Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आंध्र बँकेच्या नोकरीत मराठी उमेदवारांना प्रश्नधान्य देणार
प्रतिनिधी

महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीयीकृत आंध्र बँकेच्या अंधेरी येथील क्षेत्रीय कार्यालयाने

 

विविध पदांसाठीच्या भरतीत मराठी उमेदवारांवर झालेल्या अन्यायाविरोधात तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली जात नसल्याबाबत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या शिष्टमंडळाने आंध्र बँकेत जाऊन भेट घेतली. दरम्यान, भविष्यात बँकेत केल्या जाणाऱ्या भरतीत मराठी उमेदवारांना प्रश्नधान्य दिले जाईल असे लेखी पत्र आंध्र बँक व्यवस्थापनाने महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.
यासंबंधी बँक व्यवस्थापनाची भेट घेण्यापूर्वी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंध्र बँकेच्या अंधेरी येथील क्षेत्रीय कार्यालयात बँकेचे सरव्यवस्थापक एम. अंजनिया प्रसाद यांना पूर्वसूचना देऊन भेट ठरविण्यात आली
होती.
परंतु, महासंघाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने येऊन निदर्शने करतील या भीतीने एम. अंजनिया प्रसाद नियोजित भेटीच्या दिवशी कार्यालयात अनुपस्थित होते. त्यामुळे शिष्टमंडळ बँकेत पोहोचल्यावर सरव्यवस्थापकांच्या अनुपस्थितीत अन्य अधिकाऱ्यांनी चर्चेची तयारी दर्शविली. मात्र शिष्टमंडळ एम. अंजनिया प्रसाद यांच्याशीच चर्चा करण्याबाबत ठाम राहिले.
अखेरीस प्रसाद यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले. त्या वेळी शिष्टमंडळाने केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार आंध्र बँकेची सर्व परिपत्रके, फलक, कर्मचारी ओळखपत्रे, बँकेच्या योजना इत्यादी साहित्य मराठीत छापणे आवश्यक आहे, बँकेतील मराठी कर्मचाऱ्यांच्या केल्या जाणाऱ्या बदल्या तसेच बढतीसंदर्भातील व्यवस्थापनाची भूमिका मराठीविरुद्ध असल्याचे उदाहरणासहित पटवून देऊन तात्काळ अन्याय निवारण करण्याची मागणी करण्यात आली.
भरती प्रक्रियेबाबतही मराठी उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचेही शिष्टमंडळाने सरव्यवस्थापक एम. अंजनिया प्रसाद यांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर आंध्र बँक व्यवस्थापनाने शिष्टमंडळाच्या मागण्या मान्य केल्या.