Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिवसेनेचे ‘वीज बिल भरू नका’ आंदोलन
जाळपोळ, शिवसैनिकांना अटक
मुंबई, २४ जून/प्रतिनिधी

 

रिलायन्स एनर्जी, बेस्ट, टाटा आणि महावितरण या वीज कंपन्यांनी केलेल्या भरमसाठ वीज दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने ‘वीज बिल भरू नका’ आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. मुंबई परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या वीज बिल भरणा केंद्रांवर जाऊन शिवसैनिकांनी वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना रोखले. काही केंद्रांवर शिवसैनिकांनी दगडफेक केली तर कांदिवली येथे रिलायन्स एनर्जीच्या दोन ट्रकवर हल्ला चढवून त्यापैकी एका ट्रकला आग लावली.
कुलाब्यापासून दहिसर, मुलुंडपर्यंत शिवसेनेच्या ‘वीज बिल भरू नका’, आंदोलनाचे लोण पसरले. रिलायन्सची उपनगरातील १५० केंद्रे आज बंद पडली. विभागप्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स, टाटा, बेस्ट व महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रांवर हल्ला करण्यात आला. अनेक केंद्रांवरून वीज ग्राहकांना शिवसैनिकांनी हुसकावून लावले तर काही केंद्रांकडे ग्राहक फिरकलेच नाहीत. काही ठिकाणी शिवसैनिकांनी वीज बिल केंद्रांना कुलूप ठोकले. यामुळे काही ठिकाणी कर्मचारी तसेच पोलीस यांच्याबरोबर शिवसैनिकांची बाचाबाची व धक्काबुक्की झाली. कुलाबा, ठाकूरद्वार, गिरगाव, ताडदेव, फोर्ट, मांडवी या ठिकाणी शिवसैनिकांनी वीज बिल केंद्रांना टाळे ठोकले. बेस्टच्या ५४ बिल केंद्रांपैकी निम्मी केंद्रे बंद झाली. पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली. शिवसेना उपनेते विलास अवचट, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, राम भंकाळ, महिला विभाग संघटक जया गोयथळे यांनी दक्षिण मुंबईतील आंदोलनाचे नेतृत्व केले.
दक्षिण मध्य मुंबईतील लोअर परळ येथे निदर्शनांना न जुमानता वीज बिल भरणा सुरू ठेवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर शिवसैनिकांनी तोडफोड करून हल्ला केला. नगरसेवक आशिष चेंबूरकर, छोटू देसाई, शाखाप्रमुख दत्ता नरवणकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मुलुंम्ड येथे महावितरणच्या चुकीची बिले देणे, वीज गळती व चोरी याविरोधात शिवसैनिकांनी निदर्शने केली. चेंबूर टिळक नगर येथे शिवसेनेच्या आंदोलनामुळे वीज ग्राहकांबरोबरच कर्मचाऱ्यांनाही बाहेर राहावे लागले. विक्रोळी येथे शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्की झाली. पश्चिम उपनगरातील गोरेगाव, कांदिवली, बोरीवली येथे रिलायन्सच्या वीज ग्राहकांनी आणि शिवसैनिकांनी उग्र निदर्शने केली. कांदिवली येथे रिलायन्सच्या वीज बिल केंद्रासमोर निदर्शने सुरू असताना रिलायन्सचे टेम्पो व लॉरी तेथे दाखल झाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी लॉरी पेटवून दिली व टेम्पोची तोडफोड केली. मालाड, गोरेगाव येथे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार सुभाष देसाई व आमदार गजानन कीर्तिकर यांना अटक करण्यात आली. विभागप्रमुख विनोद घोसाळकर हेही आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. वायव्य मुंबईतील आंदोलनाचे नेतृत्व विभागप्रमुख अनिल परब यांनी केले. निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांना पांगविण्याकरिता अंधेरी येथे पोलिसांनी लाठीमार केला.