Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

अखेर मान्सूनचे आगमन
१७ मिलिमीटर पाऊस ल्ल वाऱ्यामुळे वृक्ष कोसळले
वीज पुरवठा खंडित ल्ल घर कोसळले
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी
दीर्घ प्रतीक्षेनंतर आज सायंकाळी अखेर पावसाचे आगमन झाले. मात्र, हा पाऊस सार्वत्रिकही नव्हता आणि पुरेसाही नव्हता. त्यामुळे मान्सूनचा हा बार फुसका गेला तरी त्याचे आगमन झाल्याचे समाधान मात्र नागपूरकरांना मिळाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शहरातील काही भागात वृक्ष उन्मळून पडले तर, जयताळा मार्गावरील एकात्मता नगरात घर कोसळले. वादळामुळे शहराच्या अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला. नागपूर विमानतळावर १७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

ऑनलाईन प्रवेश नाही; अकरावीसाठी केंद्रीय पद्धत
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने होणार असून पुण्या- मुंबईप्रमाणे ते ऑनलाईन होणार नसल्याने भर पावसात विद्यार्थी आणि पालकांची प्रवेशासाठी धावपळ आलीच. अभियांत्रिकी किंवा पॉलिटेक्निकप्रमाणे ऑनलाईन प्रवेश आणि अ‍ॅप्लिकेशन फॉर्म रिसिव्हिंग सेंटर (एआरसी) करून ठरावीक केंद्रांना ते स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून दिली असती तर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ते जास्त सोयीचे झाले असते. उद्या, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच समितीने ठरवून दिलेल्या केंद्रावर अर्ज वाटपाची आणि अर्ज स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे.

रेल्वेत निकृष्ट खाद्यपदार्थाची विक्री; २१ विक्रेते अटकेत
नागपूर, २४ जून/ प्रतिनिधी

नागपूर रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध रेल्वे ने मोहीम उघडली असून आज सहा विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेअंर्तगत बुधवापर्यंत अटक झालेल्या विक्रेत्यांची संख्या २१ झाली आहे. आज अटक झालेल्यांमध्ये पप्पू तिवारी, अमृत तिवारी, रमेश मिश्रा, नरेंद्र मिश्रा, सुमीत ठाकूर आणि राजबल्लन तिवारी यांच्या समावेश आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर २१ जूनपासून ही मोहीम सुरू झाली. त्यात २१ जूनला तीन विक्रत्यांना अटक करण्यात आली. २२ जूनला सात जणांवर कारवाई झाली. २३ जूनला पाच आणि २४ जूनला सहा विक्रेत्यांना रेल्वे सुरक्षा दलाने कलम १४४ अन्वेय अटक केली आहे.

महिलांनी चार भिंतीबाहेर पडून विधायक कार्य करावे -तबस्सूम
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

आज प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांनी केवळ चार भिंतींच्या आड न राहता, परिवार आणि मानमर्यादा सांभाळून घराबाहेर पडून विधायक कार्य करण्याची गरज असल्याचे मत अभिनेत्री तबस्सूम यांनी व्यक्त केले. झी टीव्हीवर २७ जूनपासून दर शनिवारी रात्री ८.३० वाजता सुरू होणाऱ्या ‘हसने और हसाने की टॉनिक’ लेडीज स्पेशल या कार्यक्रमाच्या निमित्ताने तबस्सूम पत्रकारांशी बोलत होत्या. आजपर्यंत विनोदी सादरीकरणावर केवळ पुरुषांचीच मक्तेदारी होती. परंतु महिलाही अत्यंत दर्जेदार विनोद सादर करू शकतात हे दाखविणारा कार्यक्रम दर शनिवारी सादर होणार आहे.

‘स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे..’ एक स्वप्निल स्वर प्रवास
डॉ. सुलभा पंडित

स्थानिक ‘सातक’ संस्थेच्या वतीने ‘स्वप्नांच्या गावी जावं’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. वेगवेगळ्या काव्य पूर्ण, आशयसंपन्न मध्यवर्ती कल्पना घेऊन सुगमसंगीताचे कार्यक्रम आजकाल संपन्न होत असतात. गाजलेली मराठी प्रेमगीते, हलकी-फुलकी द्वंद्वगीते आणि नव्या दमाच्या कवी, संगीतकार आणि गायक गायिकांनी आजच्या काळात लोकप्रिय केलेली भावगीते आणि चित्रपट गीते यांचा बहुरंगी नजराणा या कार्यक्रमातून रसिकांना मिळाला.

आज दहावीचा निकाल मोबाईल, इंटरनेटवरही माहिती मिळणार
नागपूर , २४ जून/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, गुरुवारी (२५ जून) जाहीर करण्यात येणार आहे. अंतर्गत मूल्यमापन व तोंडी परीक्षांमुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात १० ते १५ टक्क्य़ांची वाढ अपेक्षित आहे. उद्या सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असून शाळांबरोबरच संकेतस्थळ, मोबाईलच्या माध्यमातूनही त्याची माहिती घेता येईल.

शेतकरी चळवळीची ताकद वाढवण्यासाठीच राजकारणात -शेट्टी
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

केवळ करियर म्हणून मी राजकारणात आलेलो नसून शेतकरी चळवळीची ताकद वाढवण्याची जबाबदारी समजून आलो आहे. या उद्देशानेच राष्ट्रीय पातळीवर शेतक ऱ्यांच्या संघटनांचा समन्वय स्थापन करण्यात आला असल्याची माहिती हातकणंगले मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

शालेय साहित्याच्या खरेदीसाठी लगबग
नागपूर २४, जून / प्रतिनिधी

उन्हाळय़ाच्या जवळपास दीड महिन्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा शुक्रवारपासून सुरू होत आहेत. नव्या वर्गात नव्या जोमाने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांला तर सर्वच नव्या वस्तूंची आस असते. कपडे, पुस्तके, रेनकोट, छत्र्या, बॅग, चप्पल, बूट हे सारेच नवीन हवे असणाऱ्या मुलांना त्यांची हौस पुरविण्यासाठी पालकही तयारीत असतात.

संजय गांधी यांना काँग्रेसतर्फे आदरांजली
नागपूर, २४ जून/प्रतिनिधी

दिवंगत संजय गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने देवडिया भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी गांधी यांच्या फोटोला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गुप्ता म्हणाले, दिवंगत इंदिरा गांधी यांच्या मागे युवकांची संघटना उभी करून सत्तेत भागीदारी मिळवून देण्याचे कार्य संजय गांधी केले होते. त्यांनी पाचसूत्री कार्यक्रम युवकांना दिला होता. यात वृक्षारोपण, कुटुंबनियोजन, रक्तदान, हुंडाविरोधी अभियान इत्यादींचा समावेश होता. संपूर्ण देशाला या कार्याची सध्या नितांत आवश्यकता असल्याचे गुप्ता म्हणाले. यावेळी काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी कोषाध्यक्ष विजय जिचकार, सरचिटणीस बंडोपंत टेंभुर्णे, कमलेश समर्थ, उमाकांत अग्निहोत्री, राजा द्रोणकर, सचिव संजय दुबे, चंद्रकांत बग्गे, राजेश देशमुख, जॉन थॉमस, विक्रम संतोषवार, स्मिता कुंभारे, संदेश सिंगलकर, ब्रजभूषण शुक्ला, दिनेश शाहू, अशोक आहुजा, नरेश चौधरी, शेषराव वासनिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाती प्रमाणपत्र पडताळणीस ४ जुलैपर्यंत मुदतवाढ
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

सन २००८-०९ च्या शैक्षणिक वर्षात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी (अनुसूचित जमाती वगळून) इयत्ता १२वी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण केली व सामाईक प्रवेश परीक्षा (\उएळ) दिलेली आहे व ज्यांनी त्यांच्या प्रवर्गासाठी आवश्यक असलेली किमान गुण मर्यादा प्रश्नप्त केलेली आहे व यापुर्वी कनिष्ठ महाविद्यालयामार्फत जाती प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज सादर केलेले नाही अशाच मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी (अनुसूचित जमाती वगळून) जाती प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने दिनांक ४ जुलै पर्यंत वाढविलेली आहे. संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीकरिता त्यांचे अर्ज ४ जुलैपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास सादर करावेत. सदर अर्ज संत मुक्ताबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पोलीस कमिशनर कार्यालय, (सिव्हील लाईन्स) नागपूर येथे स्वीकारण्यात येत आहेत. संबंधित महाविद्यालयाने प्रश्नप्त झालेले अर्ज १० जुलैपर्यंत विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नागपूर यांचेकडे सादर करावेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज परस्पर समितीला सादर करू नयेत, असे आवाहन विशेष समाज कल्याण अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.

गांधीबागेतील रस्त्याला संत हरिराम बाप्पांचे नाव
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

वल्लभाचार्य चौक ते भावसार चौक या मार्गाला श्रद्धेय संत हरिराम बाप्पा यांचे नाव देण्यात येणार असून उद्या, गुरुवारी दुपारी ४.३० वाजता महापौर माया इवनाते यांच्या उपस्थितीत नामकरण फलकाचे उद्घाटन होणार आहे. जलाराम सत्संग मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे प्रमुख चंद्रकात ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रविण भिसीकर, सत्तापक्ष नेते अनिल सोले, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, बंडू राऊत, गिरीश व्यास, दयाशंकर तिवारी, हितेश जोशी, गीता छाडी, कृष्णा खोपडे, पोलीस निरीक्षक नंदनवार उपस्थित राहणार आहेत. जलाराम सत्संग मंडळातर्फे आजपर्यंत विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. क्वेटा कॉलनीतील जलाराम मंदिरात गेल्या ३० वर्षांपासून भोजनदान आणि विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. पत्रकार परिषदेला अध्यक्ष नरेंद्र दावडा, वसंतभाई सयानी, हिम्मत कक्कड, राजेश खख्खर , दिलीप ठकराल उपस्थित होते.

माजी सैनिकांचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी नागपुरात
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्रात्ोील सर्व माजी सैनिक व विधवा यांना सैनिक कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची देण्यासाठी २७ जूनला सकाळी ११ वाजता चिटणीस पार्कवर राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्यमंत्री सुरेश वरपुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनाबाबत, रोजगार व स्वयंरोजगार, सैन्य भरती याबाबतची चर्चा या मेळाव्यात होणार आहे. याठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचारी शंकांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी कळवले आहे.

सुधारित वेतनश्रेणीबाबत शाळांना आवाहन
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

अनुदानित अशासकीय प्रश्नथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. शाळांनी जुलै २००९ ची नियमित वेतन देयके सहाव्या वेतन आयोगानुसार सादर करावी. सद्यस्थितीत शाळांनी कर्मचाऱ्यांकडून विकल्प भरून घेऊन स्वत:च्या स्तरावर वेतननिश्चिती करून घ्यावी. लेखाधिकारी यांच्याकडून वेतन निश्चिती केल्यानंतर रकमेत तफावत आढळल्यास जादा रक्कम परत करण्याबाबतचे हमीपत्र प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून लिहून घ्यावे. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे जुलै २००९ च्या नियमित देयकासोबत मुख्याध्यापकांकडून झालेल्या वेतन निश्चितीच्या प्रती आणि हमीपत्राच्या प्रती देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. थकबाकीची देयके लेखाधिकारी यांच्याकडून वेतन निश्चिती झाल्यानंतर सादर करावीत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, नागपूर यांनी केले आहे.

आदर्श कन्या शाळेत आज अध्यापक कार्यशाळा
नागपूर, २४ जून/प्रतिनिधी

शिक्षकांचा शैक्षणिक, गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने नागसेन विद्यालय व आदर्श कन्या शाळेच्या संयुक्त विद्यमाने बेझनबागमधील आदर्श कन्या शाळेत गुरुवार, २५ जूनला सकाळी १० वाजता अध्यापक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन नागसेन शिक्षण संस्थेचे सहसचिव मोरेश जांभुळकर यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.वाय. जांभुळकर व प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तम पंचभाई, सुनील रोडे उपस्थित राहतील. कार्यशाळेत शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यवेक्षक डी.सी. टेंभूर्णे यांनी केले आहे.

व्ही. पी. सिंग जयंतीनिमित्त आज विचार प्रबोधन
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी
माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या जयंतीनिमित्त उद्या, गुरुवारी टिळक पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता व्ही पी. सिंग विचार प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाुहणे म्हणून व्ही.पी. सिंग यांचे निकटचे सहकारी प्रताप गोस्वामी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश खैरनार, नितीन सरदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी वक्ते म्हणून डॉ. के.एम. कांबळे, प्रश्न. ज्योती लांजेवार, सिद्धीकी अली, अतुल लोंढे यांची भाषणे होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश चौधरी राहतील. बहुजन संघर्ष समिती, मागासवर्गीय डाक कर्मचारी संघटन, राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहू महाराज व आरक्षण; शुक्रवारी परिसंवाद
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी
अखिल भारतीय धम्मसेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सीताबर्डीवरील आनंद बुद्ध विहार येथे शुक्रवारी, २६ जूनला संध्याकाळी ५ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ‘आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज व वर्तमान आरक्षण धोरण’ हा परिसंवादाचा विषय आहे. अखिल भारतीय धम्मसेनेचे शहर सेनापती रवि शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रश्न. देविदास घोडेस्वार, प्रश्न. जैमिनी कडू, कीर्तनकार अशोक सरस्वती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या निमित्ताने शाहू महाराजांचे आरक्षण धोरण व वर्तमान सरकारचे षडयंत्र याची मिमांसा होणार असून परिणामी सामाजिक न्यायाच्या आंदोलनास दिशा मिळेल. या परिसंवादात मोठय़ा संख्येने बहुजनांनी एकत्र यावे, असे आवाहन भय्याजी खरकर, दिनेश अंडरसहारे, प्रतिक डंभारे, सुरेश तेलंग, ताराचंद रामटेके आदींनी केले आहे.

बालजगततर्फे जलतरण शिबीर
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

दीनदयाल शोध संस्थान बालजगततर्फे १५ जुलै ते १२ ऑक्टोबर या कालावधीत जलतरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील तज्ज्ञ महिला जलतरणपटूंकडून मार्गदर्शन होणार आहे. अधिक माहितीसाठी बालजगत, २२२४३३१, २५२५७१८, २२३०७८३ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळ सकाळी ८ ते १० व संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत संपर्क साधावा.

रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी
नागपूर रेल्वेस्थानक परिसरात साफसफाई अभावी दरुगधी पसरली आहे. रेल्वे प्रशासनाने परिसर स्वच्छ ठेऊन नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ऑटोचालक संघटनेने केली आहे. हजारो लोक दररोज रेल्वेस्थानकावर ये-जा करतात. त्यात लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वच असतात. परंतु दोन मिनिटही व्यक्ती परिसरात प्रसन्न मनाने राहू शकत नाही. त्याला नाक दाबूनच तेथे वावरावे लागते. येथील अनेक ऑटोचालकांनी दरुगधीची समस्या रेल्वे प्रशासनाकडे बोलून दाखवली मात्र, रेल्वे प्रशासन त्यांच्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप ऑटोचालकांच्या संघटनेने केला आहे. २४ तास ऑटो चालकांना उभे राहणे शक्य होत नाही. तसेच या भागात काम करणाऱ्या आणि स्थानकावर ये-जा करणाऱ्यांच्या आरोग्यालाही यामुळे धोका उद्भवू शकतो. तेव्हा प्रशासनाने त्यांची जबाबदारी समजून तात्काळ दुषित पाण्याची विल्हेवाट लावावी. रेल्वे स्थानक परिसरातील गेटजवळ दोन मुत्रीघराची स्वच्छता राखावी, अशी मागणी ऑटो संघटनेचे अध्यक्ष सोपान बेताल यांनी केली आहे.

स्कुटीत ठेवलेले एक लाख पळवले
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

पान मटेरियल सप्लायरने स्कुटीमध्ये ठेवलेले एक लाख रुपये चोरटय़ाने लंपास केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सुर्वे ले-आऊट येथील अशोककुमार विनोदीलाल अग्रवाल (४८) हे पान टपरीवर जाऊन सुपारी, तंबाखू, सिगारेट व इतर साहित्याची विक्री करतात. आज सकाळी ९.३० वाजता ते तुकडोजी चौकातील विद्युत वितरण कार्यालयाजवळ आले व त्यांनी त्यांची स्कुटी (क्र.एमएच-सीडी-२३९६) विनोद सायकल स्टोअर्सच्या शेजारी उभी करून ते पानटपरीवर निघून गेले. यादरम्यान कुणीतरी स्कुटीच्या डिक्कीत पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये ठेवलेले एक लाख रुपये काढून घेतले. यानंतर चोराने डिक्की पुन्हा लॉक करून ठेवली.
अग्रवाल स्कुटीजवळ आले व त्यांनी डिक्की उघडून बघितली असता त्यातील एक लाख रुपये बेपत्ता झाल्याचे दिसले. त्यांनी लगेच अजनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

‘पंढरपूर यात्रा स्पेशल बस’ २८ जूनपासून
नागपूर, २४ जून/ प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्त पंढपूरच्या वारकऱ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही एसटीने विशेष व्यवस्था केली आहे. विदर्भातील विविध शहरातून ‘पंढरपूर यात्रा स्पेशल बस’ सोडण्यात येणार आहेत.
एसटीच्या नागपूर विभागाने नागपूर, उमरेड, रामटेक, काटोल तसेच सावनेर येथून पंढपूर यात्रेकरिता २८ जूनपासून स्पेशल बस सोडण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारी आषाढी एकादशी आहे. भाविकांनी मागणी केल्यास २८ जूनच्या पूर्वीही यात्रा स्पेशल सोडण्यात येतील, असे एसटीच्या नागपूर विभागाचे नियंत्रकांनी कळवले आहे. या विशेष बस करिता आरक्षण सुरू झाले आहे. नागपुरात गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक तसेच उमरेड, रामटेक, काटोल, सावनेर येथे आरक्षणाची सुविधा आहे. वेळेआधीच आरक्षण करून भाविकांनी गैरसोय टाळावी, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

बँक कर्मचाऱ्यांचा संप आता ६ जुलैला
नागपूर, २४ जून/प्रतिनिधी
स्टेट सेक्टर बँकांचे स्टेट बँकेत विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेध करण्यासाठी एआयबीईए आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनने पुकारलेला देशव्यापी संप पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा संप ३ जुलै ऐवजी ६ जुलैला होईल. या संपात इतरही काही बँक कर्मचारी संघटनांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने हा संप पुढे ढकलण्यात आला आहे. या संपात स्टेट सेक्टरच्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ पटियाला व स्टेट बँक ऑफ त्रावणकोरचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपमहासचिव जयवंत गुर्वे यांनी दिली आहे.

शहरात आज मर्यादित पाणी पुरवठा
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

जलशद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने उद्या, गुरुवारी शहरात अल्प पाणी पुरवठा केला जाणार आहे. कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राला कामठी येथील महावितरणतर्फे वीज पुरवठा केला जातो. आज दुपारी साडेचारच्या सुमारास हा वीज पुरवठा खंडित झाल्याने कन्हान पाणी पुरवठा केंद्रातून नागपूर शहरातील पाण्याच्या टाक्या भरू शकला नाही. त्यामुळे आज उत्तर, पूर्व व मध्य नागपुरच्या काही भागात पाणी पुरवठा झाला नाही. तसेच उद्या, सकाळी संपूर्ण शहरात मर्यादित व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.