Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘कडोंमपा’च्या उपायुक्तांना लाच घेताना अटक
कल्याण, २४ जून / प्रतिनिधी

 

कल्याण डोंबिवली पालिकेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना बुधवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात अडिच लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. य्उपायुक्त पवार यांच्या पालिका कार्यालयातील ड्रावरमध्ये आणखी एक लाखाची रोख रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली आहे. अधिकाऱ्यांनी पवार यांचे कार्यालय सील केले आहे. तातडीने अधिकाऱ्यांनी पवार यांच्या घरावरही छापा टाकून अन्य काही माहिती मिळते की काय म्हणून चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विलास जगदाळे यांनी दिली.
जगदाळे यांनी सांगितले, १८ मे रोजी कल्याण डोंबिवली पालिकेची ग्लोसाईन बोर्ड जाहिरात फलकांचा कर वसुलीचा ठेका वसुलीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द झाली होती. हा ठेका विजय इंगळे यांना मिळाला होता. तो इंगळे यांना २ जून रोजी देण्यात आला होता. पण या कामाचे कार्यादेश देण्यासाठी सुरेश पवार यांनी इंगळे यांच्याकडे तीन वर्षांच्या या ठेक्यासाठी प्रत्येक वर्षांचे एक लाख रूपये या दराने बेकायदेशीरपणे तीन लाख रूपये देण्याची मागणी चालू केली होती. त्याशिवाय कार्यादेश देण्यास त्यांनी टाळाटाळ चालविली होती. पवारांच्या या कृतीमुळे इंगळे त्रस्त झाले होते. नऊ जूनला इंगळे यांनी अडीच लाख रूपये देण्याचे कबूल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला उपायुक्त पवार यांच्या कृत्याची माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची शहानिशा केली. बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासून अधिकाऱ्यांनी पालिकेत सापळा लावला होता. संध्याकाळी पाच ते साडे पाच वाजता विजय इंगळे यांनी उपायुक्त पवार यांना अडिच लाख रूपये देतानाच, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पवार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.