Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

लोकमानस

आगामी शैक्षणिक आपत्तीकडे लक्ष हवे
युनेस्कोने जाहीर केलेल्या शैक्षणिक मानांकनात भारताचा क्रमांक ११७ वा असल्याचे वाचून अतिशय खेद वाटला. प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थ्यांची पुढे गळती होते हे वास्तवही यात सामोरे आले. देशाच्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाची स्थिती दारुण आहे. काही शाळांमध्ये अजूनही उघडय़ावर वर्ग घेतले जात असल्याची छायाचित्रेही मध्यंतरी प्रसिद्ध झाली होती.

 


प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया असताना शिक्षणातील गळती रोखण्यासाठी म्हणजेच मुलांना शाळेत यावे असे वाटण्यासाठी किंवा पालकांनी त्यांना शाळेत पाठवावे यासाठी ग्रामीण भागामध्ये विविध पर्याय शोधण्याची तसेच छोटे छोटे उपक्रम आखण्याची गरज आहे. यातीलच एक भाग म्हणून शासनाने माध्यान्ह भोजन योजना, शालेय पोषण योजना लागू केली पण योग्य नियोजनाअभावी आणि सरकारी योजनांना पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराच्या किडीने येथेही मूळ धरल्याने या योजनेचे तीन तेरा वाजले.
मध्यंतरी बुधगाव (सांगली) येथील प्राथमिक शाळेत अन्नविषबाधेचा प्रकार घडला आणि त्या शाळेच्या परगावी गेलेल्या मुख्याध्यापकांना दोषी धरून शिक्षण विभागाने त्यांना निलंबित केले. राज्यात शिक्षण क्षेत्राचे आणि भावी पिढय़ांचे वाटोळे सुरू आहे. त्यातलाच हा प्रकार. शालेय पोषण आहार योजना चांगली आहे, याबद्दल दुमत नाही. गोरगरिबांच्या मुलांना त्याचा लाभ मिळतो हेही सत्य आहे. मात्र शाळा हे शिक्षणाचे केंद्र आहे. तिथे भावी पिढय़ा घडवल्या जातात. त्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांची आहे ही बाब शिक्षणखाते विसरते. शिक्षण खात्याला शालेय पोषण आहार योजनेबद्दल शाळांनाच जबाबदार धरायचे असेल तर त्यांनी शाळांतील शिक्षण बंद करून तेथे खानावळी सुरू कराव्यात. मुख्याध्यापक, शिक्षकांना आचारी, वाढपी बनवून शाळांचे भोजनालये करावीत. भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत बुडालेल्या राजकारण्यांच्या हातात जोपर्यंत समाजहिताच्या योजना राहतील तोपर्यंत प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार होतच राहणार.
अशा योजनांमध्ये शिक्षकांना जबाबदार धरल्यामुळे त्यांचे शाळेतील शैक्षणिक कामकाजावरील लक्ष कमी होते. तसेच शैक्षणिक सर्वेक्षण, जनगणना, मतदार नोंदणी, पोलिओ लसीकरण अशी अध्यापनबाह्य़ कामे सांभाता सांभाळता शिक्षक शाळेत केवळ पाटय़ा टाकण्याचेच काम करीत राहणार. महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी (चौथीमध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असतानाही) इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचे (ऌ.ळ.र.) खूळ काढले. खेळण्या बागडण्याच्या वयात हा अनावश्यक ताण मुलांवर कशासाठी लादायचा? तसेच पहिलीपासून संपूर्ण वर्षांत मिळून चार घटक चाचण्या त्यांनी सुरू केल्या. या सगळ्या प्रकारांमुळे ग्रामीण भागांमध्ये मुलांना शिक्षणामध्ये गोडी वाटत नाही. शाळा देत असलेला भरमसाट गृहपाठ ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांकडून करवून घेऊ शकत नाहीत.
एकीकडे दहावीच्या परीक्षेसाठी श्रेणीपद्धतीचा विचार केला जात असताना लहान इयत्तांसाठी अशा योजना शाळांतील गळती वाढतच नेत आहेत.
दुसरीकडे, दोन-अडीचाव्या वर्षी बालवाडीत जाणारी मुले शहरी भागांत दिसतात. त्यांच्या चिमण्या खांद्यांवर पालकांच्या मनातील मार्काचे, स्पर्धेचे, ईर्षेचे ओझे लादलेले असते. त्यात शाळा व खाजगी क्लासेसच्या महत्त्वाकांक्षांची वाढत्या इयत्तेनुसार भर पडते. हे सर्व मुलांच्या जीवन शिक्षणासाठी आपत्तीचे लक्षण आहे. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रातल्या या आपत्तीकडे आपण किती गांभीर्याने पाहतो यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
विवेक ढापरे, कराड

‘सारेगमप’ की ‘सारेगमप्र’?
अ‍ॅड. श्रीकांत भट यांचे ‘दोस्तहो, परीक्षकांची ऐशी की तैशी’ (२ जून) या मथळ्याखालील पत्र भावले. तथापि भट हे उत्कृष्ट वकील असल्यामुळे त्यांनी विचार खूपच सौम्यपणे मांडलेले जाणवले. खरोखरच प्रस्तुत लोकप्रिय कार्यक्रमाला सध्या ‘सारेगम प्रवचन’ असे स्वरूप आले आहे. प्रत्येक गाण्यानंतर पं. हृदयनाथ मंगेशकर याचे भाष्य अप्रतिम असले तरी त्याला प्रवचनाचा वास येत असतो. पंडितजींच्या बुद्धिमत्तेबद्दल, स्मरणशक्तीबद्दल, आध्यात्मिक पातळीबद्दल वा पाठांतराबद्दल प्रश्नच नाही. पण ते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कितपत योग्य आहे? कितीसे उचित आहे? गाण्याचा उगम व त्याचा अर्थ याची फोड करून सांगणे हे या खास गायनस्पर्धेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? यामुळे कार्यक्रमाचा बेरंग होतो.
सुरेश वाडकर हे पट्टीचे गायक व संगीताचे गाढे अभ्यासक आहेत हे मान्य करूनही असे म्हणावेसे वाटते की त्यांचे मार्गदर्शन खूप तांत्रिक असते. कितीशा स्पर्धकांना ते कळत असावे याबद्दल शंका वाटते.
सतत ‘मामाजी’चा जप कार्यक्रम वैयक्तिक पातळीवर आणून ठेवतो. त्याचप्रमाणे परीक्षकांनी वेळोवेळी एकमेकांची भरमसाठ स्तुती करणे टाळावे या भट यांच्या मताशी सारे संगीतप्रेमी सहमत होतील हे नक्की. पल्लवीताईंनी ‘खूप’ हा शब्द वापरताना कंजूषी करावी व उगाच ‘बिझिनेस’ करण्याची सवय सोडून द्यावी. या कार्यक्रमानंतर रात्री ११ वाजता असंख्य प्रेक्षक ‘असंभव’ची आतुरतेने वाट पाहत असतात याची जाणीव असावी व हा कार्यक्रम बरोबर ११ वाजताच संपवावा.
रवींद्र पाटकर, वांद्रे, मुंबई

असंसदीय शब्दप्रयोग
‘दोस्तहो, परीक्षकांची ऐशी की तैशी!’ हे अ‍ॅड. श्रीकांत भट यांचे पत्र वाचले. स्पर्धकांनी परीक्षकांची भीती न बाळगता, ताणतणाव, दडपण न बाळगता गावे, हे पोटतिडिकीने लिहिण्याच्या भरात त्यांनी ‘ऐशी की तैशी’ हा असंसदीय शब्दप्रयोग केला आहे. त्यांच्या पत्रावरून ते जाणकार रसिक आहेत, हे ध्यानात येते, हे मात्र खरे.
प्रत्येक स्पर्धकास तीन अंतरे गाऊ दिले पाहिजेत, हे तत्त्वत: योग्य आहे. पण त्याने स्पर्धकांची संख्या एकतृतीयांशाने कमी झाली असती. जास्तीत जास्त स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येणे महत्त्वाचे नाही का? परीक्षक हे संगीतातील तज्ज्ञ असल्यामुळे ते स्पर्धकाचे योग्य मूल्यांकन दोन अंतरे ऐकल्यावर सहज करू शकतात. भरपूर वेळ मिळाला तरी गाणे श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतेच, असे नाही. अनेक विख्यात गजलनवाज आलाप, ताना, हरकती, मुरक्या, मिंड घेतात. सरगम गातात. अध्येमध्ये श्रोत्यांशी संवाद साधत तीस मिनिटे गातात पण त्यांची गजल हृदयापर्यंत पोहोचतेच, असे नाही. याउलट, गजलसम्राज्ञी बेगम अख्तर फैजाबादीच्या तीन मिनिटांच्या रेकॉर्डमध्ये हे घडते. पहिलाच सूर हृदयाला चिरत जातो.
परीक्षक सांगत असलेल्या किश्शांमध्ये मात्र मूळ माहिती किती व कल्पनाविलास किती, याचा पडताळा घ्यावासा वाटतो. तसेच स्पर्धकाकडून निवडण्यात येणारी दोन्ही गाणी परीक्षकांनी त्यांच्या पसंतीची लादलेली नसावी. एक त्याच्या पसंतीचे व दुसरे परीक्षकांच्या मताचे असावे. गायक अरुण दाते हे पहाडी आवाजात पोवाडा गाणे अशक्य आहे, या अ‍ॅड. भट यांच्या मताशी मी सहमत आहे.
दिलीप भट, अमरावती

मानसिकता बदलायला हवी
‘आपण सारे उपरे’ हा अग्रलेख (४ जून) वाचला. अत्यंत समर्पक व न्याय देणारा लेख वाटला. आपण महाराष्ट्रात (त्यातही मुंबईत) बिहारी, बंगाली, दाक्षिणात्य लोकांना ‘येऊ नका’, असे म्हणतो. तसा विचार केला तर भारतीयांवर हल्ले करणाऱ्या ऑस्ट्रेलियन लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? दोन्ही ठिकाणी एकच तत्त्व आहे, नाही का?
खरे म्हणजे जागतिक उदारीकरणामुळे सर्वामध्ये एक प्रकारचा उदारपणा येऊन सर्वाना सामावून घेतले पाहिजे, नाही तर यापुढे ‘जो वाचला तो जगला’ असेच होणार आहे. प्रत्येक नागरिकाची प्रथम निष्ठा तो ज्या देशात राहातो त्या देशाशीच असायला पाहिजे. इंग्लंडमध्ये कायम राहाणाऱ्या भारतीयाने इंग्लंड क्रिकेटमध्येजिंकला तर टाळ्या वाजवायला पाहिजे, तसेच श्रीलंकेतील तामिळींची प्रथम निष्ठा श्रीलंकेबरोबरच पाहिजे. त्या त्या देशात राहून थोडेसे नम्रच राहायला पाहिजे, नाही तर आपला देश सोडूच नये. तसेच गोरे लोक भारतीयांना, काळ्या लोकांना त्यांच्या देशात जसे वागवतात, तसेच भारतात सवर्ण मागासवर्गीयांना, दलितांना पदोपदी वागवतात. तेव्हा मानसिकताच बदलली पाहिजे.
सुरेश भंडारी, शिवाजीनगर, पुणे