Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

यंदा सरासरीच्या ९३ टक्केच पावसाची शक्यता
नवी दिल्ली, २४ जून/खास प्रतिनिधी

 

देशाची अर्थव्यवस्था निर्धारित करणाऱ्या नैऋत्य मान्सूनचा मूड यंदा बिघडला असल्याचे आता उघड झाले आहे. जून महिन्यात मान्सूनने दडी मारल्यानंतर यंदा देशभरात सरासरीच्या तुलनेत ९३ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता असल्याची कबुली केंद्र सरकारच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. मान्सूनच्या दिरंगाईचा सर्वात
मोठा फटका जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या प्रमुख धान्य उत्पादक राज्यांना बसण्याची शक्यता आहे. टंचाई आणि दुष्काळासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ‘एल निनो’ची स्थिती उद्भवण्याची शक्यता ६० टक्के असल्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सूनच्या मोसमात भारतात सरासरी ८९ सेंमी पाऊस पडतो. पण यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान या दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने १७ एप्रिल रोजीच्या पहिल्या टप्प्यात वर्तविला होता. पण हा अंदाज चुकणार असल्याची कल्पना हवामान खात्याला याच महिन्यात आली. जूनमध्ये एकूण पर्जन्यवृष्टीच्या सामान्यपणे १९ टक्के पाऊस पडतो. पण यंदा जूनमध्ये तीन आठवडे लोटून गेले तरी सरासरीच्या निम्मीही पर्जन्यवृष्टी झाली नाही. आता संपूर्ण मान्सूनच्या मोसमात ९६ टक्क्यांऐवजी ९३ टक्के पाऊस पडेल, असे भाकित केंद्र सरकार आणि हवामान खात्याच्या वतीने आज चव्हाण यांनी वर्तविले. हा अंदाज चार टक्क्यांनी कमी वा जास्त होण्याची शक्यता आहे. भारतात ६० टक्के शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामान खात्याच्या या अंदाजामुळे उद्भवणाऱ्या प्रतिकूल स्थितीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारच्या यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. मान्सून दगा देण्याची चिन्हे असल्यामुळे पाणीटंचाईअभावी धान्योत्पादन, पेयजल आणि वीजनिर्मितीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य आणि उत्तर भारत सध्या भीषण उन्हाळ्यात होरपळून निघत असून या भागात दुष्काळी स्थिती उद्भवल्यास दारीद्रय़रेषेखालील कुटुंबांना ३ रुपये किलो दराने दरमहा २५ किलो गहू वा तांदूळ देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करणे केंद्रातील काँग्रेस सरकारसाठी अवघड ठरणार आहे.