Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

स्वयंवर राखीचे..
प्रतिनिधी

मुंबईतील मराठी कुटुंबात जन्मलेला आणि पेशाने मेकॅनिकल इंजिनीअर असलेला प्रणव दामले

 

काही दिवसांसाठी आणि त्याच्या प्रयत्नांत यशस्वी झाला तर कायमचा सेलिब्रिटी होणार आहे. त्याने कोणताही चित्रपट किंवा मालिका स्वीकारलेली नाही आणि कोणताही विक्रम केलेला नाही. पण राखी सावंतच्या स्वयंवरासाठी निवड झालेल्या उपवरांपैकी तो एक उपवर आहे. केवळ तोच नाही तर राखीचे मन जिंकण्यासाठी नागपूरचा अश्विन चौधरी, कॅनडाचा इलेश पारुजानवाला, जम्मू आणि काश्मीरच्या गुन्हे अन्वेषण शाखेत काम करणारा अथर परवेझ, दिल्लीचा मनमोहन तिवारी इत्यादी १६ उपवरांचा प्रयत्न सुरू आहे. ‘राखी का स्वयंवर हा केवळ फार्स आहे की ती खरोखरच लग्न करणार?’ अशी शंका उपस्थित केली असता राखी उत्तरली, ‘मी खरोखरच लग्न करणार आहे.’
उदयपूर शहरापासून किंचित दूर असलेल्या ‘फतेहगढ पॅलेस’मध्ये राखीच्या स्वयंवरासाठी खास सेट उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी या उपवरांची वरपरीक्षा सुरू आहे. लग्न ही वैयक्तिक बाब असते. ती अशी सार्वजनिक का करावीशी वाटली या थेट प्रश्नावर राखी सावंतची जराही चलबिचल झाली नाही. ती म्हणाली की, ‘मी लपूनछपून लग्न केले असते तरी माझ्या लग्नाचे ‘फुटेज’ किंवा छायाचित्रे एखाद्या प्रसारमाध्यमाने मिळवून ती दाखविली असती. त्यामुळे माझे लग्न तसेही सार्वजनिकच झाले असते. त्यापेक्षा मीच ते सार्वजनिक करत आहे. यातून पैसा, प्रसिद्धी हे सर्व काही मिळेल, असेही ती स्पष्टपणे म्हणाली. तुला कसा पती हवा आहे असे विचारताच ती म्हणाली की, ‘त्याच्या वैयक्तिक प्रगतीसाठी माझा ‘शिडी’ म्हणून त्याने वापर करून नये आणि तो प्रश्नमाणिक असावा.’
राखीला एकत्र कुटुंबात राहायचे आहे. तिला वेगळा संसार थाटायचा नाही. विवाह म्हणजे दोन व्यक्तींप्रमाणेच दोन कुटुंबांचे नातेही जुळत असते. उपवर म्हणून निवड झालेल्या सर्व उपवरांच्या घरची मंडळींना राखी सून म्हणून पसंत आहे, असे राखीने सांगितले.
राखीचे मन जिंकण्यासाठी या उपवरांना वेगवेगळ्या कसोटय़ांना सामोरे जावे लागणार आहे. लग्न झाल्यानंतरही आपण मनोरंजन क्षेत्रापासून फारकत घेणार नसल्याचे राखी म्हणाली. त्यानंतरही जशा भूमिका मिळतील (आयटम सॉँगसुद्धा) त्या करण्याची राखीची तयारी आहे. या स्वयंवराचा सूत्रसंचालक आणि राखी सावंतचा मित्र म्हणून राम कपूर छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे. राखीने किंवा उपवरांनी सल्ला मागितल्यास तो देणे ही त्याची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे भोजपुरी फिल्मस्टार आणि ‘बिग बॉस - १’दरम्यान राखीचा जवळचा मित्र झालेला रवी किशन हाही राखीचा भाऊ म्हणून उपवरांची वरपरीक्षा घेणार आहे. ‘आयटम गर्लशी लग्न करणार, असे सांगितल्यावर घरच्यांचे म्हणणे काय होते?’, ‘महिन्याची कमाई किती’, असे थेट प्रश्न विचारून तो उपवरांची परीक्षा घेणार आहे. लग्नाचा मांडव, बँडवाले इत्यादी सर्व जय्यत तयारी आहे. राखीच्या नावापुढे कोणते आडनाव जोडले जाणार याचा निर्णय येत्या दोन महिन्यांत लागणार आहे. येत्या २९ जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता एनडीटीव्ही वाहिनीवर राखीचे स्वयंवर रंगणार आहे.