Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

प्रादेशिक

मुंबईकरांवर झेपावू पाहणारा काळ दरवाजाशीच रोखणार!
संदीप प्रधान
मुंबई, २४ जून

शतकातील सर्वात मोठी म्हणजे साडेपाच मीटरची भरती जुलै महिन्यात असून त्यावेळी २६ जुलै २००५ रोजी निर्माण झाली तशी भीषण परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पात जुहू येथील इर्ला नाला येथे समुद्राच्या मुखाशी उभारण्यात आलेल्या दरवाज्याची चाचणी उद्या दुपारी दोन वाजून २६ मिनिटांनी घेतली जाणार आहे. मोठी भरती व मुसळधार पाऊस यामुळे समुद्राचे पाणी जेव्हा शहरात घुसू पाहील तेव्हा एका सेकंदाला पाच टँकर या क्षमतेने या दरवाज्यापाशी बसविलेले पंप शहरातील पाणी समुद्रात दूरवर फेकणार आहेत.

गॅस गळतीने दगावलेल्या तिघींच्या वारसांना १० लाख भरपाई
मुंबई, २४ जून/प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी कल्याण येथील एका घरात गॅस सिलिंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत दागवलेल्या तीन महिलांच्या वारसांना गॅस कंपनी, विमा कंपन्या आणि गॅस वितरक यांनी १० लाख रुपये भरपाई संयुक्तरीत्या व वैयक्तिकरीत्या द्यावी, असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. वितरकाने घेतलेल्या विमा पॉलिसीत अशा दुर्घटनेत दगावणाऱ्या गॅस ग्राहकास १० लाख रुपयांची तरतूद असूनही गॅस कंपनी, विमा कंपनी व वितरक यांनी मृतांच्या वारसांना फक्त एक लाख रुपये देऊन त्यांची बोळवण केली.

शासकीय अनास्थेच्या पाइपमध्ये अडकले दोन डझन पाणी प्रकल्प!
सोपान बोंगाणे
ठाणे, २४ जून

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठय़ाच्या विविध स्रोतांतून शेजारील महाकाय मुंबई शहराच्या पाण्याची गरज भागविली जात आहे. त्यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येत असताना ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा, जलसिंचन प्रकल्प आणि नळ पाणीपुरवठय़ाच्या महत्त्वपूर्ण योजना मात्र पैसा व राजकीय इच्छाशक्तीअभावी गेल्या २५ वर्षांंपासून रखडल्या आहेत. शासन या प्रकल्पांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, ठाणे जिल्ह्याला सापत्नभावाची वागणूक देत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मराठी बीएमएम अभ्यासक्रमाला आज मंजुरी मिळण्याची शक्यता
सुप्रिया सुळेंनी घेतला पुढाकार

मुंबई, २४ जून / प्रतिनिधी

गेल्या महिनाभरापासून मंत्रालयात लाल फितीमध्ये अडकून पडलेल्या मराठी भाषेतील बीएमएम अभ्यासक्रमाला मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याबाबतची घोषणा उद्या, गुरूवारी होणार असल्याचे समजते. मराठी भाषेतील बीएमएमला मंजुरी देण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना विनंती केली होती. त्यानुसार ही घोषणा होणार आहे.

घोषणा अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज सादरीकरण २६ जूनपासून
अकरावीसाठी यंदा २ लाख ४८ हजार ४११ जागा
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन अर्जस्वीकृतीला येत्या २६ जूनपासून प्रारंभ करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केला आहे. ९०:१० कोटय़ाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्देशांचे पालन करून प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. अर्जस्वीकृतीसाठी न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला असल्याने ऑनलाइन अर्जस्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अर्जस्वीकृतीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याचे शिक्षण उपसंचालक वि. ख. वानखेडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मान्सून पावसाविनाच मुंबईत दाखल!
कोकणाचाही बराचसा भाग व्यापला
मुंबई, २४ जून / खास प्रतिनिधी
नैर्ऋत्य मान्सून आज मुंबईसह कोकणाच्या बहुतांश भागात दाखल झाला, पण मोजके अपवाद वगळता त्याने कोणत्याच भागात पावसाने विशेष हजेरी लावली नाही. कोकणाप्रमाणेच तो गुजरातची किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रात नाशिकपर्यंत पुढे सरकला आहे. येत्या एक-दोन दिवसांत मात्र कोकणाच्या सर्व भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे. मान्सून या वर्षी संथगतीनेच पुढे सरकत आहे.

मनसे महिला सेनेच्या अध्यक्षपदी शालिनी ठाकरे?
मुंबई, २४ जून/ खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला आघाडी तसेच कामगार सेनेची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आता महिला आघाडीच्या अध्यक्षपदी शालिनी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. कामगार संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ठाणे येथील मनसेचे लोकसभेचे उमेदवार राजन राजे यांचा विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामगार व महिला संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून संघटना बांधणीला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

वृद्धेचे न्यायासाठी मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना साकडे
मुंबई, २४ जून / खास प्रतिनिधी

मंत्र्यांचे खाजगी सचिव, उपजिल्हाधिकारी व तत्सम शासकीय अधिकाऱ्यांच्या वांद्रे येथील ‘मित्र प्रेम गृहनिर्माण सोसायटी’ला मिळालेल्या भूखंडाच्या आड येणाऱ्या एका वृद्धेच्या पिठाची गिरणी नियमबाह्य पद्धतीने अधिकाराचा गैरवापर करून जमीनदोस्त केल्यानंतर या वृद्धेने आता न्यायासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्याकडे धाव घेतली आहे.
चांगुणाबाई निकम या ७५ वर्षांंची वृद्धा वांद्रे येथे १९७१ पासून पिठाची गिरणी चालवत होत्या.

मुळात समानताच नाही तर समानतेची वागणूक कशी देणार?
९०:१० कोटय़ाचे सरकारकडून जोरदार समर्थन
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी
दोन समान व्यक्तींना भेदभाव न करता समान वागणूक द्यावी, असे राज्यघटनेचे व कायद्याचे बंधन आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व ‘आयसीएसई’ आणि ‘सीबीएसई’ यासारख्या केंद्रीय शिक्षण मंडळांची शालांत परीक्षा उतीर्ण होणारे विद्यार्थी यांत मुळातच समानता नाही व हे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी एकाच वर्गातही मोडत नाहीत.

चोराचा पाठलाग करताना पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी

चोरांचा पाठलाग करताना हृदयविकाराचा झटका येऊन ना. म. जोशी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस हवालदार ज्योतीराम साधू येडेकर (५२) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत ताजणे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, मंगळवारी येडेकर यांना रात्रपाळी होती. ठरल्यानुसार ते सेनापती बापट मार्गावर आपल्या अन्य सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित दिसले. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या संशयितांना हटकले. मात्र दोघेही पळू लागले. त्यामुळे येडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत एकाला अटक केली, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर येडेकर रेल्वे वर्क शॉप येथे गस्तीसाठी गेले असता पळून गेलेला संशयित त्यांना पुन्हा दिसला. त्यामुळे येडेकर त्याला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावू लागले. मात्र धावतानाच ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना के.ई. एम. रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दोन वर्षांपूर्वीच येडेकर ना. म. जोशी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस हवालदार म्हणून रुजू झाले होते.

कुलगुरू शोध समितीसाठी सदस्य निवडण्याचे सर्वाधिकार विद्यमान कुलगुरूंकडे
निर्णय नियमबाह्य़ असल्याची टीका
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी

कुलगुरू शोध समितीचा सदस्य निवडण्यासाठी मुंबई विद्यापीठात आज व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदेची संयुक्त बैठक घेण्यात आली. परंतु, सदस्य निवडण्याचे सर्वाधिकार विद्यमान कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्याकडे देण्याचा अजब निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या शोध समितीसाठी काही व्यक्तींची नावे सूचविण्याचा प्रयत्न बैठकीमधील सदस्यांनी केला. एवढेच नव्हे तर, सदस्य निवडण्याचे सर्वाधिकार विद्यमान कुलगुरूंकडे देण्याचा हा प्रकार नियमबाह्य़ असल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला. परंतु, आक्षेप घेणाऱ्या सदस्यांचे काहीही ऐकून घेण्यात आले नसल्याचा आरोप ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स’ने (बुक्टू) केला आहे. ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या’तील सुधारित तरतुदीनुसार शोध समितीमधील तीन सदस्यांपैकी एक सदस्य निवडण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेकडे देण्यात आले आहेत. परंतु, व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदेच्या बहुसंख्य सदस्यांनी विद्यापीठ कायद्याच्या विसंगत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. सदस्य निवडण्याचे अधिकार विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेचे आहेत, त्यामुळे सदनाने सुज्ञपणाने निर्णय घ्यावा, असे समजाविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, काही सदस्यांनी शिवदास यांच्यावरच राग व्यक्त केला.

भुजबळांचे स्वीय सहाय्यक संजय पराडकर यांचे निधन
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संजय पराडकर (४०) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. यामुळे कोकणातील मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्यासाठी निघालेल्या भुजबळांनी आपला दौरा रद्द केला. पराडकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भुजबळांना शोक अनावर झाला. २० वर्षे पराडकर भुजबळांचे निकटवर्तीय होते. पराडकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा तसेच विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या निवासस्थानावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी पराडकर मदतीला धावून गेले होते.

गोरेगावमध्ये २६ आणि २७ जूनला मोफत ऑनलाईन प्रवेश मार्गदर्शन केंद्र
मुंबई, २४ जून/प्रतिनिधी

इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेल्या गोरेगाव विभागातील विद्यार्थ्यांच्या ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन केंद्र २६ आणि २७ जूनला सुरू करण्यात येणार आहे. लोकभारती पक्षाचे सरचिटणीस अरविंद सावला यांच्या पुढाकाराने ही सुवधिा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या करिता एकूण १० संगणक असलेले मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाकरिता तज्ज्ञांसह सुरू करण्यात येणार आहे.२६ आणि २७ जूनला सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत लोकभारती जनसंपर्क कार्यालय, जवाहर नगर, गोरेगाव (प.) येथे विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास त्यांना ही सुविधा मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी ९८३३६९३९५८ या मोबाईल क्रमांकावर संर्पक साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरात दोन हजार कोटींच्या बोगस नोटा वितरीत होण्यामागे मदानीच!
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी

देशभरात सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या एक लाख ९८ हजार बोगस नोटा वितरीत झाल्याची भीती व्यक्त करण्यामागे लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी मोहम्मद उमेर मदानी याला झालेली अटक कारणीभूत असल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकातील सूत्रांनी दिली. मदानीकडे सापडलेल्या बोगस नोटांच्या पाश्र्वभूमीवरच रिझव्‍‌र्ह बँकेने २ एक्यू आणि ८ एक्यू या सिरीजमधील हजारच्या नोटा बोगस असल्याचे पत्रक सर्व बँकांसाठी जारी केल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यासाठी प्राथमिक माहिती गोळा करून त्यानुसार विविध महत्त्वाच्या स्थळांची चित्रफित तयार केल्याचा आरोप असलेल्या फईम अन्सारी व सबाउद्दीन या दोघांना आर्थिक मदत मदानीने केली होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. याच मदानीने पश्चिम बंगाल तसेच झारखंडमधील सहा तरुणांना हाताशी धरून बोगस नोटा वितरीत केल्या होत्या. यापैकी सहा तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने अटक करून हजार रुपयांच्या ३५४ नोटा हस्तगत केल्या होत्या. त्यानंतर मदानीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास २६/११ च्या हल्ल्यानंतर नेमण्यात आलेली राष्ट्रीय तपास यंत्रणा करीत होती. त्यामुळे दहशतवादविरोधी पथकाकडे असलेला तपास याच यंत्रणेकडे सोपविण्यात आला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या पोलिसाला अटक
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी

नौदलाच्या डॉकयार्डमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आणि ती स्वीकारणाऱ्या मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागातील पोलीस हवालदार अनिल देसाई याला आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. देसाई याने प्रकरणातील फिर्यादीला, त्याच्या नौदलाच्या डॉकयार्ड कार्यालयात ओळखी असल्याचे सांगून तेथे नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने फिर्यादीला सांगितले होते. पैसे देऊनही देसाईने नोकरीला न लावल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने देसाईविरुद्ध तक्रार दाखल केली होती.