Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अमीर खुस्रोच्या संगीतसंपदेवर शनिवारी मैफल
प्रतिनिधी

मागील पाच वर्षे सुफी संगीत परंपरांवर आधारित रुहानियत हा संगीत महोत्सव भारतातील अनेक

 

शहरांमध्ये आयोजित करणाऱ्या ‘बनयन ट्री’ या संस्थेने येत्या शनिवारी, २७ जूनला १३ व्या शतकातील फारसी कवी आणि संगीततज्ज्ञ अमीर खुसरो यांच्यावर आधारित एका खास मैफलीचे आयोजन केले आहे. वरळीच्या नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये ही मैफल होणार असून भारत पेट्रोलियम आणि टाइम्स कार्ड या संस्थांनी ही मैफल प्रश्नयोजित केली आहे.
गुलाम घराण्यातील खिलजी घराण्याचा बादशहा अल्लाऊद्दीन खिलजी यांचे समकालिन व दिल्लीतील तत्कालिन निजामुद्दीन अवलियाचे शिष्य असलेले अमीर खुसरो हे उत्कृष्ट कवी असण्याबरोबरच मातब्बर संगीततज्ज्ञ होते. तबला आणि सतार या वाद्यांचे निर्माते खुसरो होते तसेच ख्याल आणि कव्वाली या संगीत प्रकारांची देन त्यांनीच देशाला दिली असे मानले जाते. काव्य प्रकारांमध्येही गुल, खलबना, नक्शा, वसीत, स्वेला, मुकरनियाँ, निस्बतें आणि गझल या प्रकारांचे जनकत्व खुसरो यांच्याकडे जाते. २७ जूनच्या मैफलीत मुरादाबादचे चिश्ती बंधू कव्वाली आणि रंग सादर करणार असून उस्ताद अस्लम खान हे स्वेला, ख्याल आणि तराना हे काव्यप्रकार गाऊन दाखवतील. हैदराबाद येथील कलाकार पं. विठ्ठल पर्शियाची गझल म्हणजे स्वेला सादर करणार असून शुभा जोशी या पावसावर आधारित गीते आणि लोकगीतेही सादर करणार आहेत. हिंदी आणि सुफी परंपरांमधील गझल दिलराज कौर सादर करणार असून रफाअत खान व त्यांचा संच सतारवादनातील अनेक कंगोरे रसिकांसमोर उलगडून दाखविणार आहेत. अमीर खुसरो यांच्या काव्यसंपदेवर ‘बनयन ट्री’शी संबंधित निनाद म्युझिक या कंपनीने दोन सीडींचा संच नुकताच बाजारात आणला आहे. तो संचही या मैफलीच्या वेळी रसिकांना खरीदण्यासाठी उपलब्ध असेल.