Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

चिमणीचा घरटा
‘चिमणीचा घरटा’ या नावाची बालकवींची कविता प्रसिद्ध आहे. पहिलीच्या पुस्तकात जशी अभ्यासासाठी ही कविता होती, तशी एम. ए.च्या वर्गातही ‘बालकवींची कविता’ म्हणून शिकण्याचा योग आला. एखादी चांगली कविता चांगल्या पद्धतीने शिकविल्याचा आणि तशीच कविता आपल्याही शिकविण्यातून आली, तर किती मनस्वी आनंद होतो. त्या मनस्वी आनंदाचा अनुभव मला स्वत:लाच आला आणि त्यातूनच मी ‘चिमणीचा घरटा’ याच शीर्षकाची ‘कथा’ही उत्स्फूर्तपणाने लिहिली. अशी अनेक परिमाणं असणारी ही कविता मुळातूनच वाचली पाहिजे. (सारी कविता देऊन जागा अडवित नाही.)

बिहार पोलीस दलाच्या २८१ जवानांचे प्रशिक्षण पूर्ण
चाकूर, २४ जून/वार्ताहर

सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात बिहार पोलीस दलाच्या २८१ जवनांनी नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. पोलीस उपमहानिरीक्षक सय्यद अब्दुल खादीर यांनी या पोलिसांना आज दीक्षान्त समारंभात शपथ दिली. या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी हे २८१ जवान २९ सप्टेंबर २००८ रोजी रुजू झाले. नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांना ज्युदो-कराटे, नेमबाजी, हत्यार चालविणे, अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक बाबी, जंगल प्रशिक्षण आदी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आज केंद्रामध्ये दीक्षान्त समारंभ आयोजित करण्यात आला होता.

नांदेडकरांची तहान भागणार! तीस द.ल.घ.मी. पाणी जायकवाडीतून सोडले
नांदेड, २४ जून/वार्ताहर
शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जायकवाडी धरणातून ३० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याच्या मागणीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात आले. हे पाणी नांदेडपर्यंत पोहोचण्यास १० ते १२ दिवस लागणार आहेत.

चौकशी समिती नेमलीच नाही!
उस्मानाबाद, २४ जून/वार्ताहर
अविवाहित तरुणावर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्याचे उघडकीस आल्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. पदाधिकाऱ्यांच्या सहभागासह समिती स्थापन करून सर्वच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांची चौकशी करण्याचे ठरले. तथापि, समितीच्या अध्यक्षांनाच समितीची रचना, कार्यपद्धती याविषयी अंधारात ठेवण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी एस. एम. साळुंके यांनी ही समिती स्थापन करण्याचे कष्टच घेतले नाहीत!

अकरावीच्या प्रवेशासाठी ९०:१०चा घोळ नि घोर
लातूर, २४ जून/वार्ताहर

अकरावीच्या प्रवेशासाठी ९० टक्के जागा राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या शालान्त विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय न्यायालयातून अद्यापि जाहीर व्हायचा आहे. त्याआधीच या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे पालकांना घोर लागला आहे. ‘सी. बी. एस. सी.’ व ‘आय. सी. एस. ई.’ परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मुंबई-पुण्यात अधिक आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभर एकच नियम लागू केला, तर या निर्णयामुळे शालेय शिक्षण मंडळाची शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अशी भावना पसरत आहे.

शेतकऱ्यांना वेध आद्र्रा नक्षत्राचे
लोहा, २४ जून/वार्ताहर

मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिल्यानंतर आद्र्रा नक्षत्रात चांगला पाऊस झाला तर पेरणी वेळेवर होईल, या चिंतेने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उन्हाचा कडाका वाढत असल्याने भाजीपाला, फळभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. शनिवारी काही भागात जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसात चितळी, धानोरा, सोनमांजरी, देऊळघाव परिसरात काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. वेळेवर पाऊस झाला नाही तर बियाणे खराब होण्याची शक्यता आहे.यंदा मृगात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता फोल ठरली.एकीकडे मृग कोरडे गेले तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे.

खुनाबद्दल तिघांना जन्मठेपेची शिक्षा
हिंगोली, २४ जून/वार्ताहर
एकाचा खून केल्याबद्दल आनंदा कतुरे, वामन कतुरे, मरिबा कतुरे यांना वसमतचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. घोडखांदे यांनी जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली. या खटल्याची माहिती देताना सरकारी वकील एस. एस. आलम यांनी सांगितले की, लोळेश्वर येथील गुलाब शंकर कदम यांनी २२ जून २००८ रोजी कुरुंदा पोलिसात फिर्याद दिली. आनंदा कतुरे, जगू ऊर्फ वामन कतुरे, मरिबा कतुरे यांनी मारहाण केल्याने शिवाजी कदम यांचा मृत्यू झाल्याचे त्यात म्हटले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. मुंढे व घटना प्रत्यक्ष पाहणारे विलास विठ्ठल कदम याची साक्ष महत्त्वाची ठरली.

धान्याच्या अपहारातील एकास अटक
जिंतूर, २४ जून/वार्ताहर

सरकारी गोदामातून सहा हजार क्विंटल धान्य गायब करून ५२ लाख रुपयांचा घोटाळा केल्याच्या गुन्ह्य़ातील फरारी आरोपींपैकी एकास पोलिसांनी आज अटक केली. मुख्य आरोपींसह आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव म. हकीम म. नजर आहे. गुन्ह्य़ातील काही आरोपी अजूनही फरारी आहेत.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड, २४ जून/वार्ताहर

लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या शेख इम्रान शेख चांद पाशा याला धारदार शस्त्राने भोसकून त्याच्याजवळील मोबाईल पळविणाऱ्या दोघांविरुद्ध वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाफना परिसरात काल रात्री ही घटना घडली. नेरली येथील शेख इम्रान याच्यावर काल रात्री मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पोटावर, हातावर, गळ्यावर मारहाण केली. त्याच्या जवळील मोबाईल हिसकावला व चोरटे पसार झाले. शेख इम्रानला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नांदेडमध्ये एक लाखाची घरफोडी
नांदेड, २४ जून/वार्ताहर
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात राहणाऱ्या श्रीकांत कुलकर्णी यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरांनी सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज पळविला.

‘विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’
लातूर, २४ जून/वार्ताहर

श्रेष्ठांनी विश्वास टाकून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला नगराध्यक्ष केले. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करीन, अशी ग्वाही नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे यांनी दिली. वॉर्ड क्र. ५० मधील नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामकिशन राठी होते. प्रमुख पाहुणे यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, शिखंडी हारवाडीकर, धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष खाजाबानू बुऱ्हाण म्हणाल्या की, माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीची प्रतिष्ठेच्या लातूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करून स्त्रीवर्गाचा गौरव केला आहे.

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी जालन्यात पदभार स्वीकारला
जालना, २४ जून/वार्ताहर

नवनिर्वाचित नगराध्यक्ष भारती भगत व उपनगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळत्या नगराध्यक्ष कल्पना लाहोटी आणि उपाध्यक्ष राजेश राऊत या वेळी उपस्थित होते. आमदार अर्जुन खोतकर आणि माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक भालेराव, करअधीक्षक धर्मा खिल्लारे, यू. डी. शेख, अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांचे स्वागत केले. आमदार खोतकर, अंबेकर त्याचप्रमाणे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची भाषणे या वेळी झाली. नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘उदयगिरी’ च्या संचालक मंडळाला कारणे दाखवा नोटीस
उदगीर, २४ जून/वार्ताहर

उदयगिरी औद्योगिक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला सहकार कायद्याच्या ७८(१) कलमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संचालक मंडळाची दरमहा किमान एक या प्रमाणे सभा घेणे आवश्यक असताना गेल्या वर्षभरात केवळ सहा सभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायद्याचे व उपविधीतील तरतुदींचे संस्थाचालक मंडळाने उल्लंघन केले आहे, असे नोटिशीत म्हटले आहे. संस्थेच्या सर्व कामकाजाबाबत व निर्णयाबाबत समितीने पदग्रहण केल्याचा तारखेपासून १५ दिवसांच्या आत स्टॅम्प पेपरवर बंधपत्र तयार संस्थेच्या दप्तरी ठेवणे व तसे केल्याचे कार्यालयास कळविणे व बंधपत्राचा खर्च संस्थेने करणे अनिवार्य असते. तथापि संचालकांनी वैयक्तिकरित्या २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंधपत्र देऊन कायद्याचा भंग केल्याचेही नोटिशीत म्हटले आहे.

दिशा संस्थेतर्फे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
कळंब, २४ जून/वार्ताहर
आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्याच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी शहरातील दिशा सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुरू केली. दर वर्षी एक हजार वारकऱ्यांना याचा लाभ मिळतो. कळंबमार्गे पंढरपूरकडे शंभर दिंडय़ा जातात. त्यातील वारकऱ्यांची सेवा घडावी व विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे जाईपर्यंत त्यांची प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी गेल्या तीन वर्षापासून दिशा सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. शरद दशरथ मोफत तपासणी व औषधोपचार करीत आहेत.दिशा सामाजिक संस्था व दशरथ क्लिनिकच्या या उपक्रमाचा प्रश्नरंभ ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर. यू. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी डॉ. सुनील थळकरी, डॉ. अमित पाटील उपस्थित होते.

मोटारीमध्ये घरगुती गॅस भरताना दोन जणांना अटक
भोकरदन, २४ जून/वार्ताहर
मोटारीमध्ये घरगुती वापराचा गॅस इंधन म्हणून भरताना जालना येथील भरारी पथकाने मोटारीसह गॅसच्या दोन टाक्या जप्त केल्या. दोघांना ताब्यात घेतले. ‘ज्योती इलेक्ट्रिकल्स’ या दुकानातून चार टाक्या जप्त करण्यात आल्या. दुकानमालक मात्र पसार झाला. दंगलीच्या गुन्ह्य़ातील आरोपींच्या शोधात भरारी पथक असताना पेरजापूर रस्त्यावर त्यांना मोटारीमध्ये (क्रमांक एमएच २०-२१२६) घरगुती गॅस भरताना आढळून आले.धोंडीबा गणपत सिरसाट व शिवाजी बाबुराव सिरसाट (दोघे वाकडी) यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ज्योती इलेक्ट्रिकल्स’ येथे पोलिसांनी छापा मारला. तेथून चार टाक्या जप्त करण्यात आल्या. दुकानमालक सुभाष नारायण पाटील फरारी आहे.

खत उपलब्ध नसल्यास तीव्र आंदोलन करणार
लातूर, २४ जून/वार्ताहर
येत्या दोन दिवसांत खता उपलब्ध न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरून उतरून आंदोलन करील, असा इशारा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. शेतकऱ्यांना खत अद्यापि मिळाले नसतानाही बाजारपेठेतून खत गायब झाले आहे. अनेक दुकानदार खतासोबत निकृष्ट प्रतीच्या बियाणांची खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या खताची साठेबाजी कोणी केली, असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या ४८६ रुपयांप्रमाणे खत वितरण त्वरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

चोरीचा तपास न लागल्याने पोलिसांबद्दल नाराजी
बिलोली, २४ जून/वार्ताहर
पोलीस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या घराशेजारी राहत असलेले पत्रकार अशोक दगडे यांच्या घरी चोरी होऊन अनेक तास उलटले तरी अद्यापि चोरांचा पत्ता लागला नसल्याने पोलीस अधिकारी व पोलिसांच्या निष्क्रि यतेबद्दल नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरात अनेक महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली. त्याच दिवशी रात्री गांधीनगर येथील दोन चोऱ्यांसह इंदिरानगरमध्ये पत्रकार दगडे यांच्या घरातून अंदाजे दीड लाखाचा ऐवज पळविला. पोलिसांना चोर पकडण्यात यश अद्याप आलेले नाही. यामुळे पोलिसांच्या तपासकामाबद्दल नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे.

चाकूरमध्ये १ जुलैपासून केंद्रीय शाळा सुरू होणार
चाकूर, २४ जून/वार्ताहर
सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात येणाऱ्या १ जुलैपासून पहिली ते पाचवीपर्यंत केंद्रीय शाळा सुरू होणार असल्याची माहिती उपमहानिरीक्षक सय्यद अब्दुल खादीर यांनी आज पत्रकारांना दिली.
केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी केंद्रीय शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यता आला होता. केंद्रीय समितीने पाहणी करून शाळेची मंजुरी दिली. पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याचे सांगून यात बी. एस. एफ.सह केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे कर्मचारी, अधिकारी यांच्या पालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. जागा शिल्लक राहिल्यास अन्य पाल्यांना प्रवेश देण्याचा विचार करता येईल, असे श्री. खादीर म्हणाले.

प्रसाद देण्याच्या बहाण्याने लुटले
औरंगाबाद, २४ जून /प्रतिनिधी
६० वर्षाच्या वृद्धेला देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना मंगळवारी दुपारी मोंढा नाका येथील शहर बसथांब्यावर घडली. शकुंतला मदनलाल अग्रवाल (वय ६०, रा. गादिया विहार) असे या वृद्धेचे नाव आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या थांब्यावर उभ्या होत्या. २५ वर्षे वयाचा एक युवक तेथे आला. देवाचा प्रसाद असल्यामुळे पर्समध्ये ठेवतो असे म्हणत त्याने प्रसाद पर्समध्ये ठेवला. प्रसाद ठेवताना त्याने आतील ११ हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि मोबाईल काढून घेतला.

अध्यक्षपदी तिवारी
जालना, २४ जून/वार्ताहर
लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटीची २००९-१० या वर्षासाठीची कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. यात क्लबच्या अध्यक्षपदी किशोर तिवारी, सचिवपदी बंकट खंडेलवाल, कोषाध्यक्षपदी बिहारी मरलेचा यांची निवड करण्यात आली.

जावेदकडून जप्त केलेले कपडे तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे मानसी देशपांडे खूनप्रकरण
औरंगाबाद, २४ जून /प्रतिनिधी
मानसी देशपांडे हिच्या खुनाच्या गुन्ह्य़ातील आरोपी जावेदखान याचे रक्ताने माखलेले कपडे, तसेच त्याने घरातून पळविलेले अनिकेतचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. हे कपडे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून जावेदखान याची नखेही डी. एन. ए. चाचणीसाठी पाठविण्यात आली आहेत. जावेद हाच मानसीचा मारेकरी आहे, हा पोलिसांचा दावा खोटा असल्याचे आजही काही जण म्हणतात. त्यामुळे सर्व बाबींची वैज्ञानिक तपासणी करण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. जावेदच्या नखांमध्ये काही गोष्टी नक्कीच आढळून येतील. जावेदच्या कपडय़ांवरील रक्त नेमके कोणाचे आहे हेही वैज्ञानिक चाचणीतून समोर येईल आणि पोलिसांवर आरोप करणाऱ्यांचे तोंड आपोआपच बंद होतील, असा दावा पोलिसांनी केला.

पिनाक संगीत अकादमीच्या वेबसाईटचा प्रश्नरंभ
औरंगाबाद, २४ जून/खास प्रतिनिधी

मराठवाडय़ाच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिनाक संगीत अकादमीच्या वेबसाईटचा प्रश्नरंभ रुद्राणी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
अथर्व टॉडलर्स नर्सरीच्या कार्यालयात झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जीवन बिमाचे विकास अधिकारी चंद्रशेखर शिराळकर व सरोज देशपांडे उपस्थित होते. गायिका आणि संगीतकार म्हणून परिचित असलेल्या भारती न्यायाधीश यांनी पिनाक संगीत अकादमीच्या माध्यमातून सादर केलेल्या उपक्रमांची माहिती दृकश्राव्य स्वरूपात www.pinakmusic.com या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अरुण जोशी, ज्योती शिराळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वेबसाईटच्या निर्मितीची भूमिका विजय न्यायाधीश यांनी विषद केली.

पाणीटंचाई आणि गैरसोयींमुळे बिलोलीतील नागरिक नाराज
बिलोली, २४ जून/वार्ताहर

शहरातील अनेक प्रभागांतील तीव्र पाणीटंचाई, तुंबलेल्या नाल्या, अस्वच्छता, अंधाराचे साम्राज्य यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरातील गांधीनगर, देशमुखनगर, तुकारामनगर, नाईकवाडी गल्ली आदी भागांत पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. दीड-दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. शहरातील बहुतांशी हातपंप बंद असल्याने नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. शहरात साफसफाई होत नसून नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचा प्रश्नदूर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारीवर्ग आपल्याच तोऱ्यात वागत आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने साध्यासाध्या कामासाठीही कामासाठी येणाऱ्या नागरिकांना नगरपालिकेत अनेक वेळा खेटे घालावे लागत आहेत.

सगरोळीचे शिक्षक जी. टी. पायरे यांचे निधन
बिलोली, २४ जून/वार्ताहर
सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचालित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे पहिले शिक्षक जी. टी. पायरे यांचे कर्करोगाने निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. पायरे हे सगरोळी ग्रामपंचायतीचे काही काळ सदस्य राहिले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.

फरारी आरोपीला चार महिन्यांनंतर अटक
जिंतूर, २४ जून/वार्ताहर

तालुक्यातील इटोली येथील एका विवाहितेवर बलात्कार करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा आरोपी गजानन कुटे चार महिन्यांनंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी सांगितले की, इटोली येथील एका विवाहित महिलेवर गजानन कुटे याने बलात्कार केला. त्यामुळे तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. परभणी जिल्हा रुग्णालयात तिने तालुका दंडाधिकाऱ्यांसमोर मृत्युपूर्व जबाब नोंदविला होता. तेव्हापासून कुटे फरारी होता. या कालावधीत कुटे याने जिल्हा सत्रन्यायालय व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. औंढा येथे तो येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक जीवन मुंडे यांनी सापळा रचून त्यास अटक केली.

वाजेगाव परिसरात दोन कोटींची विकासकामे पूर्ण
नांदेड, २४ जून/वार्ताहर

तालुक्यातील वाजेगाव परिसरात गेल्या दोन वर्षाच्या कारकीर्दीत सुमारे दोन कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्य वत्सला पुयड यांनी दिली. एक कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. धनेगाव येथे सिमेंट रस्त्यासाठी १८ लाख रुपये, पाणीपुरवठय़ासाठी दोन लाख रुपये, पिंपळगाव सिमेंट रस्ता आणि पाणीपुरवठय़ासाठी आठ लाख रुपये तसेच वडगाव, वाजेगाव, इंजेगाव, नागापूर, पुणेगाव, बोंढार, गाडेगाव, खडकूत, झांजेवाडी, देगाव, ब्राह्मणवाडा या गावांना सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य केंद्राचे बांधकाम आदी कामे करण्यात आली आहेत. काही कामे आमदार अनसूया खेडकर यांच्या निधीतून तर काही जिल्हा परिषदेच्या निधीतून पूर्ण केल्याचे सांगून श्रीमती पुयड म्हणाल्या की, वाजेगाव गटामधील अनेक गावांत एक कोटीची कामे प्रस्तावित आहेत.

खासदार आवळे यांचा उद्यापासून संपर्क दौरा
लातूर, २४ जून/वार्ताहर
लातूरचे खासदार व प्रदेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष खासदार जयवंतराव आवळे शुक्रवारपासून (दि.२६) मतदारसंघाच्या ऋणनिर्देश संपर्क दौरा करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांनी दिली. खासदार श्री. आवळे तालुका मुख्यालयाला जाऊन जनतेच्या गाठीभेटी घेतील. दि. २६ रोजी उदगीर येथे शहर व तालुका काँग्रेस समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील. चाकूर तालुका काँग्रेस समितीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. दि. २७ रोजी जळकोट येथे तालुका काँग्रेस व रेणापूर तालुका काँग्रेस समितीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. दि. २८ रोजी अहमदपूर तालुका काँग्रेस समितीने आयोजित समारंभात सहभागी होतील. औसा तालुक्यातील गावांना भेटी देतील.

खासदार दानवे यांचा सत्कार
सोयगाव, २४ जून/वार्ताहर

अजिंठय़ाच्या डोंगरात वाहून जाणारे पाणी अडवून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे आश्वासन खासदार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. श्री. दानवे यांचा तालुका भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. आमदार सांडू पाटील-लोखंडे अध्यक्षस्थानी होते.

माजी आमदार दगडूजी गलांडे यांचा हिंगोलीमध्ये सत्कार
हिंगोली, २४ जून/वार्ताहर

माजी आमदार दगडूजी गलांडे यांनी त्यांचे जीवन राष्ट्र आणि समाजसेवेला समर्पित केले असल्याने त्यांचा अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सर्वासाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन डॉ. सुगन बरंठ यांनी केले. गायत्री मंगल कार्यालयात श्री. गलांडे यांच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात डॉ. बरंठ बोलत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल, आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. व. द. भाले, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते. आमदार गोरेगावकर व गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन दगडूजी गलांडे यांच्यासह त्यांच्या पत्नी शकुंतला गलांडे यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रश्नचार्य डॉ. जयनारायण मंत्री यांनी केले.

नगराध्यक्ष सुलभा कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला
अंबड, २४ जून/वार्ताहर

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुलभा कुलकर्णी व उपनगराध्यक्ष खुर्शीद जिलानी यांनी आज विजयी मिरवणुकीने फटाक्यांच्या आतषबाजीत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली. नगरपालिकेत काँग्रेसचे फक्त चारच सदस्य असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असताना बाबुराव कुलकर्णी यांनी पत्नीकडे अध्यक्षपद खेचून आणले आणि खुर्शीद जिलानी यांना उपाध्यक्षपद दिले. सत्तांतराचे शिल्पकार बाबुराव कुलकर्णी यांच्या घरापासून समर्थकांसह मिरवणुकीने जाऊन दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आज पदग्रहण केले. मुख्याधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी माजी आमदार विलासराव खरात, बाबुराव कुलकर्णी, गटाचे युवा नेते केदार कुलकर्णी, ज्येष्ठ नगरसेवक दुर्गादास पाटील दर्प आदींसह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.