Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

अन्नाच्या भेसळीवरील रामबाण डीएनए चाचण्या
सध्या डीएनए चाचण्यांबद्दल सगळीकडेच वाढते औत्सुक्य आहे. पण ते औत्सुक्य खास करून वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित आहे. व्यक्ती व्यक्तिमधील अनुवंशिक संबंध डीएनए चाचणीने सिद्ध होतो. तो आई-मुलामधील असेल, वडील व मुलामधील असेल किंवा अशाच किती तरी नात्यामधील असेल. याखेरीज डीएनएच्या जनुक चाचण्या अनुवंशिक रोगाचे भाकित करू शकतात आणि काही ठिकाणी व्याधीची निश्चिती पण सांगू शकतात. पण डीएनए हा सर्व जीवसृष्टीत आढळत असल्याने, ज्यात प्रश्नणी आणि वनस्पतीही आल्या, तो कितीतरी गोष्टींचे संबंध दाखवू शकतो हे ओघाने आलेच. डीएनए चाचण्याचा असा सार्वत्रिक वापर विदेशात सुरू झाला असला तरी त्यांचे महत्त्व आपल्या जनमानसात अजून रुजायचे आहे. ते रुजायला नव्याने प्रचलित होणाऱ्या आहारातील विविध घटकांच्या डीएनए चाचण्या मदत करीत आहेत आणि या चाचण्या किती व्यापक आहेत हे दाखवून देत आहेत. अन्नाशीच त्यांचा संबंध असल्याने त्या ग्राहकोपयोगी ठरत आहेत. युरोपातील राष्ट्रांत, तसेच अमेरिकेत चाचण्यांबद्दलची सजगता वाढती आहे. मुख्य म्हणजे शासनाकडून त्यांचा पाठपुरावा होतो आहे. भेसळीचे भेसूर प्रमाण लोकांच्या डोळ्यासमोर जितके जास्त येईल आणि खऱ्याखोटय़ातील फरक जितका जास्त कळेल तसे ग्राहकच जाणकार बनून आपला मोर्चा दर्जेदार उत्पादनांकडे वळवतील अशीच या चाचण्यामागील भूमिका आहे. आपल्यापैकी काही शाकाहारी तर काही मांसाहारी. शाकाहारी अन्नातील धान्यांची शुद्धता तर मांसाहारी आहारातील मांसाची शुद्धता (उदा. चिकन, मटन किंवा मासे) पाहताना वरवरची पहाणी बरोबर ठरेल अशी शाश्वती सध्या नाही. आजकालच्या महागाईच्या काळात चांगली प्रत सांगून दुय्यम प्रत देण्याचा प्रघात वाढतो आहे. त्याला आळा घालायचा असेल तर तशाच रामबाण उपायाची आवश्यकता आहे. हा उपाय आहे डीएनए चाचणीचा! डीएनए चाचणीने प्रश्नण्या प्रश्नण्यातील, धान्या धान्यातील फरक कळत असल्याने ती खऱ्या अर्थाने सार्वत्रिक चाचणी सिद्ध होत आहे.

कॅरेबियन प्रवाळांच्या रचनेतील बदलांमुळे जैवविविधतेला धोका
गेल्या ४० वर्षात कॅरेबियन सागरातील प्रवाळ बेटे त्यांच्या रचनेत बदल होऊन ‘सपाट’ झाली असून, त्यांना वाचवण्यासाठी वेगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिआच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात व्यक्त करण्यात आले आहे. सागरातील प्रवाळांचे संशोधन प्रश्नचीन काळापासून सुरू आहे, परंतु ते संशोधन या प्रवाळांची नेमकी ठिकाणे त्यांचे उपयोग याविषयी होते. आता प्रवाळ बेटे सपाट का होतात, याचे संशोधन करायची वेळ आली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे सागरी जलाचे वाढणारे तापमान व मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी यामुळे या प्रवाळांना मोठा धोका निर्माण होतो. प्रवाळ नष्ट झाल्याने किंवा त्यांच्या रचनेत बदल झाल्याने माशांच्या उत्पादनावर वाईट परिणाम होतो हे समजून घेतले म्हणजे या समस्येचे महत्त्व लक्षात येईल. प्रवाळांमुळे सागरी जैवविविधतेचे रक्षण तर होतेच, पण या किनारी प्रदेशात वस्ती करणाऱ्या माणसांनाही त्यांचे बरेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे होत असतात. कॅरेबियन समुद्रातील प्रवाळ सपाट झाल्याने हे सर्व वाईट परिणाम दिसत आहेत.