Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रूळांवरून तुरुंगात
बोरिवली ते विरार पट्टय़ातील स्थानकांवर रूळ ओलांडताना पकडलेल्या चार प्रवाशांना गेल्या

 

आठवडाभरात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. कदाचित त्यापैकी दोघेजण अजूनही ठाण्यातील तुरुंगात असतील. पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या जोरदार मोहिमेअंतर्गत या सर्वाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याखेरीज अनेक प्रवाशांकडून ५०० ते १००० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध गेल्या दीड-दोन वर्षापासून वाहतूक पोलिसांनी चालविलेल्या मोहिमेप्रमाणे पश्चिम रेल्वेने ही मोहीम चालविल्यास, मुंबईतील रूळ ओलांडणाऱ्यांचे आणि त्या अनुषंगाने रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यादृष्टीने ही एक चांगली सुरुवात मानण्यास हरकत नाही.
पश्चिम रेल्वे आणि वाहतूक पोलीस यांनी हाती घेतलेल्या मोहिमांमध्ये एक सर्वात मोठा मुलभूत फरक आहे तो म्हणजे मद्यपान करून वाहन चालवणारे लोक स्वत:बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालतात आणि रूळ ओलांडणारे स्वत:च्याच जीवावर उठलेले असतात. आपल्या या कृत्यामुळे कुटुंबियांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, या गोष्टीचाही त्यांना रूळ ओलांडताना विसर पडलेला असतो. काही क्षणांचा वेळ अथवा थोडेफार श्रम वाचविण्यासाठी लोक आपला जीव पणाला का लावतात, हे मात्र न उलगडलेले कोडे आहे.
मुंबईत दरवर्षी तीन हजारांहून अधिक लोक रेल्वे अपघातांत दगावतात. त्यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना मरण पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. याखेरीज रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत होऊन, लाखो प्रवाशांचा विनाकारण खोळंबा होतो. तसेच रेल्वे कर्मचारी व लोहमार्ग पोलिसांची नाहक धावपळ उडते. मोटरमनला डोळ्यांत तेल घालून गाडय़ा चालवाव्या लागत असल्याने, त्यांच्यावरील कामाचा ताण वाढतो. अशा प्रकारे रूळ ओलांडताना एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास, त्याचा इतरांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठा परिणाम होत असतो. या साऱ्या गोष्टींचा विचार करता, पश्चिम रेल्वेने सुरू केलेली मोहीम निश्चितच समर्थनीय आहे.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाकडून चपराक बसल्यापासून पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडणाऱ्यांविरुद्ध मोठय़ा प्रमाणात मोहीम उघडली आहे. कधी गांधीगिरीच्या मार्गाने एनसीसी तसेच स्काऊड अ‍ॅण्ड गाईडच्या मुलामुलींकडून रूळ ओलांडणाऱ्यांना गुलाब देणे, प्रसारमाध्यमांतून जाहिराती प्रसिद्ध करून लोकांना रूळ ओलांडण्यापासून परावृत्त करणे, ‘किस्सा पटरी का’ सारख्या पथनाटय़ाच्या माध्यमातून रूळ ओलांडण्याचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देणे यांसारख्या गोष्टींच्या माध्यामातून लोकप्रबोधन करण्यात येत आहे. त्याचबरोबर कांदिवली, अंधेरी, दादर, माहीम इत्यादी स्थानकांत धडक कारवाईच्या माध्यमातून रूळ ओलांडल्यास कठोर कारवाई होईल, असे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्नही पश्चिम रेल्वेने केला आहे. त्याचबरोबर रूळ ओलांडल्यास कामधंद्याचे नुकसान करून तुरुंगाची हवा खावी लागेल, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, यासारखी धडक मोहीम उघडण्यासाठी मध्य रेल्वेला कधी जाग येणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
रूळ ओलांडणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम सुरू केल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील जबाबदारी आणखी वाढली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनमानसावर या मोहिमेचा खोलवर ठसा उमटवायचा असल्यास, ती अधिक प्रभावीपणे राबविली पाहिजे. वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांविरुद्ध चालविलेल्या मोहिमेइतकी कठोरपणे ती चालविणे आवश्यक आहे. एखाद्या बडय़ा सेलिब्रेटीला मद्यपान करून गाडी चालविताना पडकले, तरी वाहतूक पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. मद्यपी चालकांना सोडून देण्यासाठी कुणाचाही दबाव सहन केला नाही. त्यामुळे त्यांची मोहीम यशस्वी ठरली. मात्र रूळ ओलांडणाऱ्यांविरुद्धच्या या मोहिमेत लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचा सकारात्मक सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. अन्यथा सध्या रूळ ओलांडणाऱ्यांकडून शंभर-दोनशे रुपये उकळणाऱ्या पोलीस व आरपीएफचा दर हजार-पाचशेपर्यंत वधारला, इतपतच या मोहिमेचे फलित राहील.
प्रत्येक महत्त्वाच्या स्थानकावर रेल्वे अपघातांत जखमी होणाऱ्यांवर उपचार करण्याची सोय करावी, अशा आशयाच्या न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेने ही मोहीम राबविली. लोकांवर उपचार करीत बसण्याऐवजी अपघातच टाळावे, हा त्यामागील उद्देश असावा. मात्र त्यापलीकडे जाऊन लोकांवर रूळ ओलांडण्याचीच वेळ येऊ नये, या दृष्टीनेही रेल्वेने विचार करावा. केवळ काँक्रिटच्या भिंती बांधून लोकांना रोखण्याऐवजी, आवश्यकता असलेल्या ठिकाणी रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल अथवा भुयारी मार्ग बांधण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. हे पर्याय उपलब्ध होईपर्यंत रूळ ओलांडण्याची समस्या संपण्याची चिन्हे धूसर आहेत.
kailash.korde@expressindia.com