Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

कर्डिले यांची ‘परतफेड’!
विखे फाउंडेशन जागेच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नगर, २४ जून/प्रतिनिधी
विळद घाटातील सरकारी जमीन लाटण्यापासून माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्यावरील सर्व आरोपांचा पुनरुच्चार करीत आमदार शिवाजी कर्डिले यांनी या सर्व प्रकरणांच्या चौकशीची मागणी करणारे निवेदन आज जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना दिले.विखे यांनी मागच्याच आठवडय़ात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ज्या पद्धतीने कर्डिले, तसेच राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर हल्ला चढवला होता त्याची परतफेड कर्डिले यांनी केली. आपल्या आरोपांशी संबंधित सरकारी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून या वेळी उपस्थित राहायला लावले.

पिचड यांच्याविरोधात तीन तास ‘रास्ता रोको’
अकोले, २४ जून/वार्ताहर

बांधकाम व्यावसायिक मंगेश नवले यांना आमदार मधुकरराव पिचड यांनी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ आज इंदोरी फाटा येथे विविध राजकीय कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या वतीने सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पिचड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी उद्या (दि. २५) तहसील कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहेत. शनिवारी (दि. २७) अकोले बंद ठेवण्यात येणार आहे. नवले यांना पिचड यांनी धमकावल्याचे समजताच सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हिंदुरक्षा कृति-समितीच्या ‘श्रीरामपूर बंद’ला चांगला प्रतिसाद; पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या सातजणांना अटक
श्रीरामपूर, २४ जून/प्रतिनिधी

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्या बंटी जहागीरदार याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी या मागणीसाठी आज हिंदूरक्षा कृती समितीने पुकरालेल्या ‘बंद’ला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. गोंधवणी परिसरात पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार वगळता ‘बंद’ शांततेत पार पडला. दगडफेक करणाऱ्या सातजणांना अटक करण्यात आली.

रुग्णालयात पारितोषिक वितरण! राज्य नाटय़ स्पर्धा
नगर, २४ जून/प्रतिनिधी

एकोणीस वर्षानंतर प्रथमच राज्य नाटय़ स्पर्धेत यशाचा झेंडा फडकावलेला. त्यात पुन्हा दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक, पण नेमक्या पारितोषिक वितरणाच्या वेळीच विजेता अपघातानं जायबंदी झालेला.. त्यामुळे तोच काय, त्याचा सगळा चमूच हिरमुसलेला. त्यात अपघातामुळेच ऐनवेळी नाटकाचा प्रयोगही रद्द करावा लागलेला. त्यांचे हे हिरमुसलेपण ओळखून प्रमुख पाहुण्यांनी पारितोषिक वितरणातला नेहमीचा औपचारिकपणा टाळून त्या विजेत्याला थेट तो ज्या रुग्णालयात दाखल होता, तेथे जाऊन पारितोषिक बहाल केलं. त्यांच्या या अनोख्या कृतीनं विजेता दिग्दर्शकच काय, पण त्याच्या सगळ्या कलाकारांची कळी एकदम खुलली आणि ४७व्या राज्य नाटय़ स्पर्धेचा तब्बल दोन वर्षे विलंबाने होत असलेला कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला.

जीवनदृष्टी
मानवी जीवन एवढं अद्भुत आणि अनाकलनीयही आहे की सामान्य जीव त्याच्या अंतरंगाचा ठाव घेण्याच्या नादी लागणं अशक्य आणि ज्ञानयोगियांचे जीवनभाष्य तसे सामान्यांच्या आकलनापलीकडचेच. पण तशा गूढमयच वाटणाऱ्या, भासणाऱ्या जीवनाची आणि त्यातील सकृतदर्शनी चक्रावून टाकणारी शब्दातीत आणि कालातीत विसंगतीची मात्र कलासक्त मनाला मोहिनी न पडते तर नवल. त्यातही या आगळ्या-वेगळ्या कालचक्रात अखंड आणि अव्याहत फिरणाऱ्या जीवनाचे तसे अनोखे, पण मानवी तर्काच्या पल्याड वसणारे वास्तव कवी लोकांना आपसूक रूंजी घालणार, साद घालणार आणि आवाहनही करणार.

अकरावीसाठी जिल्ह्य़ात ५८ हजार ३६० जागा; प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
नगर, २४ जून/प्रतिनिधी

अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व शाखांच्या ६०५ तुकडय़ांमध्ये जिल्ह्य़ात ५८ हजार ३६० जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी विशिष्ट शाळा-कॉलेजमध्येच प्रवेश घेण्याचा अट्टाहास सोडल्यास प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे माध्यमिक शिक्षण विभागाने आज स्पष्ट केले. विभागाने प्रवेशासाठी शाळा-कॉलेजना वेळापत्रक ठरवून दिले आहे.

चौदाशे वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी हवेत साडेआठ कोटी!
मोहनीराज लहाडे, नगर, २४ जून

जिल्हा परिषदेच्या प्रश्नथमिक शाळांच्या पडझड झालेल्या वर्गखोल्यांची संख्या आहे सुमारे १ हजार ४००! त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी हवा साडेआठ कोटींचा! मात्र, उपलब्ध होणारा तुटपुंजा निधी पाहता जिल्ह्य़ातील हजारो विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे ऊन-पाऊस, वादळ-वाऱ्यात, उघडय़ावर शिक्षण घ्यावे लागणार आहे.

‘कांदाखरेदीसाठी परवाने न दिल्यास आंदोलन’
कोपरगाव, २४ जून/वार्ताहर
बाजार समितीत व्यापाऱ्यांना कांदाखरेदीसाठी परवाने द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी सभापती संभाजीराव रक्ताटे यांच्याकडे केली. येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, बाजार समितीकडे कांदाखरेदीसाठी जागा नसल्याने व्यापाऱ्यांना परवाने तूर्त देण्यास अडचणी असल्याचे सभापती रक्ताटे यांनी सांगितले. जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजार समितीत काळे-कोल्हे-परजणे या गटाची युती आहे. संबंधित संचालक मंडळाने व्यापाऱ्यांचे हित पाहून जादा भाव देणाऱ्या येवल्याच्या भरत समदडिया या व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला. शेतकऱ्यांचे हित जोपासले नाही. त्याचा निषेध करून कांद्यास भाव न मिळाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.

शाहीर विजय तनपुरे यांना अनमोल रत्न पुरस्कार जाहीर
राहुरी, २४ जून/वार्ताहर
येथील शिवशाहीर विजय तनपुरे यांना जुईनगर (मुंबई) येथील अनमोल सामाजिक प्रतिष्ठानचा ‘अनमोल रत्न पुरस्कार २००९’ जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रंगनाथ पिसाळ यांनी तनपुरे यांना पुरस्काराबद्दल पत्राद्वारे कळविले आहे. दि. १९ जुलै रोजी नवी मुंबई येथे आमदार भाई जगताप व सिडकोचे अध्यक्ष नामदेव भगत यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित केला जाणार आहे. याबद्दल आमदार राधाकृष्ण विखे, मुळा-प्रवराचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार प्रसाद तनपुरे, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रसाद मैड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. अनिल दरंदले यांचे निधन
सोनई, २४ जून/वार्ताहर

येथील पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. अनिल पंढरीनाथ दरंदले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. उत्कृष्ट घोडेपटू म्हणून ते परिचित होते. सोनईतील वैद्यकीय व्यावसायिकांनी दुपापर्यंत दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुळा साखर कारखाना व बाभळेश्वर दूध संघाचे माजी संचालक पंढरीनाथ रामराव दरंदले यांचे ते चिरंजीव होत.

मनपाच्या निषेधार्थ कचरागाडय़ा अडवल्या
नगर, २४ जून/प्रतिनिधी
विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध म्हणून बुरुडगाव परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या कचरा डेपोकडे जाणाऱ्या कचरागाडय़ा आज सुमारे तासभर अडवल्या. माजी सरपंच बापूसाहेब कुलट, तसेच खंडू काळे, रवींद्र ढमढेरे, संजय कुलट, मारुती बनकर, अविनाश कर्डिले आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. येत्या १५ दिवसांत मनपाने बुरुडगाव परिसरातील नागरी समस्यांकडे लक्ष दिले नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.