Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बार्बीच्या भेटीस जाणार ठकीचा संसार
प्रशांत मोरे

काही क्षण का होईना, लहानपणीच मोठे होण्याची गंमत मिळवून देणाऱ्या आपल्याकडचा

 

भातुकलीचा संसार बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त अमेरिकेत मांडला जाणार आहे. अमेरिकेतील फिलाल्डेफिया येथे येत्या २ ते ५ जुलैदरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन भरत असून, मुंबईतील ‘१४ विद्या ६४ कला’ या संस्थेच्या वतीने पुण्यातील भातुकली संग्राहक विलास करंदीकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यानिमित्ताने पूर्वेकडची ठकी बार्बीच्या देशाची सैर करणार आहे.
मनसोक्त भातुकली खेळणे हा आपल्याकडच्या लहान मुलांचा त्यातही विशेषत मुलींचा आवडता छंद. बदलत्या काळातही भातुकलीचे हे आकर्षण कायम आहे. गर्भ श्रीमंतांच्या महालांपासून ते गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वत्र भातुकलीचा संचार असतो. पुण्यातील एक छांदिष्ट विलास करंदीकर यांनी भारतभर फिरून ठिकठिकाणची भातुकलीतील खेळणी मिळविली. पुण्यातील एका दुकानात मोड म्हणून आलेले एक भातुकलीतील खेळणे ते घरी घेऊन आले आणि त्यानंतर तशी खेळणी जमा करण्याचा त्यांना छंद जडला. निरनिराळ्या प्रश्नंतातील वैशिष्टय़पूर्ण भातुकलीतील खेळणी त्यांच्या संग्रहात आहेत. लाकूड, तांबे, पितळ ते अगदी चांदीची मौल्यवान खेळणीही त्यांच्या खजिन्यात आहेत. महाराष्ट्रात आजवर विविध ठिकाणी त्यांनी १५० प्रदर्शने भरविली आहेत. विशेष म्हणजे मुलांना ते खेळणी केवळ पाहायलाच नव्हे, तर खेळायलाही देतात.
एप्रिल महिन्यात मुंबईत विलेपार्ले येथे ‘१४ विद्या-६४ कला’ या संस्थेच्या वतीने भातुकलीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मराठी वर्तमानपत्रांच्या इंटरनेट आवृत्तीत त्या विषयीचे वृत्त वाचून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे संजय पेठे यांच्याशी संपर्क साधला आणि विलास करंदीकर यांच्या या भातुकलीच्या संसारास अमेरिकेचे आमंत्रण दिले. त्यानुसार विलास करंदीकर येत्या ३० जुलै रोजी अमेरिकेत रवाना होत आहेत. यानिमित्त प्रथमच भारतीय भातुकली परदेशात जाणार आहे. एकूण ४५० खेळणी अमेरिकेतील या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. त्यात जातं, पोलपाट, पाटा-वरवंटा, बंब इ. पारंपरिक वस्तूंचा समावेश आहे.