Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वाचन अधिक प्रगल्भ व्हायला हवे - टिकेकर
प्रतिनिधी

गिरगावातील वास्तव्याच्या आठवणी जागवत वाचनासंबंधी विस्तृत विवेचन करताना वाचन पुढे सरकलेच नाही, आपले वाचन प्रगल्भ व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, एशियाटिक

 

सोसायटीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. अरूण टिकेकर यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
गिरगावातील ब्राह्मण सभेच्या पानवलकर ग्रंथालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिण्यात आलेल्या ‘ग्रंथालये आणि बदलती वाचन संस्कृती’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कवीवर्य प्रश्न. शंकर वैद्य होते . सुरेश देशपांडे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. अश्विनी फाटक, मंजिरी वैद्य, पत्रकार राजीव काळे आणि ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.
सुरेश देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. पत्रकारांना बातम्या किंवा लेख लिहिताना, अनुवाद करताना वाचनाचा खूप फायदा होतो. पत्रकारांनी अवांतर वाचनही केले पाहिजे, असे उपस्थित दोन्ही पत्रकारांनी सांगितले. वाचनसंस्कृतीसंदर्भात बोलताना राजीव काळे म्हणाले की, ‘ई-बुक्स’ किंवा इतर कितीही माध्यमे आली तरी पुस्तकांचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही. पुस्तकांचे वाचन टिकून राहीलच.
श्री. वा. फाटक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांनी त्यांचे अनुभव सांगून वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी त्यांच्या ग्रंथालयाच्या योजना विशद केल्या. विशेषत: मुलांकरिता ‘मुक्तद्वार’ हा एक वेगळा कक्ष असल्याचे सांगून जवळपास ८०० हून अधिक मुले त्यांच्या वाचनालयाचे सभासद असल्याचे त्या म्हणाल्या. आपण काय वाचले यावर मुलांकडून लिखाण करून घेतले जाते हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक यांनी त्यांच्या वाचनालयात केलेल्या संगणकीकरणासंबंधी विस्तृत माहिती देऊन या वाचनालयाच्या वेबसाइटचा उपयोग वाचकांना कसा होतो ते सांगितले. परिसंवादातील सगळ्याच वक्त्यांनी वाचनसंस्कृती टिकून राहील, असा आशावाद व्यक्त केला. सुरेश देशपांडे यांनी मात्र मराठी भाषा कितपत टिकेल किंवा आणखी २५ वर्षानी कदाचित ती बोलीभाषेच्या स्वरूपात राहील, अशी साधार भीती व्यक्त केली. या अतिशय रंगलेल्या परिसंवादाचा समारोप करताना अध्यक्ष कवीवर्य प्रश्न. शंकर वैद्य यांनी अतिशय मनोज्ञ असे विवेचन केले. भाषा आणि लिपी यांचा उगम कसा झाला हे सांगून भाषा ही घरंगळत जाऊ शकते त्यामुळे आपण आपल्या भाषेविषयी जागरूक राहायला हवे, अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या मध्यंतरात पानवलकर ग्रंथालयाच्या आजी-माजी ग्रंथसेवकांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथालयाच्या अध्यक्षा शीला पुराणिक यांनी प्रश्नस्ताविक केले. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष देवधर यांनी आभार मानले. माधुरी करमरकर यांच्या सुश्राव्य गायनाने महोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाची नियोजन व्यवस्था पाहण्याचे काम शकुंतला मुळ्ये यांनी केले.