Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका आयुक्तांच्या धर्तीवर पोलीस आयुक्त व महासंचालकांसाठी निवासस्थान उभारणार
प्रतिनिधी

महापालिका आयुक्तांच्या धर्तीवर पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांच्यासाठी

 

निवासस्थान उभारण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज केली. याशिवाय येत्या तीन वर्षात मुंबई आणि राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधण्यात येतील, अशी हमीही पाटील यांनी या वेळी दिली.
वाकोला येथील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ३२४ सदनिका, परेड ग्राऊंड, प्ले ग्राऊं ड आणि १५०० प्रशिक्षणार्थीसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, सहआयुक्त राकेश मारिया (गुन्हे) आदी उपस्थित होते. मात्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे नवनिर्वाचित महासंचालक हसन गफूर हे अनुपस्थित होते. कृपाशंकर सिंह यांनी आपल्या भाषणात, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सदनिका दिल्या जातात, तर पोलीस आयुक्त आणि महासंचालकांसाठी निवासस्थाने का दिली जात नाही, असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना पाटील यांनी पालिका आयुक्तांच्या धर्तीवर पोलीस आयुक्त आणि महासंचालकांसाठीही निवासस्थाने उभारली जातील, अशी घोषणा केली. तसेच ही घरे मलबार हिल किंवा नरिमन पॉईंट परिसरात दिली जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय येत्या तीन वर्षात मुंबई आणि राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधण्यात येतील, अशी घोषणाही पाटील यांनी केली. आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ कारवाई करता यावी, यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात हेलिकॉप्टर देण्याची घोषणा पाटील यांनी सोमवारी केली होती. तसेच मुंबई पोलिसांशिवाय कोणालाही त्याचा वापर करता येणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले होते. मात्र मुंबई पोलिसांप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईच्या पोलिसांनाही या हेलिकॉप्टरचा वापर करता येईल, असे पाटील यांनी सांगितले.