Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एमबीए अभ्यासक्रमाच्या ४० नवीन महाविद्यालयांना मान्यता
प्रतिनिधी

उच्च शिक्षण क्षेत्रात कमालीचे महत्त्व असलेल्या ‘मास्टर इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए)

 

या अभ्यासक्रमाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या मागणीमुळे राज्यात ‘एम.बीए.’ची तब्बल ४० महाविद्यालये यंदा सुरू होत आहेत. ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने राज्यातील या नव्या महाविद्यालयाची नावे जाहीर केली असून त्याची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे प्रश्नप्त झाली असल्याचे प्रभारी संचालक सु. का. महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या नवीन महाविद्यालयांमध्ये २ हजार ४०० जागांची प्रवेश क्षमता उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
‘एमसीए’ अभ्यासक्रमासाठी चार (२४० प्रवेश क्षमता) व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी सहा (३४० प्रवेश क्षमता) नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. पदविका अभियांत्रिकी (तंत्रनिकेतन) अभ्यासक्रमाची यंदा पाच सरकारी महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. नंदूरबार, हिंगोली, अंबड, मूर्तिजापूर व तासगाव या ठिकाणी ही महाविद्यालये सुरू होतील. भंडारा येथे पुढील वर्षात पॉलिटेक्नीक महाविद्यालय सुरू होणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, तंत्रनिकेतन महाविद्यालयांसाठी यंदा केंद्रीभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सरकारी व अनुदानित महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जी खासगी विनाअनुदानित महाविद्यालये या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, अशा महाविद्यालयांनाही सामावून घेण्यात येणार आहे. परंतु, अशा महाविद्यालयांनी २५ जूनपर्यंत शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असल्याचे, महाजन म्हणाले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने खासगी महाविद्यालयांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेण्याची मागणी केली होती. त्याची दखल तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतली आहे.
एमएस्सी-केमेस्ट्रीसाठी यंदा केंद्रीभूत प्रवेश नाहीत
मुंबई विद्यापीठातील एमएस्सी-केमेस्ट्री अभ्यासक्रमाला स्वायत्तता मिळाल्याने या अभ्यासक्रमाची स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु, या निर्णयामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयातील एमएस्सी-केमेस्ट्री अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश देण्यात येणार नसल्याने विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयात व्यक्तीश: जावून अर्ज घ्यावे लागतील. तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दूड सहन करावा लागेल, हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांसाठी गेल्या वर्षाप्रमाणेच केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.