Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

९०: १० कोटय़ाची सुनावणी लांबणीवर
फैसला सोमवारी

मुंबई, २४ जून/प्रतिनिधी

इयत्ता ११ वीच्या प्रवेशांमध्ये राज्य शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के जागा राखून ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालय सोमवारी दिवसभर सुनावणी घेऊन त्याच दिवशी अंतिम निकाल देणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशासाठी अर्ज स्वीकारले जातील. मात्र ३० जून मंगळवापर्यंत कोणाचाही प्रवेश कायम केला जाणार नाही, असे राज्य सरकारने न्यायालयास सांगितले आहे.

शिवसेनेचे ‘वीज बिल भरू नका’ आंदोलन
जाळपोळ, शिवसैनिकांना अटक

मुंबई, २४ जून/प्रतिनिधी
रिलायन्स एनर्जी, बेस्ट, टाटा आणि महावितरण या वीज कंपन्यांनी केलेल्या भरमसाठ वीज दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने ‘वीज बिल भरू नका’ आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. मुंबई परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या वीज बिल भरणा केंद्रांवर जाऊन शिवसैनिकांनी वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना रोखले. काही केंद्रांवर शिवसैनिकांनी दगडफेक केली तर कांदिवली येथे रिलायन्स एनर्जीच्या दोन ट्रकवर हल्ला चढवून त्यापैकी एका ट्रकला आग लावली. कुलाब्यापासून दहिसर, मुलुंडपर्यंत शिवसेनेच्या ‘वीज बिल भरू नका’, आंदोलनाचे लोण पसरले. रिलायन्सची उपनगरातील १५० केंद्रे आज बंद पडली. विभागप्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स, टाटा, बेस्ट व महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रांवर हल्ला करण्यात आला.

कोकणासाठी चार हजार कोटींचे ‘पॅकेज’
ठाणे-रायगड जिल्ह्याच्या क्षेत्रविकासाला १,३०० कोटी
सतीश कामत
ओरोस (सिंधुदुर्ग) २४ जून
गेल्या तीन वर्षांच्या काळात कोकणच्या विविधांगी विकासासाठी तीन हजार ९१५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या व्यतिरिक्त ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत १३१७ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे झाली. त्यामध्ये सिंचन, पर्यटन, नगरविकास, सागरी महामार्ग इत्यादी विविध विकास योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद करून येत्या तीन वर्षांच्या काळात या सर्व योजना कालबद्ध रितीने पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

बोलाचीच कढी!
संतोष प्रधान
मुंबई, २४ जून

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीकरिता पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याची ओरड होत असतानाच कोकणासाठी आज पाच हजार कोटींच्या पॅकेजची भर पडली आहे. विशेष पॅकेज जाहीर करून राजकीय लाभ उठविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असला तरी त्यातून अर्थसंकल्पीय तरतूद केलेल्या कामांवर परिणाम तर होतोच पण पॅकेजमध्ये तरतूद केलेली कामे मार्गी लागत नाहीत, असा दुहेरी तोटा होतो, असे नियोजन विभागाला आढळून आले आहे.

‘कडोंमपा’च्या उपायुक्तांना लाच घेताना अटक
कल्याण, २४ जून / प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली पालिकेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना बुधवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात अडिच लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. य्उपायुक्त पवार यांच्या पालिका कार्यालयातील ड्रावरमध्ये आणखी एक लाखाची रोख रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली आहे. अधिकाऱ्यांनी पवार यांचे कार्यालय सील केले आहे.

यंदा सरासरीच्या ९३ टक्केच पावसाची शक्यता
नवी दिल्ली, २४ जून/खास प्रतिनिधी

देशाची अर्थव्यवस्था निर्धारित करणाऱ्या नैऋत्य मान्सूनचा मूड यंदा बिघडला असल्याचे आता उघड झाले आहे. जून महिन्यात मान्सूनने दडी मारल्यानंतर यंदा देशभरात सरासरीच्या तुलनेत ९३ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता असल्याची कबुली केंद्र सरकारच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. मान्सूनच्या दिरंगाईचा सर्वात मोठा फटका जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या प्रमुख धान्य उत्पादक राज्यांना बसण्याची शक्यता आहे.

नफेखोर व्यापाऱ्यांमुळे गरीब अन्नालाही मोताद!
समर खडस
मुंबई, २४ जून

मान्सूनला झालेल्या विलंबाचे कारण पुढे करीत त्याचा फायदा उठविण्यासाठी बडय़ा व्यापाऱ्यांनी अन्नधान्यांच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये प्रमुख डाळी व कडधान्यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली असून तुरडाळीची किंमत आता लवकरच ७० रुपये ते ८० रुपये किलो होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये तुरडाळीच्या दरांमध्ये क्विंटलला ४०० ते ५०० रुपये वाढ झाली असून २२ जूनपर्यंत वाशीच्याघाऊक बाजारामध्ये क्विंटलला ५८०० रुपये भाव असणाऱ्या तूरडाळीचा दर आज ६३०० ते ६४०० रुपये प्रती क्विंटल होता.

सरबजितचा दयेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
आता भवितव्य झरदारींच्या हाती
इस्लामाबाद, २४ जून/पी.टी.आय.

फाशीची शिक्षा सुनाविण्यात आलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याची दयेची याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. त्यामुळे सरबजित सिंगच्या सुटकेची चिन्हे धुसर झाली असून त्याचे भवितव्य आता पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या हाती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या राजा फैयाझ अहमद यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने सरबजित सिंगची याचिका फेटाळून लावली. १९९० साली पाकिस्तानात घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटातील सहभागाच्या संशयावरून त्याला पकडण्यात आले होते. सरबजीतची बाजू मांडण्यासाठी त्याचे वकील पुन्हा उपस्थित राहू न शकल्यामुळे त्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. गेल्या काही सुनावण्यांदरम्यान सरबजितचे वकील न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. सरकारी वकील असल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याचे सरबजितचे वकील राणा अब्दुल हमीद यांनी निकालानंतर पत्रकारांना सांगितले.

युजीसी, एमसीआय संपुष्टात आणा
यशपाल समितीची केंद्राला शिफारस
नवी दिल्ली, २४ जून/खास प्रतिनिधी
देशाच्या उच्च शिक्षणाच्या धोरणात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, अ. भा. तंत्रशिक्षण परिषद यासारख्या बडय़ा शैक्षणिक संस्था संपुष्टात आणण्याच्या आणि अभिमत विद्यापीठांना नियंत्रणाखाली ठेवण्याच्या शिफारसी करणारा अंतिम अहवाल आज प्रा.यशपाल यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांना सादर केला. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जोम निर्माण करण्यासाठी यशपाल समितीने केलेल्या शिफारशी मोलाच्या आहेत. राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि यशपाल समितीने केलेल्या शिफारशी युपीए सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात अंमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही कपिल सिब्बल यांनी हा अहवाल स्वीकारताना दिली. सुधारणांसाठी आणखी प्रतीक्षा करता येणार नाही, असे सांगून हा अहवाल देशही स्वीकारेल, अशी आशा सिब्बल यांनी व्यक्त केली.

दहावी निकालातही‘बॅलन्सिंग अ‍ॅक्ट’?
पुणे, २४ जून/खास प्रतिनिधी

बारावीप्रमाणेच निकालामधील ‘फुगवटा’ कमी होऊन टक्केवारीची ‘बॅलन्सिंग अ‍ॅक्ट’ केली जाणार का, याचा रहस्यभेद करीत उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे शाळांबरोबरच संकेतस्थळ व एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकालाची माहिती प्राप्त करता येईल. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यात पुण्या-मुंबईसह, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या विभागीय मंडळांमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी एकूण १६ लाख तीन हजार १४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. बारावीचा गेल्या वर्षी तब्बल १५ टक्क्य़ांनी वाढलेला निकाल यंदा सहा टक्क्य़ांनी कमी झाला होता. दहावीच्या निकालातही गेल्या वर्षी १५ ते २० टक्क्य़ांची वाढ झाली होती. त्यामुळे यंदा ती कायम राहणार किंवा कसे, याबाबत उत्सुकता आहे. ९०१० कोटाधिष्ठित प्रवेशसूत्राच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंडळांच्या तुलनेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गुणाला प्रवेशाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. निकाल जाणून घेण्यासाठी मंडळातर्फे विविध साधनांद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठीची संकेतस्थळे पुढीलप्रमाणे - व्यक्तिगत निकालासाठी - www.mahresult.nic.in, www.rediff.com, www.zoneyuva.com संपूर्ण राज्य व विभागनिहाय निकालासाठी - www.msbshse.ac.in, www.mh-ssc.ac.in बीएसएनएल मोबाईलवरून निकाल जाणून घेण्यासाठी टऌ ररउ व त्यापुढे आसनक्रमांक असे टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर निकाल एसएमएस पाठवावा, अशी माहिती मंडळाच्या निवेदनात देण्यात आली आहे.

रमेश पोखरियाल उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
उत्तराखंडचे विद्यमान आरोग्यमंत्री रमेश पोखरियाल यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा दारूण पराभव झाला होता. त्याची जबाबदारी स्वीकारून भुवनचंद्र खंडुडी यांनी गेल्या शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रमेश पोखरियाल यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी