Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नफेखोर व्यापाऱ्यांमुळे गरीब अन्नालाही मोताद!
समर खडस
मुंबई, २४ जून

 

मान्सूनला झालेल्या विलंबाचे कारण पुढे करीत त्याचा फायदा उठविण्यासाठी बडय़ा व्यापाऱ्यांनी अन्नधान्यांच्या किमती
वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये प्रमुख डाळी व कडधान्यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली असून तुरडाळीची किंमत आता लवकरच ७० रुपये ते ८० रुपये किलो होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये तुरडाळीच्या दरांमध्ये क्विंटलला ४०० ते ५०० रुपये वाढ झाली असून २२ जूनपर्यंत वाशीच्याघाऊक बाजारामध्ये क्विंटलला ५८०० रुपये भाव असणाऱ्या तूरडाळीचा दर आज ६३०० ते ६४०० रुपये प्रती क्विंटल होता. ही दरवाढ हा आठवडा संपेपर्यंत ७००० रु. प्रती क्विंटलपर्यंत पोहचू शकते व दमदार पावसाचे आगमन अधिकलांबल्यास ही दरवाढ ८००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचू शकते, असे अजय शहा या घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले.
तुरीप्रमाणेच उडीद डाळीची दरवाढही १०० ते १५० रु. होऊन तिचा क्विंटलमागचा दर ४२०० रुपयांवरून ४४५० रुपये झाला आहे. मुगडाळही क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढून ५६०० रुपयांवरून ५८०० रुपये झाली आहे. सर्वाधिक दरवाढ मसूर डाळीची झाली असून आजच्या एका दिवसामध्ये मसूरडाळ ५००० रुपयांवरून ५३०० रुपये प्रती क्विंटल झाली . तांदळाचे दर गेल्या दोन दिवसांत प्रती क्विंटल केवळ २५ रुपयांनी वाढले असले तरी हे दर याआधीच अस्मानाला भिडले आहेत. सर्वात कमी प्रतीच्या तांदळाचे भाव आता २०२५ ते २१०० रु. प्रती क्विंटल झाले असून सर्वात कमी प्रतीच्या गव्हाचे भाव १३२५ रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. भारतीय कुटुंबाच्या व्याख्येनुसार एका कुटुंबात चार सदस्य जमेस धरले जातात. दर दिवशी दर माणशी ४५० ग्रॅम अन्न लागते, असा विचार केल्यास आणि एका कुटुंबाला केवळ दररोजचा डाळभात खायचा झाल्यास महिन्याला ५० किलो तांदूळ व ५० किलो तुरीची डाळ लागते. त्याचाच खर्च ४००० ते ४१५० रुपयांपर्यंत जातो. मुंबईतील असंघटित क्षेत्रांमध्ये सध्याची वेतनरचना पाहिल्यास कमाल २००० ते ४५०० रुपये वेतन असणाऱ्यांची संख्या तब्बल ६० ते ७० टक्के आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या या भाववाढीत सरकारने तात्काळ हस्तक्षेप न केल्यास सध्या वीज दरवाढीच्या फटक्याने कातावलेले सामान्य आता भुकेल्या पोटी आणखी उग्र आंदोलन करण्याची शक्यता समाजशास्त्राच्या अभ्यासकांना वाटते आहे.