Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

गेली काही वर्षे टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत असलेला वांद्रे-वरळी सागरीसेतू मुंबईकर दुरूनच पाहत आहेत. त्याचा एक टप्पा पूर्ण झाला असून हा पूल वाहतुकीसाठी लवकरच सुरू होणार अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या पुलाचा फेरफटका मारण्याची मुंबईकरांची इच्छा कधी पूर्ण होईल? याचे निश्चित उत्तर अजूनही मिळालेले नाही. या महिन्याअखेरीस तरी हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल का, याचीच मुंबईकर सध्या प्रतीक्षा करीत आहेत.

वाढत्या झोपडपट्टय़ांनी पळविले मुंबईच्या तोंडचे पाणी !
संदीप आचार्य

अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याचा चंग बांधल्यासारखी पालिका व पोलिसांची वागणूक असल्यामुळे मुंबईत दररोज जोगोजागी अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात २००० सालपर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले. नंतर ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा २००० सालपर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याची मागणी सुरू आहे. प्रत्यक्षात आजच्या दिवशीही मुंबईत कुठेो कुठे झोपडी बांधण्याचे काम सुरू असून पालिका आयुक्तांकडून पोलीस संरक्षण मिळत नसल्याचा बहाणा सांगितला जातो तर बंदोबस्ताच्या अन्य कामामुळे पुरेसे पोलीस नसल्याचे पोलिसांकडून उत्तर दिले जाते. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेपासून पाण्याच्या उपलब्धतेपर्यंत अनेक समस्या गंभीर होत चालल्या आहेत.

स्वयंवर राखीचे..
प्रतिनिधी

मुंबईतील मराठी कुटुंबात जन्मलेला आणि पेशाने मेकॅनिकल इंजिनीअर असलेला प्रणव दामले काही दिवसांसाठी आणि त्याच्या प्रयत्नांत यशस्वी झाला तर कायमचा सेलिब्रिटी होणार आहे. त्याने कोणताही चित्रपट किंवा मालिका स्वीकारलेली नाही आणि कोणताही विक्रम केलेला नाही. पण राखी सावंतच्या स्वयंवरासाठी निवड झालेल्या उपवरांपैकी तो एक उपवर आहे. केवळ तोच नाही तर राखीचे मन जिंकण्यासाठी नागपूरचा अश्विन चौधरी, कॅनडाचा इलेश पारुजानवाला, जम्मू आणि काश्मीरच्या गुन्हे अन्वेषण शाखेत काम करणारा अथर परवेझ, दिल्लीचा मनमोहन तिवारी इत्यादी १६ उपवरांचा प्रयत्न सुरू आहे. ‘राखी का स्वयंवर हा केवळ फार्स आहे की ती खरोखरच लग्न करणार?’ अशी शंका उपस्थित केली असता राखी उत्तरली, ‘मी खरोखरच लग्न करणार आहे.’

‘एकटा जीव’ हाऊसफुल्ल! सातव्या आवृत्तीचे आज राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी

मराठी रंगभूमीवर ‘विच्छा माझी पुरी करा’या नाटकाद्वारे नवा इतिहास घडविणाऱ्या आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वत:ची शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव’ आत्मचरित्रालाही वाचकांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभतो आहे. उद्या २५ जून रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे.

बार्बीच्या भेटीस जाणार ठकीचा संसार
प्रशांत मोरे

काही क्षण का होईना, लहानपणीच मोठे होण्याची गंमत मिळवून देणाऱ्या आपल्याकडचा भातुकलीचा संसार बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त अमेरिकेत मांडला जाणार आहे. अमेरिकेतील फिलाल्डेफिया येथे येत्या २ ते ५ जुलैदरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन भरत असून, मुंबईतील ‘१४ विद्या ६४ कला’ या संस्थेच्या वतीने पुण्यातील भातुकली संग्राहक विलास करंदीकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यानिमित्ताने पूर्वेकडची ठकी बार्बीच्या देशाची सैर करणार आहे.

एमबीए अभ्यासक्रमाच्या ४० नवीन महाविद्यालयांना मान्यता
प्रतिनिधी

उच्च शिक्षण क्षेत्रात कमालीचे महत्त्व असलेल्या ‘मास्टर इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए) या अभ्यासक्रमाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या मागणीमुळे राज्यात ‘एम.बीए.’ची तब्बल ४० महाविद्यालये यंदा सुरू होत आहेत. ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने राज्यातील या नव्या महाविद्यालयाची नावे जाहीर केली असून त्याची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे प्रश्नप्त झाली असल्याचे प्रभारी संचालक सु. का. महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या नवीन महाविद्यालयांमध्ये २ हजार ४०० जागांची प्रवेश क्षमता उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

रूळांवरून तुरुंगात
बोरिवली ते विरार पट्टय़ातील स्थानकांवर रूळ ओलांडताना पकडलेल्या चार प्रवाशांना गेल्या आठवडाभरात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. कदाचित त्यापैकी दोघेजण अजूनही ठाण्यातील तुरुंगात असतील. पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या जोरदार मोहिमेअंतर्गत या सर्वाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याखेरीज अनेक प्रवाशांकडून ५०० ते १००० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध गेल्या दीड-दोन वर्षापासून वाहतूक पोलिसांनी चालविलेल्या मोहिमेप्रमाणे पश्चिम रेल्वेने ही मोहीम चालविल्यास, मुंबईतील रूळ ओलांडणाऱ्यांचे आणि त्या अनुषंगाने रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यादृष्टीने ही एक चांगली सुरुवात मानण्यास हरकत नाही.

कुलगुरूपदासाठी आता नवे निकष
प्रश्नचार्य, विभागप्रमुखांना संधी
तज्ज्ञांना मात्र बंदी
तुषार खरात
विद्यापीठांमधील कुलगुरूपदासाठी नव्याने निश्चित करण्यात आलेले पात्रता निकष महाविद्यालयीन प्रश्नचार्य तसेच विद्यापीठातील विविध विभागप्रमुखांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. याउलट प्रशासकीय व्यक्ती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासाठी हे सुधारित निकष मारक ठरणार असल्याची. त्यामुळे राज्य सरकारने निश्चित केलेल्या या नव्या पात्रता निकषांबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पालिका आयुक्तांच्या धर्तीवर पोलीस आयुक्त व महासंचालकांसाठी निवासस्थान उभारणार
प्रतिनिधी
महापालिका आयुक्तांच्या धर्तीवर पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांच्यासाठी निवासस्थान उभारण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज केली. याशिवाय येत्या तीन वर्षात मुंबई आणि राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधण्यात येतील, अशी हमीही पाटील यांनी या वेळी दिली.

आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी
प्रतिनिधी

हुलकावणी देणारा पाऊस अखेर मंगळवारी बरसल्यामुळे मुंबईकर सुखावले. पण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत करण्यात आलेल्या पाणीकपातीमुळे अनेक विभागांतील नागरिक त्रस्त झाले होते. तर काही भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दादर पश्चिमेच्या जी नॉर्थ वॉर्डमधील रहिवाशांकडून सध्या वारंवार पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी करण्यात येत असून पाणी विभागातील अभियंते पाणी आल्यानंतर रात्री जल वाहिन्यांना दाब मापक यंत्र लावून त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा दाब मोजण्यासाठी धावपळ करीत आहेत.

वामनराव सहस्त्रबुद्धे यांचे निधन
प्रतिनिधी

कुर्लास्थित प्रीमियर कॉलनी परिसरातील गांधी बाल मंदिर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वामनराव सहस्त्रबुद्धे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ होते.
गांधी बाल मंदिर शाळेबरोबरच विद्याभारती, विद्या प्रतिष्ठान, महामुंबई मुख्याध्यापक संघटना, वनवासी कल्याण आश्रम या संघटनांमध्येही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. १९९४-९५ सालचा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

जिगीषा सांस्कृतिक केंद्रात ‘व्हाइट लिली आणि नाईट रायडर’
नाटय़ प्रतिनिधी

गोरेगावच्या नंदादीप शाळेतील जिगीषा सांस्कृतिक केंद्रात शनिवार, २७ जून रोजी सायं. ७.३० वा. अनामिका निर्मित व साईसाक्षी प्रकाशित ‘व्हाइट लिली आणि नाईट रायडर’ हे सध्या गाजत असलेले नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय रसिका जोशी आणि मिलिंद फाटक यांनी केला असून, नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं आहे. पाश्र्वसंगीत नरेंद्र भिडे यांचं असून, गिरीश जोशी यांची प्रकाशयोजना आहे. या प्रयोगासाठी १५ वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही. ‘जिगीषा’च्या प्रेक्षक सभासद योजनेची नोंदणी सुरू असून, अधिक माहितीसाठी संपर्क- भूषण ठाकूर- ९८२१८६७२३१/ ९९३०७३४५९३, जिगीषा- २८४०१६५३ (सोम. ते शनि. दु. ४ ते ६). ई-मेल- response@jigishacreations.com

वृक्षारोपण व कागदी पिशव्या-कार्यशाळा
प्रतिनिधी : येथील पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या वतीने शनिवार २९ जून रोजी न्यू इंग्लिश स्कूल. राम मारूती रोड, नौपाडा, ठाणे (प) येथे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ यावेळेत कागदी पिशव्या तयार करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत वृक्षारोपण कसे करावे याविषयी अंजना देवस्थळी मार्गदर्शन करणार आहेत.

ईशा टूर्सला पुरस्कार
प्रतिनिधी
लेह-लडाखमध्ये लोकांनी पर्यटनाला जावे यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी लेह-लडाखची माहिती देणारी छायाचित्र प्रदर्शने भरविणे, यासंबंधी वृत्तपत्रांतून लेख प्रसिद्ध करणे तसेच विविध महोत्सवांदरम्यान लडाखला पर्यटकांना घेऊन जाणे असे काम करून ईशा टूर्सने पर्यटकांमध्ये लेह-लडाख हे पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्याबद्दल अलीकडेच लेहमध्ये झालेल्या सिंधु महोत्सवादरम्यान जम्मू व काश्मीर पर्यटन विभाग आणि लडाख हिल डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन ईशा टूर्सचा गौरव करण्यात आला. दरवर्षी लडखामध्ये भरविण्यात येणाऱ्या हेमिस फेस्टीव्हल, लडाख महोत्सव, कारगिल विजयदिन विशेष, रक्षाबंधन तसेच स्वातंत्र्यदिनी भारतीय लष्करासोबत होणाऱ्या अनेक कार्यक्रमांदरम्यान ईशा टूर्सतर्फे पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते. गेल्या ८-९ वर्षापासून लेह-लडाख पर्यटकांमध्ये लोकप्रिय करण्यात ईशा टूर्सचा मोठा वाटा असून लेह-लडाख आणि झंस्कर व्हॅली येथे सुमारे ४००० पर्यटकांना ईशा टूर्सने नेऊन आणले आहे.

‘सुयोग अपार्टमेंटमधील रहिवाशांचा रिलायन्स टॉवरला विरोध नाही’
प्रतिनिधी

दहिसर (प.) येथील सुयोग अपार्टमेंट या इमारतीच्या ‘ए’ विंगच्या गच्चीवर रिलायन्स कंपनीचा टॉवर बसविण्यात येत असून सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊनच तो अमलात आणण्यात येत असल्याने सोसायटीमधील सर्वच्या सर्व चाळीस रहिवाशांचा त्याला पाठिंबा आहे, अशी माहिती सोसायटीचे कार्यवाह अशोक म्हात्रे यांनी दिली. दैनिक ‘लोकसत्ता’च्या ३ एप्रिल २००९ च्या अंकात ‘रिलायन्सच्या टॉवरकरिता महापालिका अधिकाऱ्यांकडून पायघडय़ा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबद्दल म्हात्रे म्हणतात की, वृत्तात ज्या सोसायटीच्या गच्चीवर टॉवर उभा राहत आहे त्याचे अध्यक्ष बी. डी. तोंडवळकर नाहीत. तोंडवळकर सुयोग अपार्टमेंट या इमारतीच्या ‘सी’ विंगचे अध्यक्ष असावेत. गच्चीवर रिलायन्सचा टॉवर बसविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाल्याने कुणाचाही विरोध नाही. शेजारील सोनारग्राम सोसायटीचा आमच्या इमारतीवर टॉवर उभारण्यास विरोध असल्याचे वृत्तात नमूद केले आहे. मग याच सोसायटीच्या उत्तरेकडे असलेल्या गोल्डमोहर इमारतीवर बसविण्यात आलेल्या टॉवरला त्यांनी विरोध का केला नाही, असा सवाल म्हात्रे यांनी केला.

अक्षरसम्राट कमल शेडगे यांचा रविवारी सत्कार
प्रतिनिधी
अक्षरसम्राट कमल शेडगे यांनी नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले असून हे औचित्य साधून राजेंद्र प्रकाशनाच्या वतीने ‘कमलाक्षरं’ या नवीन सुलेखन पुस्तकाचे प्रकाशन आणि कमल शेडगे यांच्या भव्य सत्काराचे रविवारी सायंकाळी रवींद्र नाटय़ मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे आणि रवी परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सायं. ७ वाजता होणार आहे. या वेळी ‘कमलाक्षरं’ हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राजेंद्र प्रकाशनाचे राजेंद्र कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.