Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

मराठी चित्रपट निर्मात्यांचा १४ ऑगस्टपासून बेमुदत बंद
चित्रपटगृह मालकांनी सबुरीची भूमिका न घेतल्यास
कोल्हापूर, २४ जून / विशेष प्रतिनिधी
मराठी चित्रपट व्यवसायाला चांगले दिवस येऊनही चित्रपटगृहांच्या मालकांकडून होणारी पिळवणूक आणि कलाकारांच्या मानधनाचा फुगलेला आकडा यामुळे निर्माता देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून कोटय़ावधी रुपयांची उलाढाल होत असली, तरी सरतेशेवटी निर्मात्याच्या हातात छदामही राहत नाही अशी अवस्था निर्माण झाली असून याप्रश्नी जर थिएटर मालकांनी सबुरीची भूमिका घेऊन सहकार्य केले नाही,

सरकारी कर्मचारी ४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर
सातारा, २४ जून/प्रतिनिधी

सहावा वेतनआयोग केंद्र शासनाप्रमाणे शंभर टक्के लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २३ लाख राज्य सरकारी व राजपत्रित अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी येत्या चार ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस व समन्वय समितीचे निमंत्रक र. ग. कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संपादित जमिनी धरणग्रस्तांना देण्यास विरोध करणाऱ्यांवर फौजदारी करण्याचा इशारा
सांगली, २४ जून / प्रतिनिधी

वारणा प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित केलेल्या जमिनी धरणग्रस्तांना देण्यास विरोध करणाऱ्या ५३ शेतकऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी दिला. वाळवा तालुक्यातील वाळवा व बोरगाव येथील धरणग्रस्त विविध मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. या पाश्र्वभूमीवर हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील वारणा धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी श्री. वर्धने यांच्या समवेत बैठक झाली.

फरारी दीपक मानकरचा कोल्हापूर भागात शोध
कोल्हापूर, २४ जून / प्रतिनिधी

पुणे येथील लँड माफिया पैलवान दीपक मानकर याला कोल्हापूर परिसरातून पुण्याच्या विशेष पोलीस पथकाने पकडून नेल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दीपक मानकरला कोल्हापूर परिसरात पकडले असल्याबद्दलची आमच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. दीपक मानकर हा काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात कुस्तीगीर म्हणून राहायला होता. येथील एका प्रसिध्द तालमीत तो सराव करत होता. येथील बरेच मल्ल तसेच कुस्ती ठेकेदार, काही सराफ व्यावसायिक यांच्याशी मानकरचे घनिष्ट संबंध होते. कोल्हापुरातून तो निघून गेल्यानंतरही त्याचे या परिसरात येणे जाणे होते. कोल्हापुरात त्याचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळे त्याला येथे आश्रय मिळण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांचे या परिसरावर लक्ष आहे. त्यातूनच दीपक मानकरला पुणे पोलिसांनी कोल्हापूर परिसरातून अटक केल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अटक केल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असे सांगण्यात आले.

बी. आर्च द्वितीय वर्षांत मानसी जोशी प्रथम
कोल्हापूर, २४ जून / विशेष प्रतिनिधी

सिंहगड वास्तुकला महाविद्यालयाच्या मानसी जोशी हिने बी.आर्च (इंटेरियर डिझाईन) या द्वितीय वर्षांत २००८-०९ मध्ये पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. गेल्या वर्षी पुणे विद्यापीठात प्रथम वर्षांतही तिने प्रथम क्रमांक पटकाविला होता. यावर्षी तिने सातत्य राखले आहे. मानसी जोशी कोल्हापूरच्या नामवंत क्लायमॅक्स अ‍ॅड एजन्सीचे उदय जोशी यांची कन्या होय.
सिंहगड वास्तुकला महाविद्यालयाच्या अन्य विद्यार्थ्यांनीही देदीप्यमान यश संपादन केले आहे. मानसी जोशीसोबत ईशा तंगडपल्लीवार हिनेही संयुक्तपणे प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच अंतिम वर्षांमध्ये आदित्य बर्वे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय वर्षांच्या (बी.आर्च) अभ्यासक्रमात स्वाती नेगी हिने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना सिंहगड तंत्रज्ञान शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा.नवले व प्राचार्य तेलंग यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयसिंह मोहिते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
पंढरपूर, २४ जून / वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन विकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त गादेगाव येथील लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जैनुद्दीन मुलाणी यांनी विजयसिंह मोहिते यांचा नुकताच अकलूज येथे सत्कार केला व शिवसृष्टी अल्बम भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

रत्नाकर नांगरे यांचा सांगली येथे सत्कार
सांगली, २४ जून / प्रतिनिधी

संजय गांधी निराधार योजनेचे नूतन अध्यक्ष रत्नाकर नांगरे यांचा आढावा बैठकीत सत्कार करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्रीमती संगीता चव्हाण होत्या. संजय गांधी सांगली शहर समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील योजनेच्या दालनात पार पडली. या बैठकीच्या प्रारंभी समितीचे सदस्य मुन्ना नायकवडी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संजय गांधी, श्रावण बाळ या योजनेत दाखल झालेल्या अर्जाचा आढावा घेण्यात आला. कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्यांनी ती पूर्ण करावीत, असे आवाहन नूतन अध्यक्ष नांगरे यांनी केले.

आबासाहेब देशमुख यांचे आटपाडीमध्ये निधन
आटपाडी, २४ जून / वार्ताहर
शिवशाहीर आबासाहेब गणपतराव देशमुख यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. राज्य परिवहन महामंडळात वाहतूक निरीक्षक व इंटक युनियनचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणारे आबासाहेब देशमुख हे मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथील नाथ-मारुती ट्रस्टचे अध्यक्ष होते. मूळचे मायणी येथील पण नोकरीनिमित्त आटपाडी येथे स्थायिक झालेले आबासाहेब देशमुख शिवचरित्रावर व्याख्यान द्यायचे. सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्हय़ांत त्यांनी ९०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. मायणी व आटपाडी येथील सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. आज दुपारी राजेंद्रअण्णा देशमुख, भाऊसाहेब गुदगे, रावसाहेब पाटील, रामचंद्र पाटील, विलास-राव नांगरे-पाटील, यशवंत देशमुख, कचरे, एम. बी. देशमुख यांच्यासह आटपाडी आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सामाजिक न्यायदिनाचे उद्या विविध कार्याक्रम
सांगली, २४ जून / प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करण्यात येत असून जिल्हा व तालुकास्तरावर शुक्रवार, २६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी केले आहे. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, सर्व शासकीय- निमशासकीय कार्यालये व स्वयंसेवी संस्थांनी तसेच जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात २६ जून रोजी सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करावा. या दिवशी गावातून सकाळी प्रभात फेरी अथवा दिंडी काढण्यात यावी. यात ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, प्राथमिक व माध्यमिक शाळा, गावस्तरीय विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सांस्कृतिक मंडळे, भजनी व महिला मंडळे, महिला बचतगट, मागासवर्गीय योजना राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदींनी सहभाग घ्यावा.

‘एमपीएससी’मध्ये राजलक्ष्मी कदमचे यश
महाबळेश्वर, २४ जून/वार्ताहर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथील राजलक्ष्मी अप्पासाहेब कदम यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांची उपनिबंधक वर्ग-१ पदी निवड झाली आहे. यापूर्वी त्या विक्रीकर निरीक्षक २००५ परीक्षेतही राज्यात मुलींत दुसऱ्या आल्या होत्या. सध्या त्या सातारा येथे विक्रीकर निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.राजलक्ष्मी कदम यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (इंग्रजी) पदवी प्रथम श्रेणीत मिळविली असून, २००७ साली बी.जे. (पत्रकारिता) परीक्षेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकही मिळविला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजलक्ष्मीची आई उत्तम गृहिणी असून, वडील महाबळेश्वर तालुक्यातील शिरवली या अतिदुर्गम भागातील हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत.

रेल्वेची रिक्षाला धडक
इचलकरंजी, २४ जून / वार्ताहर
रेल्वेमार्गावर आलेल्या नव्या कोऱ्या अ‍ॅपे रिक्षाला रेल्वेची धडक बसल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी सुमारे दोन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. कोल्हापूर-पुणे ही पॅसेंजर रेल्वे दुपारी ३ वाजता लक्ष्मी औद्योगिक वसाहतीजवळील रेल्वे क्रॉसिंगपर्यंत आली. याच वेळी रेल्वे येत असल्याचा अंदाज न आल्याने अ‍ॅपे रिक्षाचालकाने रिक्षा क्रॉसिंगमधून रेल्वेमार्गावर नेली. समोरून रेल्वे आल्याचे पाहून चालकाने रिक्षा सोडून पळ काढला. रेल्वेच्या धडकेने नवीन रिक्षाचा चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर रेल्वे काही अंतरावर थांबली, पण रिक्षाचालक मात्र पळून गेला. सुमारे दोन तास रेल्वे वाहतूक खोळंबली होती.

वंचित पाटण तालुका विकासाच्या प्रवाहात - शंभूराज देसाई
सातारा, २४ जून/प्रतिनिधी
विकासापासून वंचित राहिलेल्या पाटण तालुक्यास प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण काम आपण गेल्या साडेचार वर्षांत केले असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले. विजेच्या प्रती युनिटला एक पैसा प्रमाणे तालुका विकासासाठी १५ कोटीचा निधी व प्रतिवर्षी पाच कोटी मिळणार असल्याचे सांगितले. स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. तालुक्याच्या विकासासाठी कोटय़ावधीचा निधी आणण्यात आपल्याला चांगले यश आले. भूकंपग्रस्तांचे दाखले पुन्हा सुरू करण्यात यश आल्यामुळे भूकंपबाधितांच्या पाल्यांना शालेय प्रवेशाच्यावेळी गुणामध्ये सवलत तसेच सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकऱ्या मिळवतांना त्याचा लाभ होणार आहे.

सांगलीत मतदार जागृती कार्यक्रम
सांगली, २४ जून / प्रतिनिधी
मदन पाटील युवा मंचच्या वतीने मतदार जागृती अभियानाचा शुभारंभ प्रमोद पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आला. सांगली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील छायाचित्र व ओळखपत्राबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मदन पाटील युवा मंच सांगली जिल्हा व सांगली शहर काँग्रेसच्या वतीने मतदारांमध्ये जागृती व्हावी, जास्तीत जास्त लोकांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी यादीत फोटो व ओळखपत्र असावे, याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या छायाचित्र अभियानात युवा मंचने सहभाग घेऊन लोकांना आपले नाव यादीत असल्याचे व छायाचित्र- ओळखपत्र असल्याची खात्री करून घेतली आहे.