Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कोकणासाठी चार हजार कोटींचे ‘पॅकेज’
ठाणे-रायगड जिल्ह्याच्या क्षेत्रविकासाला १,३०० कोटी
सतीश कामत
ओरोस (सिंधुदुर्ग) २४ जून

 

गेल्या तीन वर्षांच्या काळात कोकणच्या विविधांगी विकासासाठी तीन हजार ९१५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या व्यतिरिक्त ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत १३१७ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे झाली. त्यामध्ये सिंचन, पर्यटन, नगरविकास, सागरी महामार्ग इत्यादी विविध विकास योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद करून येत्या तीन वर्षांंच्या काळात या सर्व योजना कालबद्ध रितीने पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मात्र यापैकी कोणत्या योजनांसाठी यापूर्वीचे अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे आणि कोणत्या नियोजनाबाह्य खर्चासाठी होणार आहेत. याबाबतचा तपशील ते देऊ शकले नाहीत. तसेच यापैकी बहुसंख्य प्रकल्प कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी मिळून आहेत. त्यामुळे ठाणे-रायगड वगळता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाटय़ाला नेमका किती निधी येणार, हेही लगेच सांगणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कोकणातील या चार जिल्ह्यांमधील रखडलेल्या ३९ पाटबंधारे प्रकल्पांसाठी येत्या तीन वर्षांत सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील भातसा या मोठय़ा प्रकल्पाचा कालव्याच्या व मुमरी धरणाच्या कामांना गती देण्यासाठी सुमारे १७० कोटी रुपयांची तरतूद रायगड जिल्ह्यातील पाच लघुपाटबंधारे प्रकल्पांसाठी सुमारे ७६ कोटी, रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी, अर्जुना व जामदा हे तीन मध्यम प्रकल्प आणि १३ लघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी ४८४ कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळंबा हा मोठा प्रकल्प, पाच मध्यम व सात लघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी येत्या तीन वर्षांंच्या काळात ८२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त पाणलोट क्षेत्रविकास मिशन अंतर्गत १५० कोटी रुपये खर्चून प्रत्येक जिल्ह्यात दोन मेगा पाणलोट क्षेत्रविकास प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी तिलारी प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रीमंडळाने तत्वत: मंजुरी दिली आहे. कोकणातील १६ शहरांमध्ये पायाभूत सुविधा आणि सुशोभीकरणाची योजना नगरउत्थान अभियानाअंतर्गत राबवण्यात येणार असून, त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्माण करून १९० कोटी रुपयांचे पर्यटन प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. या व्यतिरिक्त, सागरी महामार्गासाठी ६७ कोटी ७६ लाख रुपये, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ६० कोटी, कोकणातील वाडय़ा मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी ५० कोटी, साकव दुरुस्ती व बांधकामासाठी ३९ कोटी ५० लाख, फळप्रक्रिया ५२ कोटी ६८ लाख, अन्नप्रक्रिया ३९ कोटी ५० लाख, काजू, आंबे, गणेशमूर्ती, हर्बल इत्यादीच्या सामूहिक सुविधा केंद्रासाठी ५० कोटी, क्रीडा विकासासाठी ३९ कोटी ४८ लाख रुपये इत्यादी तरतुदींचा समावेश आहे. या सर्व योजनांसाठी २००९ ते २०१२ या तीन आर्थिक वर्षांमध्ये मिळून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.