Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘एकटा जीव’ हाऊसफुल्ल! सातव्या आवृत्तीचे आज राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी

मराठी रंगभूमीवर ‘विच्छा माझी पुरी करा’या नाटकाद्वारे नवा इतिहास घडविणाऱ्या आणि त्यानंतर

 

मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वत:ची शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव’ आत्मचरित्रालाही वाचकांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभतो आहे. उद्या २५ जून रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे.
चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या अनिता पाध्ये यांनी दादांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्राचे शब्दांकन केले असून पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. त्यानंतरच्या चार आणि गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या सर्व आवृत्त्या अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. मुंबईत होणारा हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ मिमिक्री कलाकार सुदेश भोसले हे दादांच्या काही आठवणी सांगणार असून दादांच्या आवाजात या पुस्तकातील काही भागाचे वाचनही करणार आहेत.
पुस्तकाची पहिली आवृत्ती १२ मार्च १९९९ रोजी तर दुसरी आवृत्ती अवघ्या एका महिन्यांत म्हणजे ४ एप्रिल १९९९ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर हे पुस्तक न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईच्या कचाटय़ात सापडले होते. न्यायालयाकडून या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. मात्र पाध्ये यांनी न्यायालयीन कचाटय़ातून २००० मध्ये हे पुस्तक सोडवले. त्यामुळे पुस्तकावरील बंदी उठली. नंतर त्याच वर्षी पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. पुढे दर वर्षी एक या प्रमाणे एकेक आवृत्ती येत राहिली. दादांचे आयुष्य हे विविध नाटय़पूर्ण घटनांनी भरलेले होते. या पुस्तकात त्यांच्या या सर्व आयुष्याचा पट उलगडला गेला आहे. हे आत्मचरित्र असूनही दादांनी आपल्या आयुष्यात जे काही घडले त्यापैकी काहीही न लपवता सर्व काही प्रश्नंजळपणाने सांगितले आहे. आपल्यातील गुण-दोषांसकट त्यांनी स्वत:ला वाचकांपुढे सादर केले असून त्यांचे हे प्रश्नंजळपण दादांच्या चाहत्यांसकट सर्व वाचक आणि रसिकांना भावल्यामुळेच दहा वर्षात पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत असल्याचे पाध्ये यांनी ‘वृत्तान्त’शी बोलतांना सांगितले.
चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करत असल्यामुळे दादा कोंडके यांच्याशी परिचय होताच. या पुस्तक लेखनाच्या निमित्ताने तो अधिक जास्त जवळून झाला. पुस्तकाचे लेखन करण्यापूर्वी मी जवळपास अकरा महिने दररोज दादांशी बोलून सर्व माहिती घेत होते. दुपारी ४ ते रात्री ९ अशी वेळेत आमच्या गप्पा व्हायच्या. आमचे हे सर्व बोलणे ध्वनिमुद्रीत केलेले असून त्याच्या ८० कॅसेट्स माझ्याकडे आहेत. दादांशी बोलून सर्व माहिती घेऊन झाल्यानंतर तीन महिन्यांत मी पुस्तक लेखनाचे काम केले. पुस्तकाचे लेखन हे दादांच्या शैलीतच केले असल्याचे त्या म्हणाल्या.
हिंदूी आणि गुजराथी भाषेत या पुस्तकाच्या भाषांतर/अनुवादासाठी विचारणा करण्यात आली आहे, मात्र त्याबद्दल अद्याप विचार केला नसल्याचे पाध्ये म्हणाल्या.