांचाही समावेश करण्यात आला आहे. गुजरातमधील एकमेव अशा बेंचमार्क कार्स या त्यांच्या डीलरशिपचे उद्घाटन मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डॉ. विल्फ्रेड अल्बर आणि बेंचमार्क कार्सचे चेअरमन संजय ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. बेंचमार्क कार्सचे हे केंद्र एसजी हायवे येथे असून ते २५००० चौरस फूट या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. या डिलरशिप आणि सेवा केंद्रामध्ये अल्ट्रा मॉडर्न मर्सिडीज बेंझ ३ एस इंटिग्रेटेड क्षमता असून या संकल्पनेअंतर्गत एकाच ठिकाणी विक्री सेवा आणि सुटे भाग उपलब्ध होतील.
लोढाच्या प्रकल्पात तीन महिन्यांत १००० हून अधिक घरांचे बुकिंग
व्यापार प्रतिनिधी: लोढा ग्रुपच्या डोंबिवलीमधील सुरुवातीनेच हा बांधकाम क्षेत्राच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी प्रकल्प म्हणून अगोदरच सिद्ध केलेले आहे. लोढा ग्रुपचा सबब्रॅन्ड असलेल्या कासाने गेल्या तीन महिन्यात आपल्या कासा युनिव्हिस, रोयाल, अल्टिमा, एसेझा आणि आता कासा बेला या विविध गृहमालिकांतर्गत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री करून या क्षेत्रात अतिविशेष स्थान निर्माण केले आहे. सध्याच्या परिस्थितीत कासा बेलाने उद्घाटनानंतर अवघ्या तीन महिन्यात १००० च्या वर बुकिंग पूर्ण केले आहे.