Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी
प्रतिनिधी

हुलकावणी देणारा पाऊस अखेर मंगळवारी बरसल्यामुळे मुंबईकर सुखावले. पण गेल्या काही

 

दिवसांमध्ये मुंबईत करण्यात आलेल्या पाणीकपातीमुळे अनेक विभागांतील नागरिक त्रस्त झाले होते. तर काही भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दादर पश्चिमेच्या जी नॉर्थ वॉर्डमधील रहिवाशांकडून सध्या वारंवार पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी करण्यात येत असून पाणी विभागातील अभियंते पाणी आल्यानंतर रात्री जल वाहिन्यांना दाब मापक यंत्र लावून त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा दाब मोजण्यासाठी धावपळ करीत आहेत.
दादरमधील जुन्या चाळींमधील रहिवाशांना गेले वर्षभर कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पावसाळा लांबल्याने पाणीकपात करण्यात आली आहे. परिणामी या परिसरात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने ते चाळींपर्यंत पोहोचतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबद्दल येथील रहिवाशांनी पालिकेच्या जी-नॉर्थ वॉर्डमधील अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. विभाग अधिकारी अभियंत्यांना जलवाहिन्यांची तपासणी करण्यासाठी पाठवतात. मात्र तपासणीसाठी हे अधिकारी कार्यालयीन वेळेत येतात. दादरमध्ये संध्याकाळी ७.३० ते रात्री १०.३० या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. अभियंते सकाळी येऊन चाळीतील जलवाहिन्यांची तपासणी करतात व त्या खाजगी प्लंबरकडून दुरूस्त करून घेण्याचा सल्ला देतात. ज्यांनी जलवाहिन्या एक-दोन वर्षापूर्वी बदलल्या आहेत किंवा दुरूस्त करून घेतल्या आहेत अशांनाही हे अधिकारी अशीच सूचना करीत आहेत.
कोहिनूर मिल, प्लाझा सिनेमा आणि स्टार सिटी दरम्यान असलेल्या मिरांडा चाळी, कासार आळी, केशव भुवन, पारेख महाल इत्यादी परिसरातील जुन्या चाळींमधील रहिवाशांवर पाण्यासाठी दाही दिशा वणवण फिरण्याची वेळ आली आहे. काही चाळींमध्ये विद्युत पंपाच्या सहाय्याने इमारतींमध्ये पाणी चढवले जात आहे, तर काही रहिवाशांनी स्वत:च्या घरातच पाण्याचे पंप बसविले आहेत. रात्री ९ वाजता पाणीपुरवठा बंद होण्याच्या वेळेस पालिकेचे अभियंते या विभागामधील जलवाहिन्यांची तपासणी करीत आहेत. या जलवाहिन्यांतून पाणी साधारण दोन फूटांहून अधिक उंच उडतानाही दिसत नाही. यामागचे कारण अद्याप अभियंत्यांना समजलेले नाही ही आश्चर्याची बाब आहे. जलवाहिन्या जुन्या जाल्याने त्यामधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती असावी असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिन्या का बदलण्यात येत नाहीत असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे. जलवाहिन्यांतून होणारी पाणी गळती शोधणारी उपकरणे उपलब्ध नाहीत आणि खोदकाम करून जलवाहिन्या तपासण्याची परवानगी मिळत नाही, त्यामुळे पाणीपुरवठा का होत नाही त्याचा अशा पद्धतीने शोध घ्यावा लागत आहे, असे उत्तर पालिका अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिले.
सध्या या परिसरात अनेक उंच इमारती व टॉवर्सचे बांधकाम जोरात सुरू असून काही टॉवर्स पूर्ण झाले आहेत. या टॉवर्सना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही चाळी व वाडय़ांमधून अर्निबधपणे जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ एकच मजला असणाऱ्या ३०१ मिरांडा चाळीतील सुमारे ४९ वर्षापासून १० भाडेकरूंना एका जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कधी पाणी कमी दाबाने येते तर कधी येतच नाही. याबद्दल वॉर्ड ऑफीसरमध्ये रितसर तक्रार करण्यात आली आहे. या चाळीतील काही भाडेकरूंना वॉर्ड अधिकाऱ्याने पाण्याची स्वतंत्र वाहिनी दिली आहे. सलग चार भाडेकरू एकत्रितपणे नसतानासुद्धा ज. कृ. सावंत मार्गावरील जलवाहिनीमधून नियम धाब्यावर बसवून ही जोडणी देण्यात आली आहे. त्यांच्याकडील जुनी जलवाहिनी तशीच ठेवण्यात आली आहे. कासार आळीजवळच्या पदपथावरील घरांना दोन वर्षापूर्वी नवीन जलवाहिन्या जोडण्यात आल्या होत्या. आज येथे कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे तेथील रहिवाशांना शेजारच्या इमारतींमधून पाणी आणावे लागते. विशेष पाहणीमध्ये इथल्या नागरिकांनी घरातील जलवाहिन्यांचे नळ काढून टाकल्याचे आढळले.
येथील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना अशा प्रकारे नव्या जोडण्या कशा देण्यात येत आहेत असा सवाल रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे. नव्या जोडण्यांसाठी अर्ज केल्यावर अशा जोडण्या देण्याचे बंद केले आहे असे सांगून पालिका अधिकारी बोळवण करतात, असा तक्रारीचा सूर रहिवाशांनी लावला आहे.